“आमच्या फॅमिलीत सगळ्यांना हार्ट हिस्टरी आहे त्यामुळे मी ही करक्युमिन टॅबलेट सगळ्यांनाच देते".“आमच्या ऑफिसमध्ये एकजण हे हर्बल मिक्सचर घेऊन आला होता. सगळं आयुर्वेदिक आहे त्यामुळे सगळ्यांना रोज १ चमचा खायला देतो "“ मी रोज व्यायाम करतोय आणि कोणताही डाएट करत नाही. जेव्हा भूक लागेल तेव्हाच खातो. म्हणजे कसं पोटावरचं प्रेशर हृदयावर नको".“आम्ही गेली अनेक वर्ष शून्य फॅट्स घेतो. जेवणात वगैरे पण अजिबात तेल वापरत नाही. आतापासूनच काळजी घेतलेली बरी”“ ते कोकोनट ऑइल का प्यायचं ? इतकी वर्ष नारळाचं तेल हृदयाला हानिकारक होतं ना ?”“ माझ्या मोदकावर तूप नको. मी फॅट्स खात नाही “हृदय रोगापासून संरक्षण करण्यासाठी अनेकजण वेगेवगेळ्या पद्धतीने संरक्षक कवच उभं करत असतात. यानिमित्ताने आम्हा आहारतज्ज्ञांना देखील नवनवे शोध आणि तुमच्या हृदयाच्या स्वास्थ्याबद्दल नवनवी माहिती पडताळून पाहावी लागते. एखाद्या गोळीची खरंच आवश्यकता, त्याचे इतर अवयवांवर होणारे परिणाम याचा सारासार विचार करून आहारात बदल करावे लागतात . जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने आहारात असे कोणते पदार्थ खाल्ल्यास हृदयरोगापासून आपण दूर राहू शकतो ते जाणून घेऊ. तंतुमय पदार्थ अर्थात फायबरमटार , कडधान्ये , जव यांसारख्या धान्यांचा आहारात नियमित वापर करणे आवश्यक आहे. तंतुमय पदार्थांचा आहारातील नियमित वापर शरीरातील एल डी एल म्हणजेच वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण आटोक्यात ठेवतात . शिवाय १५ ते २०% प्रमाणात चांगल्या कोलेस्टेरॉलचे म्हणजे एचडीएलचे प्रमाण वाढवतात. फ्लॅव्होनॉइड्सजेवणांनंतर गोड खाताना डार्क चॉकलेट खाणाऱ्यांची संख्या अलीकडे अधिक आहे . कोकोआ किंवा ७० ते ८०% इतके कोकाआ चे प्रमाण असणारे डार्क चोकोलेट्स यामध्ये फ्लॅव्होनॉइड्स मुबलक प्रमाणात असतात. अत्यंत फॅन्सी नाव असणाऱ्या या घटकामुळे रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रणात येण्यास मदत होते. याचप्रमाणे कांदा , ग्रीन टी , पपई , द्राक्ष , ऑलिव्स यामध्येदेखील फ्लॅव्होनॉइड्स उत्तम प्रमाणात आढळतात. आणखी वाचा: Health special:आपल्या शरीराला किती कॅलरीज लागतात? ओमेगा ३आहारात भोपळ्याच्या किंवा सूर्यफुलाच्या बिया समाविष्ट करणे . किंवा मांसाहारींनीं बांगडा हा मासा विशेषतः आहारात समाविष्ट केल्यास हृदयाच्या स्वास्थ्यात वाढ होते . यात असणाऱ्या ओमेगा ३ स्निग्धांशामुळे हृदयाची क्षमता ३०% जास्त वाढते. अनसॅच्युरेटेड फॅट्सम्हणजेच आवश्यक स्निग्धांश . बदाम, अक्रोड, सूर्यफुलाच्या बिया , जवस, तीळ ,अवोकाडो यासारख्या पदार्थांमध्ये असणारे स्निग्धांश हृदयक्रिया सुरळीत पार पाडळण्या बळकटी देतात . एका संशोधनात असेही आढळून आले आहे कि न साठणारे स्निग्धांश नियमित आहारात समाविष्ट नेल्यास वाईट कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसेराईड यांचे प्रमाण १५-२० % इतके कमी होऊ शकते. याच वेळी चांगले कोलेस्ट्रॉल वाढल्याने थकवा कमी होतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. आणखी वाचा: Health Special: ‘हा’ आहे हॅपी डाएटिंगचा फंडा मॅग्नेशिअममॅग्नेशिअम रक्तदाब कमी करण्यासाठी महत्वाचे खनिजद्रव्य आहे . अक्रोड, पालक , तेलबिया यात मुबलक असणारे मॅग्नेशिअम आहारात आवश्यक आहे. फोलेट गडद हिरव्या रंगाच्या पालेभाज्या -म्हणजेच पालक, मेथी, हिरव्या भाज्या यामध्ये असणाऱ्या फोलेट या घटकामुळे शरीरातील होमोसिस्टीन नावाच्या घटकाचे प्रमाण संतुलित राहते. होमोसिस्टीनची वाढलेली पातळी हृदयासाठी हानीकारक मानली जाते. त्यामुळे फोलेटचे प्रमाण उत्तम असणाऱ्या हिरव्या भाज्यांचा आहारातील समावेश अपरिहार्य आहे. पॉलिफिनॉलशाकाहारी पदार्थांमध्ये आढळणाऱ्या पॉलिफिनॉल्समुळे नायट्रिक ऑकसाईडचे प्रमाण वाढते आणि शरीरातील पेशींचे कार्य सुरळीत राहण्यास मदत होते. करवंद , बेरी, बीट यामध्ये पॉलिफिनॉल्सचे प्रमाण उत्तम असते. कोएन्झाइम क्यू -१० (CoQ10)शरीरातील अँटिऑक्सिडंट्सची पातळी संतुलित राखण्यासाठी CoQ10 चे प्रमाण अत्यावश्यक आहे. वय वाढते तसे शरीरातील CoQ10 चे प्रमाण कमी होत जाते. विशेषतः मांसाहारी पदार्थांमध्ये आढळणारे CoQ10 पेशींच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. लायकोपिनशाकाहारी पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात आढळणारे लायकोपिन हृदयरोगापासून रक्षण करण्यासाठी विशेष उपयुक्त आहे . टोमॅटो ,कलिंगड यात लायकोपिनचे प्रमाण उत्तम असते. आहारातील या घटकांशिवाय कमी मानसिक ताण घेणे आणि किमान आठवड्यातील ३ दिवस योग्य व्यायाम करणे देखील हृदयरोगांपासून राखण करू शकते. कोणत्याही प्रकारचे फॅट बर्नर्स , फॅट्स कमी करणाऱ्या गोळ्या ,औषधे हेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. व्यायाम करताना देखील अतिरेक करणे टाळा. अचानक केला जाणारा कोणताही अतिरेकी व्यायाम तुमच्या हृदयासाठी घातक ठरू शकतो. कोणत्याही प्रकारच्या हार्ट-मॅजिक औषधांचा वापर करण्यापूर्वी त्याच खरंच आवश्यकता आहे का हेदेखील तपासून पाहणे आवश्यक आहे. हृदयाचं आरोग्य जितकं रक्ताभिसरण आणि आहारावर अवलंबून असतं तितकाच मानसिक स्वास्थ्यावर देखील! त्यामुळे मनाच्या आरोग्याचं गणित देखील सुकर असणं तितकंच आवश्यक आहे. कारण दिल है तो सब है !