मुंबई : आजच्या काळात जगभरात वाढणाऱ्या असंसर्गजन्य (नॉनकम्युनिकेबल) आजारांच्या पार्श्वभूमीवर मानवी आरोग्याविषयीची दृष्टी झपाट्याने बदलत आहे.जगभरात जीवनशैलीशी संबंधित आजार वेगाने वाढत असताना वैद्यकीय क्षेत्रात एक महत्त्वाचा बदल घडतो आहे.आजार झाला की उपचार करा या पारंपरिक दृष्टिकोनापेक्षा आता ‘आजार होऊच नये यासाठी संतुलन राखा’ हा विचार पुढे येत आहे.औषधोपचार आणि निदान यापलीकडे जाऊन आता ‘संतुलन’ हा आरोग्याचा केंद्रबिंदू ठरत आहे. या बदलत्या दृष्टिकोनाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे थायरॉईड ग्रंथी ही आकाराने लहान पण शरीरातील चयापचयावर प्रचंड प्रभाव टाकणारी.

प्रसिद्ध एंडोक्रायनोलॉजिस्ट डॉ. शशांक जोशी यांनी अलीकडेच अमेरिकेतील एका वैज्ञानिक परिषदेत मांडलेल्या विचारांमध्ये याच संतुलनाच्या संकल्पनेवर भर दिला. त्यांच्या मते थायरॉईडचे आरोग्य हे केवळ उपचारांवर अवलंबून नसून योग्य प्रमाणातील पोषण, जीवनशैली आणि पर्यावरणीय घटक यांच्या समतोलावर आधारित असते. थायरॉईड ग्रंथीचे कार्य मुख्यत्वे आयोडीनवर अवलंबून असते. पण ‘जास्त म्हणजे चांगले’ हा समज येथे लागू होत नाही.

आयोडीनचे प्रमाण खूप कमी असेल तर गळू (गॉएटर), हायपोथायरॉईडिझम, मेंदूच्या विकासात अडथळे यांसारखे आजार होऊ शकतात. दुसरीकडे, आयोडीनचे अतिप्रमाण शरीरात गेल्यास ऑटोइम्युनिटी, थायरोटॉक्सिकोसिस, थायरॉईडायटिस यांसारख्या समस्या निर्माण होतात.वैज्ञानिक भाषेत याला ‘यू-आकाराचा वक्र’ (यू शेप कर्व्ह) असे म्हणतात ज्यात कमी आणि जास्त दोन्ही टोक धोकादायक असतात आणि मधला समतोलच सुरक्षित असतो. याच संकल्पनेतून ‘संतुलन’ ही आरोग्याची गुरुकिल्ली ठरते असे डॉ शशांक जोशी यांनी सांगितले.

पूर्वी आयोडीनची कमतरता ही मोठी सार्वजनिक आरोग्य समस्या होती. आयोडाईज्ड मीठामुळे भारतासह अनेक देशांनी यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवले. मात्र आज परिस्थिती बदलली आहे. आयोडीन केवळ मीठातूनच नव्हे तर सप्लिमेंट्स, समुद्री अन्न, प्रक्रिया केलेले पदार्थ, औषधी द्रव्ये आणि काही ‘नैसर्गिक’ उपचार पद्धतींमधूनही मिळत आहे.यामुळे अनेकदा नकळत आयोडीनचे प्रमाण जास्त होण्याचा धोका वाढतो. त्यातच पर्यावरणातील काही रसायने जसे प्लास्टिकमधील बिस्फेनॉल ए किंवा फ्लुराईड ही शरीरातील हार्मोन्सच्या कार्यात हस्तक्षेप करतात. त्यामुळे आयोडीनचे संतुलन बिघडण्याची शक्यता अधिक वाढते.

