Top Monsoon Superfoods: पावसाळा आला की पाण्यामुळे किंवा अन्नपदार्थांमुळे होणाऱ्या आजाराचा धोका वाढतो. यादरम्यान आपली रोगप्रतिकार शक्ती आणखी वाढवण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी तसेच आजारांपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी निरोगी आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, पावसाळ्यात आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करणाऱ्या काही अन्नपदार्थांचे पर्याय आज आपण जाणून घेणार आहोत.
लिंबूवर्गीय फळे पावसाळ्यात खाणे का महत्त्वाचे?
संत्री, लिंबू आणि द्राक्षे यांसारखी लिंबूवर्गीय फळे व्हिटॅमिन सीने भरलेली असतात, ज्यामध्ये अँटिऑक्सिडेंट आहे जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. व्हिटॅमिन सी हे कोणत्याही आजाराशी किंवा संसर्गाचा सामना करण्यास मदत करते आणि आपल्या शरीरातील पांढऱ्या रक्तपेशी वाढवते, जे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. या फळांचे नियमित सेवन केल्याने सर्दी, फ्लू आणि संसर्ग यांसारख्या पावसाळी आजारांपासून संरक्षण मिळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्हिटॅमिन सी तुमच्या शरीरातील लोह शोषून घेण्यास मदत करते आणि हाडांचे आरोग्यसुद्धा सुधारते.
पालेभाज्या आणि अँटीऑक्सिडंट्स
पालक, मेथी यांसारख्या पालेभाज्यांमध्ये शरीरासाठी आवश्यक असलेले व्हिटॅमिन्स असतात. हे मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्सयुक्त असतात. पालेभाज्या फोलेट आणि लोहाचा एक उत्तम स्रोत आहेत, जे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक आहेत. या भाज्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास आणि पचनक्रिया सुधारण्याससुद्धा मदत करतात, ज्यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल इन्फेक्शनचा धोका कमी होतो. तुमच्या आहारात विविध प्रकारच्या पालेभाज्यांचा समावेश केल्याने पावसाळ्यात होणारे आजार टाळता येतात. पालेभाज्या चांगल्या असतात, पण पावसाळ्यात पालेभाज्यांमध्ये जंतू वाढण्याचा धोका असतो, म्हणून खाण्यापूर्वी त्या नीट धुणे आवश्यक आहे आणि वाफवून घेणेसुद्धा गरजेचे आहे. नेहमी ताज्या शिजवलेल्या उबदार अन्नपदार्थांचे सेवन करा.
लसूण
लसूण हा अँटीमायक्रोबियल आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवणारा पदार्थ म्हणून ओळखला जातो. त्यात अॅलिसिन नावाचे कंपाउंड असते, ज्यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. लसूण नियमित खाल्ल्याने पावसाळ्यात सर्दी आणि खोकला तसेच श्वसनाशी संबंधित आजार किंवा संसर्ग टाळता येतात.
अन्नपदार्थ बनवताना ताजे लसूण टाका. लसणाचे चांगले आरोग्यदायी फायदे वाढवण्यासाठी लसूण कच्चे खाणेसुद्धा फायदेशीर ठरू शकते.
हळद आणि इतर मसाले
हळद हा भारतीय स्वयंपाकघरात सर्वात जास्त वापरला जाणारा मसाला आहे. तसेच शतकानुशतके हळद हा त्याच्या औषधी गुणधर्मासाठी ओळखला जातो. त्यात कर्क्यूमिन नावाचे कंपाउंड असते, ज्यामध्ये अँटी इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. हळद रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते, पचनक्रिया सुधारते, श्वसनाशी संबंधित आजार दूर करते तसेच गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आजाराचा धोका कमी करते. तुमच्या रोजच्या जेवणात चिमूटभर हळद घाला आणि हळदीचे दूध प्या. हे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. हळद काळे मिरीसारखे काम करते. वेलची, दालचिनी आणि जायफळ हे अँटीमायक्रोबियल आणि अँटीफंगल आहेत.
आतड्यांच्या आरोग्यासाठी दही चांगले
दही हे प्रोबायोटिकयुक्त पदार्थ आहे, जे चांगल्या बॅक्टेरियांच्या वाढीस प्रोत्साहन देते आणि आतडे आरोग्यदायी ठेवण्यास मदत करते. चांगल्या रोगप्रतिकार शक्तीसाठी आतड्यांमध्ये मजबूत मायक्रोबायोम आवश्यक आहे. आतड्यांमधील मायक्रोबायोम रोगप्रतिकारक कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. दह्याचे नियमित सेवन केल्याने गॅस्ट्रोइंटेस्टाइनल इन्फेक्शनचा धोका कमी होतो, तसेच एकूण पचन आणि हृदयाशी संबंधित आरोग्य सुधारते. साधे, साखर न टाकलेल्या दह्याचे सेवन करा आणि आणखी पोषक तत्वे मिळवण्यासाठी हंगामी फळे किंवा जवसाच्या बिया दह्यामध्ये टाका.
मेथी, बडीशेप आणि अक्रोड यांसारखे नट्स आणि बियांमध्ये प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि चांगले फॅट्स असतात. विशेषतः सुकामेवा आणि नट्समध्ये रिबोफ्लेविन (व्हिटॅमिन बी२) आणि नियासिन (व्हिटॅमिन बी३) असतात, जे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात.
पावसाळ्यात आजारांचा धोका कमी करण्यासाठी स्वच्छतेच्या चांगल्या सवयी स्वीकारणे, स्वच्छ पाणी पिणे आणि ताजे तसेच शिजवलेल्या अन्नाचे सेवन करणे आवश्यक आहे.