दररोज १०,००० पावले चालण्याच्या फायद्यांविषयी बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल; पण दररोज ४५ मिनिटे चालण्याचा शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांच्या दाव्यानुसार दररोज ४५ मिनिटे चालण्यानं रक्तातील साखरेच्या नियंत्रणासाठी महत्त्वपूर्ण फायदे मिळतात. विशेषतः टाइप २ मधुमेह असलेल्या लोकांसाठी किंवा जोखीम असलेल्या लोकांसाठी. “चालणे ही एक अद्भुत आणि अत्यंत फायदेशीर शारीरिक क्रिया आहे, विशेषतः मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी अनेक फायदे होतात. चालण्यानं स्नायूंमध्ये ग्लुकोजचे सेवन वाढते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. दिल्लीतील सीके बिर्ला हॉस्पिटलच्या अंतर्गत औषध संचालक डॉ. मनीषा अरोरा यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.
आरोग्यतज्ज्ञ आठवड्यातून किमान पाच दिवस १५० मिनिटे मध्यम-तीव्रतेच्या एरोबिक क्रियाकलापांचा प्रयत्न करण्याची शिफारस करतात. जसे की, आठवड्यातून किमान पाच दिवस ३०-४५ मिनिटे जलद चालणे. “यामुळे इन्सुलिन प्रतिरोध कमी होतो, रक्तातील साखरेचे नियंत्रण सुधारते आणि एकूणच चयापचय आरोग्य सुधारते हे सिद्ध झाले आहे,” असे डॉ. अरोरा म्हणाल्या.
या खालील प्रकाराने होते मदत
इन्सुलिन संवेदनशिलता सुधारते
चालण्यामुळे शरीराची इन्सुलिनची संवेदनशिलता वाढते. “याचा अर्थ तुमचे स्नायू रक्तप्रवाहातून ग्लुकोज शोषण्यासाठी इन्सुलिनचा अधिक प्रभावीपणे वापर करू शकतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते,” असे झांद्रा हेल्थकेअरचे मधुमेहशास्त्रप्रमुख आणि रंग दे नीला इनिशिएटिव्हचे सह-संस्थापक डॉ. राजीव कोविल म्हणाले.
स्नायूंद्वारे ग्लुकोजचे सेवन वाढवते
शारीरिक हालचालींदरम्यान, स्नायू ऊर्जेसाठी जास्त ग्लुकोज वापरतात. “इन्सुलिन नसतानाही चालण्यासारख्या मध्यम व्यायामामुळे ग्लुकोज पेशींमध्ये प्रवेश करतो, ज्यामुळे रक्तातील साखर कमी होते,” असे डॉ. कोविल म्हणाले.
इन्सुलिन म्हणजे काय
इन्सुलिन हे शरीरातील एक महत्त्वाचे संप्रेरक आहे, जे स्वादुपिंडाद्वारे (pancreas) तयार होते आणि रक्तातील साखरेचे (ग्लुकोज) प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते. हे संप्रेरक ग्लुकोजला शरीराच्या पेशींमध्ये प्रवेश करण्यास मदत करते.
जेवणानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करते
जेवणानंतर, विशेषतः रात्रीच्या जेवणानंतर चालण्याने रक्तातील साखरेची तीव्र वाढ रोखू शकते. “जेवणानंतर १५-२० मिनिटे चालणेदेखील लक्षणीय फरक करू शकते, म्हणून जेवणानंतर चालणे हे साखर नियंत्रणासाठी बरेचदा चांगले असते,” असे डॉ. कोविल म्हणाले.
वजन कमी करण्यास आणि पोटाची चरबी कमी करण्यास प्रोत्साहन देते
नियमित चालणे वजन व्यवस्थापनास मदत करते. “शरीराचे वजन ५-१० टक्के कमी केल्यानेही ग्लायसेमिक नियंत्रण सुधारते, यामुळे फॅटदेखील कमी होते, ज्याचा इन्सुलिन प्रतिरोधनाशी जवळचा संबंध आहे,” असे डॉ. कोविल म्हणाले.
डॉ. कोविल यांच्या मते, अभ्यासातून असे दिसून आले आहे की चालण्यासारख्या सतत मध्यम व्यायामामुळे HbA1c (रक्तातील साखरेची ३ महिन्यांची सरासरी) ०.५ टक्क्यांपासून १ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते, ज्यामुळे गुंतागूंत कमी होते. मधुमेह नसलेल्यांसाठी चालण्याचे अजूनही प्रचंड फायदे आहेत. डॉ. मनीषा अरोरा यांनी नमूद केले की, चालल्यामुळे ताण आणि चिंता कमी करण्यास मदत होते, जे मानसिक आरोग्य सुधारते. “कमी ताण पातळीदेखील रक्तातील साखर नियंत्रणात योगदान देऊ शकते,” असे डॉ. अरोरा म्हणाल्या.
या व्यतिरिक्त, चालण्यामुळे हाडे मजबूत राहण्यास मदत होते, ज्यामुळे ऑस्टियोपोरोसिसचा धोका कमी होतो. हा आजार मधुमेह असलेल्या व्यक्तींना होण्याची शक्यता जास्त असते. “हे हाडांच्या आरोग्यास समर्थन देते, झोपेची गुणवत्ता वाढवते, गतिशीलता आणि लवचिकता सुधारते आणि संज्ञानात्मक कार्यदेखील वाढवते, ज्यामुळे डिमेंशियासारख्या आजारांचा धोका कमी होतो,” असे डॉ. अरोरा म्हणाल्या.
चालण्यासाठी चांगली गती कोणती?
अशा वेगाने चाला, जिथे तुम्ही बोलू शकाल पण गाऊ शकणार नाही. “वेगापेक्षा सुसंगतता जास्त महत्त्वाची आहे. थोडक्यात, दररोज ४५ मिनिटे चालणे हे रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थापित करण्यासाठी सर्वात सोप्या आणि प्रभावी साधनांपैकी एक आहे,” असे डॉ. कोविल म्हणाले.