Sexual Health Yoga: डोक्यावरच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत तसेच चेहऱ्याच्या त्वचेपासून ते पोटाच्या, आतड्यांच्या आरोग्यापर्यंत शरीरालाआतून – बाहेरून ठणठणीत करण्यासाठी योगाचे योगदान अनन्यसाधारण आहे. पण तुम्हाला हे माहीत आहे का, योगाच्या काही पोजिशन या स्त्री व पुरुषांमध्ये लैंगिक व प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी सुद्धा मदत करू शकतात. असेच एक योगासन म्हणजे योगध्यापीका जुही कपूर यांनी सांगितलेले मंडूकासन. नावाप्रमाणेच या योगासनामध्ये शरीराचा आकार व मंडूक म्हणजेच बेडकासारखा दिसतो. नेमके हे आसन कसे करायचे? याचा फायदा प्रत्येकालाच होऊ शकतो का? याविषयी आपण योगा प्रशिक्षक फेनील पुरोहित यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेली माहिती जाणून घेऊया..
फेनील पुरोहित सांगतात की, घेरंडा संहितेत नमूद केलेल्या ३२ प्रमुख आसनांपैकी हे एक आहे. हथरत्नावलीनुसार भगवान शिवाने शिकवलेल्या ८४ आसनांपैकी मंडुकासन हे एक आहे. हे आसनांच्या वज्रासन गटांतर्गत येते.
मंडुकासन कसे करावे?
इंस्टाग्रामवर @theyoginiworld या पेजवर जुही कपूर यांनी मंडूकासन कसे करावे हे दाखवले आहे, तीच कृती प्रत्यक्ष पाहूया.
लक्षात घ्या जर तुम्ही योगा नव्याने करत असाल तर सुरुवातीला या पोजिशनमध्ये केवळ ३ ते पाच वेळा श्वास घेईपर्यंत राहणे सुद्धा पुरेसे ठरते. पुढे सरावाने तुम्ही १० ते १५ वेळा श्वास घेईपर्यंत ही पोजिशन कायम ठेवू शकता.
मंडूकासन व तुमच्या लैंगिक आरोग्याचा संबंध आहे का?
पुरोहित सांगतात की, आपल्या शरीरातील एचपीओ (हायपोथालेमिक-पिट्यूटरी-ओव्हेरियन) अक्ष प्रामुख्याने महिला प्रजनन क्षमतेशी संबंधित आहे, तर एचपीजी (हायपोथालेमिक-पिट्यूटरी-गोनाडल) अक्ष पुरुषांच्या प्रजनन क्षमतेशी संबंधित आहे. मंडुकासन किंवा बेडकाच्या शरीराप्रमाणे केलेली योग मुद्रा, पुरुष आणि स्त्रिया दोघांच्या लैंगिक आणि प्रजनन क्षमतेवर काही प्रमाणात सकारात्मक प्रभाव पाडू शकतात, पण हे प्रभाव प्रत्येक व्यक्तिनुरूप बदलू शकतात. आता आपण या आसनाचे काही संभाव्य फायदे पाहूया..
ताणतणाव कमी करणे: मंडूकासन आपल्याला ताण कमी करून शरीराच्या स्नायूंना आराम देण्यासाठी उपयुक्त आहे. विशेषतः ताणामुळेच वर नमूद केलेल्या अक्षांवर परिणाम होत असतोमी ज्यामुळे मासिक पाळी अनियमित होणे, शुक्राणूंचे उत्पादन कमी होणे असे प्रश्न समोर येऊ शकतात. अशावेळी मंडूकासन आपल्याला हार्मोनल संतुलनास व ताण- तणाव कमी करण्यास मदत करू शकते.
रक्ताभिसरण: मंडूकासन करताना ओटीपोटाचा भाग अधिक सक्रिय होतो ज्यामुळे प्रजननाच्या अवयवांमध्ये रक्ताभिसरण वाढू शकते.
पेल्विक फ्लोअरची शक्ती: या योगासनामुळे पेल्विक स्नायू मजबूत होतात, जे लैंगिक कार्य आणि मूत्र नियंत्रणासाठी महत्त्वाचे असतात. स्त्रियांमध्ये, मजबूत पेल्विक स्नायू बाळाचा जन्म आणि लैंगिक समाधानासाठी मदत करू शकतात. पुरुषांमध्ये, पेल्विक फ्लोरचे आरोग्य इरेक्टाइल फंक्शनशी जोडलेले आहे
मंडूकासन सर्वांना करता येईल का?
योगासन करण्यासाठी तुमची वैयक्तिक क्षमताच विचारात घ्यायला हवी. तुम्ही तुमचे शरीर आधी समजून घ्या व मग योगा किंवा अन्य कोणताही व्यायाम निवडा. पण त्यातही घोट्याला, गुडघ्याला किंवा कंबरेला दुखापत झालेली असल्यास, हृदयाचे विकार असल्यास, पाठदुखी आणि काचबिंदू आणि मोतीबिंदू यांसारखे गंभीर डोळ्यांचे विकार असल्यास सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ज्यांच्या पोटावर, छातीवर, गुडघ्यावर किंवा पायांवर शस्त्रक्रिया झाली आहे त्यांनीही काळजी घ्यावी.
शिवाय इथे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की मंडुकासनाचे तुमच्या लैंगिक किंवा प्रजनन आरोग्यावर काही संभाव्य फायदे होऊ शकतात पण हार्मोनल संतुलनासाठी हा एकमेव स्वतंत्र उपाय नाही. आवश्यक असल्यास वैद्यकीय सल्ला अगदी आवर्जून घ्या.