डॉ. मोहन जोशी
क्षयरोग किंवा इंग्रजीमध्ये ज्याला ट्युबरक्युलोसिस म्हणतात. हा रोग मायकोबॅक्टेरियम क्षयरोग नावाच्या जंतूमुळे होतो. हे जंतू आम्ल-जलद बॅसिली असतात. या जंतूंचा दुप्पट होण्याचा कालावधी हा चौदा दिवस असतो. क्षयरोगाची किंवा टीबीची बाधा ही मनुष्याच्या शरीरातील प्रत्येक पेशीला अथवा अवयवाला होऊ शकते. मेंदूपासून हाडापर्यंत टीबीच्या जंतूंचा संचार हा मुक्तपणे सुरू असतो. झोपडीत राहणाऱ्या गरिबाला तसेच अतिउच्चभ्रू श्रीमंत माणसालासुद्धा टीबीची लागण होऊ शकते.
पेशवेकालीन एका पेशव्याला तसेच शिवकालीन राजाच्या गुडघ्याला टीबीने ग्रासले होते. त्यामुळे टीबीला राजयक्ष्मा असे म्हटले जाते. सर्व अवयवांना जरी टीबीने ग्रासले जात असले तरी टीबी म्हटले म्हणजे फुप्फुसाचा टीबी असेच आपल्या डोळ्यासमोर येते.
फुप्फुसाचा टीबी झालेल्या रुग्णांना खोकला, बारीक ताप, भूक न लागणे, कधी कधी थुंकीमधून रक्त पडणे, वजन कमी होणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. टीबी झालेला रुग्ण तब्येतीने हळूहळू खंगून जातो. म्हणूनच इंग्रजीमध्ये टीबीला फॅथिसिस म्हणतात. ज्या रुग्णांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असते असे रुग्ण टीबीचे बळी होऊ शकतात. बऱ्याच वेळा फुप्फुसाचा इंच आणि इंच भाग टीबीच्या जंतूने ग्रासित होतो, त्यावेळी त्या रोगाला मिलिरी टीबी म्हणतात. ज्यावेळी टीबीचे जंतू फुप्फुसाच्या एका भागात घर करतात त्यावेळी त्याठिकाणी फुप्फुसाचा संपूर्ण भाग हा जंतूने खाल्ला जाऊन तेथे एक छोटासा खड्डा निर्माण होते. त्यामुळे तेथील रक्तवाहिन्या फुटून ते रक्त थुंकीवाटे बाहेर येते. खोकल्यानंतर थुंकीवाटे रक्त पडले तर तो माणूस फुप्फुसाच्या टीबीने पीडित आहे असे समजावे व तपासण्या चालू कराव्यात.

प्रथिनयुक्त आहार घेत नाहीत ते…

तेजे लोक प्रथिनयुक्त आहार योग्य तऱ्हेने घेत नाहीत, तसेच जे लोक पौष्टिक खाण्यापिण्यापासून वंचित राहतात अशा लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. तसेच जे लोक मधुमेहाने पीडित असतात, वयोवृद्ध होतात, नियमितपणे मद्यप्राशन करतात किंवा एचआयव्हीपीडित असतात असे रुग्ण टीबीनेसुद्धा पीडित होण्याची शक्यता असते. एचआयव्हीपीडित लोकांना टीबीमुळे मेंदूमध्ये गाठी तसेच टीबीचा मेनेनजायटीस होतो, तसेच बऱ्याच वेळा मेंदूमध्ये टीबींच्या जंतूमुळे पूसुद्धा होतो.

आतड्याचा टीबी

टीबीमुळे पोटातील प्रत्येक अवयवाला बाधा होते, परंतु आतड्याला टीबीमुळे बाधा झाल्यास ते त्वरित रुग्णाच्या लक्षात येते. आतड्याचा टीबी झाल्यास पोटात दुखणे, जुलाब होणे, भूक न लागणे, खाल्लेले अन्न न पचणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. पोटाच्या आतड्याचा सीटी स्कॅन केल्यास किंवा दुर्बिणीतून तपास केल्यास रोगाचे निदान होऊ शकते. आतडयाच्या टीबीमुळे लहान आतडयात अल्सर होतात व त्यामधून रक्तस्राव होऊ शकतो. रक्तस्रावाचे प्रमाण कधी कधी अतिशय छोटे असून सतत थोडया प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे रुग्णाचे हिमोग्लोबीन कमी होते. अल्सर बरा होताना आतडयामध्ये अरुंद भाग तयार होतात, अन्न पुढे जाण्यास यामुळे अडथळा निर्माण होतो व पोटात खूप दुखत राहते. कधी कधी आतड्याचा अल्सर फुटून तात्काळ शस्त्रक्रिया करण्याची गरज भासू शकते. शस्त्रक्रिया न केल्यास रुग्ण दगावू शकतो.

हाडाचा टीबी हा मुख्यत्वेकरून मांडीचा सांधा, गुडघ्याचा सांधा व मणके यांना होतो. कधी कधी टीबीमुळे पू होऊन तो मणक्याच्या आजूबाजूला साठतो याला थंड गळू म्हणतात. टीबीमुळे संपूर्ण मणका खराब होतो व त्याचे तुकडे लंबमज्जावर दाब निर्माण करतात व रुग्णाला पॅराप्लेजिया होतो. सांध्याचा टीबी हा प्राथमिक अवस्थेत असताना टीबीची औषधे घेतल्यास बरा होऊ शकतो, परंतु सांध्यामध्ये खूप खराबी झाली असल्यास टीबीच्या औषधाचा कोर्स पूर्ण केल्यानंतर गुडघा किंवा मांडीचा सांधा बदलण्याची शस्त्रक्रिया करावी लागते. ही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी टीबीचा सांध्यामधून संपूर्ण नायनाट झाला आहे याची खात्री करणे आवश्यक असते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टीबीचे निदान झाल्यानंतर कमीत कमी सहा महिने ते दीड वर्ष रुग्णाला टीबीची औषधे घेणे आवश्यक असते. टीबीसाठी आता बहु-औषध उपचार आवश्यक असल्यामुळे रुग्णाला चार ते सहा गोळ्या दररोज घ्याव्या लागतात. यामुळे पोटामध्ये ॲसिडिटी व उलटया होणे असे साइड इफेक्टस् दिसून येऊ शकतात. तसेच टीबीची दोन औषधे ही लिव्हरसाठी त्रासदायक असल्यामुळे काही रुग्णांना कावीळचा प्रादुर्भाव दिसून येतो अशा वेळी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली एखाद्या गोळीचा डोस कमी करणे किंवा काविळीला कारणीभूत असणारी औषधे वगळून दुसरी औषधे किंवा इंजेक्शने देणे हा एक पर्याय असू शकतो, परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने दिलेल्या औषधाचा कोर्स पूर्ण करणे. असलेला टीबीचा रोग बरा झाल्याची खात्री योग्य त्या तपासण्या करून करणे हे अत्यंत आवश्यक असते. (लेखक लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसामान्य रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आहेत.)