थायरॉईड आणि शरीरातील सूक्ष्म संतुलन

थायरॉईड ग्रंथी टी३ आणि टी४ हे हार्मोन्स तयार करते. जे शरीराचा चयापचय, ऊर्जा, वाढ आणि मेंदूचा विकास नियंत्रित करतात. पण या हार्मोन्सचे उत्पादन अतिशय नाजूक संतुलनावर आधारित असते. आयोडीनची पातळी थोडीशी जरी बदलली तरी त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होऊ शकतो.तज्ज्ञांच्या मते, आयोडीनचे जास्त प्रमाण ऑटोइम्युन थायरॉईड विकारांना चालना देऊ शकते. तसेच हृदयविकार, मेटाबोलिक समस्या आणि आतड्यांतील सूक्ष्मजीवांच्या संतुलनावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणजेच थायरॉईड हा केवळ एक ग्रंथी नसून संपूर्ण शरीराच्या आरोग्याचा निर्देशक आहे.

नवीन संशोधनात ‘डबल हिट’ मॉडेलची चर्चा होत आहे. यात आयोडीनचे असंतुलन आणि पर्यावरणातील रसायने एकत्रितपणे शरीरावर परिणाम करतात. हे घटक थायरॉईड हार्मोन्सच्या निर्मितीपासून ते त्यांच्या कार्यापर्यंत सर्व प्रक्रियांमध्ये अडथळा आणतात.यामुळे आजच्या काळात केवळ आहार नव्हे, तर आपण काय खातो, काय श्वासात घेतो, काय वापरतो या सर्व गोष्टींचा विचार करणे आवश्यक झाले आहे.या संपूर्ण चर्चेत एक रोचक गोष्ट म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानाशी असलेले साम्य. भगवद्गीतेमध्ये ‘मिताहार’ आणि संतुलित जीवनशैलीवर दिलेला भर आजही तितकाच महत्त्वाचा आहे. ‘अतिरेक आणि अभाव दोन्ही टाळा’ हा संदेश आधुनिक विज्ञानही देत असल्याचे डॉ जोशी म्हणाले. एंडोक्रायनोलॉजीमध्ये यालाच ‘होमिओस्टेसिस’ म्हणजेच संतुलन असे म्हटले जाते. भारतीय परंपरेत याला ‘समत्व’ असे संबोधले जाते. म्हणजेच, आरोग्य हे औषधांच्या जोरावर नव्हे, तर शरीरातील संतुलन राखूनच मिळते असेही त्यांनी सांगितले.

भविष्याची दिशा : उपचारांपासून संतुलनाकडे

आजपर्यंत वैद्यकीय क्षेत्राचा भर ‘रोग झाला की उपचार करा’ यावर होता. मात्र आता हा दृष्टिकोन बदलत आहे. भविष्यातील वैद्यकीय प्रणाली ‘प्रिसिजन बॅलन्स’ म्हणजेच प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार संतुलन राखण्यावर आधारित असेल.यात प्रत्येक व्यक्तीची जीवनशैली, आहार, पर्यावरण आणि शरीराची गरज लक्षात घेऊन उपचार केले जातील. ‘किती पुरेसे आहे’ व ‘किती जास्त आहे’ याचे अचूक मोजमाप करणे हेच खरे आरोग्याचे तंत्र असेल. थायरॉईड ग्रंथी आपल्याला एक साधा पण प्रभावी संदेश देते तो म्हणजे आरोग्य म्हणजे अतिरेक नव्हे तर संतुलन.

आयोडीनसारख्या साध्या घटकाचे योग्य प्रमाण राखणे हेच अनेक आजार टाळण्याचे साधन ठरू शकते.आजच्या वेगवान आणि बदलत्या जगात, आरोग्य टिकवण्यासाठी औषधांवर अवलंबून राहण्यापेक्षा संतुलित जीवनशैली स्वीकारणे अधिक आवश्यक आहे. कारण शेवटी, आरोग्य म्हणजे केवळ आजारांचा अभाव नाही तर शरीर, मन आणि पर्यावरण यांच्यातील सुसंवाद आहे.