Modak Calories Ukadiche Modak Diabetes: गणेशोत्सव म्हटला की उकडीचे मोदक आणि प्रसादाचे विविध पदार्थ आलेच. मात्र, वजन नियंत्रण आणि मधुमेहाची काळजी घेणाऱ्यांसाठी “मोदक खावा की नाही?” हा मोठा प्रश्न असतो. उकडीचा मोदक ग्लुटेन फ्री असला तरी तो शुगर फ्री किंवा फॅट फ्री नसतो, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
“पल्लवी, पुढचे काही दिवस आता गणपतीचे आहेत. त्यामुळे माझं डाएट मला नीट फॉलो करता येईल असं काही वाटत नाहीये.” प्रज्ञाचा मेसेज आला. त्यावर तिला म्हटलं, “गणपतीत तू काय काय खाणार आहेस, त्यामुळे तुला वाटतंय की तुझं डाएट बिघडणार आहे?”
मोदक शुगर फ्री नसतो
त्यावर तिने थेट कॉल केला आणि म्हणाली, “हे बघ, मोदक हा माझा वीक पॉइंट आहे आणि आपण गोड बंद केलंय. म्हणजे मला माहिती आहे की तू मला मोदक खायला नाही म्हणत नाहीस; पण मी एकावर नाही थांबू शकत!” प्रज्ञाच्या या वाक्याने मला त्वरित अनेक मोदकप्रेमींपर्यंत पोहोचवलं. गणपतीच्या दिवसांत मोदकाबद्दल लिहिलं नाही, तर मग काय गंमत! गणपती म्हटलं की मोदक आणि त्याबरोबर विविध प्रकारचे प्रसादाचे पदार्थ आलेच. सध्या ‘ग्लुटेन फ्री’, ‘शुगर फ्री’, ‘फॅट फ्री’ अशा विशेषणांसहही मोदकांची चर्चा होते. पण इथेच थोडं थांबायला हवं. तांदळाच्या पिठाचा पारंपरिक उकडीचा मोदक ग्लुटेन फ्री असू शकतो; मात्र तो शुगर फ्री किंवा फॅट फ्री नाही. गूळ आणि खोबरे यामुळे त्यात साखर आणि चरबी दोन्ही असतात. अनेक रेस्टॉरंटमध्ये ‘स्वीट डम्प्लिंग’ म्हणून नव्या रूपात मिळणारा मोदकही या गणितापासून सुटत नाही.

मोदकातील कॅलरीज
मोदकाचा आकार, सारणाचे प्रमाण आणि वापरलेले घटक यानुसार त्याचे पोषणमूल्य मोठ्या प्रमाणात बदलते. त्यामुळे ‘एका मोदकात नेमक्या इतक्याच कॅलरीज’ असे सांगणे योग्य नाही. मोठ्या, भरपूर सारण असलेल्या उकडीच्या मोदकातून साधारण ३०० ते ४०० किंवा त्याहून अधिक कॅलरीज मिळू शकतात. त्यातील बहुतांश ऊर्जा कर्बोदकांमधून येते, तर खोबरे, सुकामेवा किंवा तूप यामुळे चरबीचे प्रमाण वाढते.
उकडीचा मोदक – कमी चरबीयु्क्त पर्याय
उकडीच्या मोदकासाठीचे जिन्नस सोपे आहेत. तांदळाचे पीठ, गूळ, ताजे खोबरे, वेलची पूड आणि पाणी. त्यामुळे तो तळलेल्या मिठाईपेक्षा तुलनेने कमी चरबीयुक्त पर्याय ठरू शकतो. मात्र गुळाला ‘हेल्दी साखर’ समजणे योग्य नाही. गुळात काही खनिजे असली तरी तो मुख्यतः साखरेचाच स्रोत आहे. WHOनुसार आहारातील free sugars चे प्रमाण एकूण ऊर्जेच्या १० टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्याची शिफारस आहे; आणखी कमी म्हणजे ५ टक्क्यांपर्यंत ठेवण्याने अतिरिक्त फायदा होऊ शकतो.
मोदक आणि डायबेटिस
मोदकातील तांदळाचे पीठ आणि गुळामुळे कर्बोदकांचे प्रमाण वाढते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तीने मोदकाला ‘गुळामुळे सुरक्षित’ किंवा ‘खसखस घातल्यामुळे डायबेटिसमध्ये चालणारा’ पदार्थ मानू नये. खसखस, सुकामेवा किंवा इतर घटकांमुळे पोषणमूल्य बदलू शकते; परंतु त्यामुळे मोदकातील एकूण कर्बोदके आणि ऊर्जा नाहीशी होत नाहीत. मधुमेह असणाऱ्या व्यक्तीने प्रमाण, एकूण आहार आणि रक्तातील ग्लुकोज यांचा विचार करून आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याने मोदकाचा समावेश करणे अधिक योग्य.
