Colon Cleansing: आपल्या आतड्यांचे आरोग्य चांगले राखणे हेदेखील महत्त्वाचे आहे. चांगल्या आरोग्यासाठी आता काय खावे, काय खाऊ नये याबाबत अनेक जण सजग आहेत. या पार्श्वभूमीवर आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आपण कसे जेवावे हे माहीत असणेही गरजेचे आहे. आतड्यांचे आरोग्य सुदृढ राहणे निरोगी शरीरासाठी गरजेचे आहे. जर आतड्यांचे आरोग्य चांगले असेल, तर आपली रोगप्रतिकार शक्ती उत्तम राहते; पण अनेकदा आपण आतड्यांच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही आणि स्वत:हून आरोग्याच्या समस्या अंगावर ओढवून घेतो. दरम्यान, सोशल मीडियावर अनेक डिजिटल निर्माते आरोग्यासाठी घरगुती पेये कशी बनवावीत हे सांगत असतात. अशाच एक पेयाच्या सेवनाने आतड्यांचे आरोग्य सुधारते, असा दावा केला जात आहे. त्यामध्ये अननस, काकडी, आले, लिंबू व पाणी अशा मिश्रणाने हे पेय तयार केले जाते. चला तर मग नक्की काय आहे पेय? या पेयाच्या सेवनाने खरेच आतड्यांचे आरोग्य सुधारते का हे जाणून घेऊ. MY22BMI च्या संस्थापक प्रमुख आरोग्य प्रशिक्षक व पोषणतज्ज्ञ फंक्शनल न्युट्रिशनिस्ट प्रीती त्यागी यांनी या संदर्भात दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे. प्रीती त्यागी सांगतात, "या पेयाद्वारे आतडे स्वच्छ करण्याची ही प्रक्रिया संपूर्ण आरोग्यासाठी आणि आतडे निरोगी राखण्यासाठी खूप प्रभावी आहे. एकंदरीत हे पेय वजन कमी करण्यात आणि डिटॉक्सिफिकेशनमध्येही मदत करते.” हे पेय तयार करण्यासाठी अननस, काकडी, आले, लिंबू व पाणी यांचं मिश्रण करुन गाळून घ्या. प्रीती त्यागी यांच्या मते, वरील मिश्रणयुक्त पेय खरोखरच आतडे शुद्ध करण्यास, ऊर्जेची पातळी वाढविण्यात आणि निरोगी व्यायाम व तंदुरुस्त जीवनशैलीसह वजन कमी करण्यास मदत करू शकते. मात्र, हे पेय अननस किंवा इतर कोणत्याही घटकांची अॅलर्जी असलेल्यांसाठी योग्य नाही. हे पेय तुमचे आतड्यांमधील घाण साफ करण्यास कशी मदत करते? प्रीती त्यागी सांगतात, "वर नमूद केलेल्या सर्व घटकांमध्ये अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त आहे, ज्यामुळे वजन कमी होते आणि आपण तरुण दिसतो. अननसात व्हिटॅमिन सी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते, जे तुम्हाला तुमचे पोट स्वच्छ करण्यास मदत करते. परंतु, चांगली त्वचा आणि तरुण दिसण्यातदेखील मदत करते. तसेच जळजळ नियंत्रणात ठेवण्यास मदत करते आणि तुमची प्रतिकारशक्ती सुधारते; जेणेकरून तुम्हाला छान वाटते." पोषणतज्ज्ञ त्यागी पुढे सांगतात, "लिंबाचा रस हा व्हिटॅमिन सीचा उत्कृष्ट स्रोत आहे, जो आपल्या शरीरातील अतिरिक्त पाणी काढून टाकण्यास मदत करतो. काकडी ही पुन्हा एक हिरवी भाजी आहे; ज्यामध्ये पाणी व फायबर भरपूर प्रमाणात आहे.” हेही वाचा >> रात्रभर एसी लावून झोपता का? महिलेबरोबर काय झालं पाहा; डॉक्टरांनी सांगितल्या आरोग्याच्या गंभीर समस्या आतडे स्वच्छ करणे खरोखर शक्य आहे का? आपले आतडे प्रभावीपणे स्वच्छ करणे खरोखर शक्य आहे; परंतु ते एक दिवसाचे काम नाही. त्यासाठी आपण रोज आतड्याची काळजी घेणे आणि संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. निरोगी जीवनशैलीमध्ये अतिरिक्त कॅलरीज कमी करण्यासाठी नियमित व्यायामाचाही समावेश करणे आवश्यक आहे. साखर आणि साखरयुक्त पेये टाळल्याने ऊर्जेची पातळी उच्च राहून, एकंदर आरोग्य चांगले राहते. हे पेय आहारात किती वेळा घ्यावे? प्रीती त्यागी यांनी सल्ला दिला की, तुमच्या आहारात समाविष्ट केलेले कोणतेही डिटॉक्स पेय दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ घेऊ नये. तसेच याचा परिणाम दिसायला थोडा वेळ लागू शकतो, असेही त्यांनी सांगितले.