पुणे : ‘टाइप-१ मधुमेहाचे निदान झाल्यानंतर मुलांचे आयुष्य मर्यादित होते, असा अनेक पालकांचा समज असतो. मात्र, हा समज चुकीचा असून, योग्य उपचार, नियमित इन्सुलिन, रक्तातील साखरेवर सातत्याने नियंत्रण आणि पालक-शिक्षकांच्या सहकार्यामुळे ही मुले इतर मुलांप्रमाणेच शाळेत जाऊ शकतात, खेळू शकतात, सहलींमध्ये सहभागी होऊ शकतात आणि प्रवासाचाही आनंद घेऊ शकतात,’ असे आरोग्यतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
मधुमेहतज्ज्ञ डॉ. सुधा राव म्हणाल्या, ‘भारतात मुलांमध्ये आणि किशोरवयीन मुलांमध्ये ‘टाइप-१’ मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. हा आजार चुकीच्या आहारामुळे किंवा जीवनशैलीमुळे होत नाही. हा एक ऑटोइम्यून विकार असून, शरीराची प्रतिकारशक्ती स्वादुपिंडातील (पॅन्क्रियाज) इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशींवरच हल्ला करते. मुलाची शाळेत अचानक साखरेची पातळी कमी झाली, तर काय होईल, उपचाराचा खर्च कसा भागवायचा आणि मुलाचे भविष्य कसे असेल, अशा अनेक चिंता पालकांना सतावत असतात. त्यामुळे इन्सुलिनबरोबरच योग्य माहिती, मानसिक आधार, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि आपत्कालीन परिस्थितीची तयारीही तितकीच महत्त्वाची आहे.’
बालरोगतज्ज्ञ डॉ. कोचुराणी अब्राहम म्हणाल्या, ‘‘टाइप-१’ मधुमेह हा मुलांच्या आयुष्याला मर्यादा घालणारा आजार नाही. योग्य इन्सुलिन उपचार, नियमित रक्तशर्करा तपासणी, संतुलित आहार आणि शारीरिक हालचाली यांच्या मदतीने ही मुले इतर मुलांप्रमाणेच शिक्षण, खेळ आणि प्रवासाचा आनंद घेऊ शकतात. शाळांमध्ये मधुमेहाबाबत जागरुकता, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची तयारी आणि मुलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण झाल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढतो. तसेच, प्रवासादरम्यान योग्य नियोजन, आवश्यक औषधे आणि रक्तशर्करा तपासणीची साधने सोबत ठेवल्यास कोणतीही अडचण न येता मुलांना सुरक्षित आणि आनंददायी प्रवास करता येतो.’
लक्षणे आणि धोका
- वारंवार लघवी होणे, सतत तहान लागणे, जास्त भूक लागणे, अचानक वजन कमी होणे, थकवा, दृष्टी धूसर होणे आणि वारंवार संसर्ग होणे ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत.
- वेळेवर निदान आणि उपचार न झाल्यास डायबेटिक केटोॲसिडोसिस (डीकेए), तीव्र निर्जलीकरण तसेच डोळे, मूत्रपिंड, मज्जातंतू आणि हृदयावर दीर्घकालीन दुष्परिणाम होऊ शकतात, असे वैद्यकीय तज्ञ सांगतात.
काळजी काय घ्यावी? - शाळेतील वातावरण संवेदनशील आणि सुरक्षित असणे आवश्यक आहे. मुलांच्या आरोग्याची माहिती शिक्षक आणि शाळेतील वैद्यकीय पथकाला देणे, रक्तातील साखर कमी झाल्याची लक्षणे ओळखण्याचे प्रशिक्षण देणे आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी तयारी ठेवणे गरजेचे आहे.
- मुलांकडे इन्सुलिन, ग्लुकोमीटर, ग्लुकोजच्या गोळ्या किंवा ग्लुकोन-डी, पौष्टिक खाऊ, पाण्याची बाटली आणि आपत्कालीन संपर्क क्रमांक असलेले किट कायम असावे. इन्सुलिन घेतल्यानंतर जेवण चुकवू नये, याची विशेष काळजी घ्यावी.
- मुलांना खेळ, क्रीडा स्पर्धा, सहली किंवा इतर शालेय उपक्रमांपासून दूर ठेवण्याची गरज नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. उलट, त्यांना इतर विद्यार्थ्यांप्रमाणे सर्व उपक्रमांत सहभागी करून घेणे, इन्सुलिन घेण्यासाठी शाळेत सुरक्षित व गोपनीय जागा उपलब्ध करून देणे, त्यांच्यावरील चेष्टा किंवा भेदभाव रोखण्यासाठी शाळेने संवेदनशील भूमिका घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