उकडीचा की, तळलेला मोदक?
मोदकातील अन्नघटक स्वतंत्रपणे वेगवेगळ्या पोषकतत्त्वांचे स्रोत आहेत. खोबऱ्यात चरबी आणि काही तंतू असतात, तर गूळ आणि तांदळाचे पीठ मुख्यतः ऊर्जा आणि कर्बोदके पुरवतात. वाफेवर शिजवल्यामुळे तळण्याच्या तुलनेत अतिरिक्त तेल शोषले जात नाही. त्यामुळे ‘उकडीचा की तळलेला?’ या प्रश्नाचे उत्तर आरोग्याच्या दृष्टीने उकडीच्या मोदकाकडे झुकते. WHOदेखील तळण्याऐवजी वाफवणे किंवा उकडणे यासारख्या पद्धती वापरण्याचा सल्ला देते.
ड्रायफ्रूट मोदक म्हणजे डाएट नव्हे
अलीकडे सुकामेव्याचे मोदकही लोकप्रिय झाले आहेत. बदाम, काजू, खजूर, खोबरे यांसारख्या घटकांमुळे त्यात काही सूक्ष्मपोषक आणि चांगल्या प्रकारच्या चरबींचे प्रमाण वाढू शकते; पण त्याच वेळी ऊर्जा घनताही वाढते. ‘ड्रायफ्रूट मोदक म्हणजे डायट मोदक’ असे समीकरण त्यामुळे चुकीचे ठरू शकते. दूध, खवा, अधिक तूप किंवा साखरेचा वापर झाला तर कॅलरी आणखी वाढतात.
नाचणीचा मोदक
नाचणीच्या उकडीचे मोदक हे तांदळाच्या मोदकापेक्षा अधिक तंतुमय असू शकतात; मात्र ‘नाचणी म्हणजे कमी कॅलरी’ किंवा ‘नाचणीचा मोदक मधुमेहासाठी मोकळेपणाने खाता येतो’ असेही म्हणता येणार नाही. घटकांपेक्षा एकूण प्रमाण आणि संपूर्ण आहारातील कर्बोदकांचे गणित अधिक महत्त्वाचे आहे.
ऊर्जा सेवन आणि खर्च यांचा समतोल महत्त्वाचा
अजून एक मुद्दा येतो तो म्हणजे प्रमाणाचा! ‘एका मोदकावर भागत नाही’ असा डंका पिटताना नियमित व्यायाम विसरून चालणार नाही. मात्र खाल्लेल्या प्रत्येक मोदकाच्या कॅलरी जाळण्यासाठी स्वतंत्र व्यायाम करणे, असा सरळ हिशेबही शरीरशास्त्र सांगत नाही. आरोग्याचा पाया म्हणजे नियमित शारीरिक हालचाल आणि एकूण ऊर्जा संतुलन. WHOच्या मतेही निरोगी आहारात ऊर्जा सेवन आणि ऊर्जा खर्च यांचा समतोल, तसेच विविधता आणि प्रमाण यांना महत्त्व आहे.
इतर पदार्थ कमी खाण्याचा पर्याय
त्यामुळे गणपतीत सूत्र अगदी साधं आहे, ते म्हणजे मोदक टाळायचा नाही; पण मोदकाला जेवणाचा पर्यायही समजायचं नाही. दिवसभरातील इतर गोड पदार्थ, तळलेले पदार्थ आणि अतिरिक्त स्नॅक्स कमी करून एखादा आवडता मोदक निवडता येईल. भरपूर पाणी, नियमित हालचाल आणि संतुलित जेवण यासोबत मोदकाचा आस्वाद घेता येतो.
आरोग्याचा उत्सव महत्त्वाचा
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोदकातील ऊर्जेवर अंकुश ठेवायचा असेल तर तळलेल्या मोदकापेक्षा उकडीचा मोदक निवडणे आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे त्याचे प्रमाण सांभाळणे, हेच अधिक शास्त्रीय गणित आहे. कारण गणपतीचा उत्सव मोदकाशिवाय अपुरा असला, तरी आरोग्याचा उत्सव मोदकांच्या संख्येने ठरत नाही!
