तुम्ही घरात पाऊल ठेवताच अगदी एक मिनिटाच्या आत टॉयलेटमध्ये धावत जाता का? मग या सगळ्यात तुम्ही एकटे नाही आहात, बरं का… याला लॅचकी इन्काँटीनन्स (Latchkey incontinence) असं म्हणतात. लॅचकी इन्काँटीनन्स तेव्हा होते जेव्हा तुमचा मेंदू घरी जाणे आणि लघवी करणे या विचारांना एकत्र जोडतो, ज्यामुळे तुम्हाला अचानक लघवी करण्याची इच्छा होते. तज्ज्ञांचा असा सल्ला आहे की हा एक ‘कंडिशन्ड रिस्पॉन्स’ आहे. कारण- मानसिक घटकांमुळे तुमचे मूत्राशय नेहमी आरामाची अपेक्षा करते.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

“किल्ल्या वाजण्याचा किंवा दरवाजा उघडण्याचा आवाज ऐकल्यावर मेंदूला सिग्नल जातो, ज्यामुळे लघवी करण्याची इच्छा अधिक तीव्र होऊ शकते,” असे डॉ. मुकुंद अंदनकर, कन्सल्टंट युरोलॉजिस्ट, वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल यांनी सांगितले. ही इन्काँटीनन्स तेव्हादेखील होऊ शकते जेव्हा रुग्णांना आपल्या घराचा दरवाजा दिसतो किंवा त्यांना कुठेतरी पाणी वाहण्याचा आवाज ऐकू येतो, अशी माहिती सप्टेंबर २०२४ मध्ये ‘द जर्नल फॉर नर्स प्रॅक्टिशनर्स’ (The Journal for Nurse Practitioners)मध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टमध्ये दिली आहे.

हे सामान्य आहे का?

हो, बहुतेक लोकांना ही स्थिती जाणवते; पण अतिक्रियाशील मूत्राशय किंवा चिंता असलेल्या लोकांमध्ये ही अधिक सामान्य बाब आहे, असे डॉ. अंदनकर सांगितले.

कन्सल्टंट फिजिशियन, डायबेटोलॉजिस्ट व क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट डॉ. हिरन एस. रेड्डी यांनी याबाबत सहमती दर्शवली आणि ते म्हणाले की ‘की-इन-लॉक सिंड्रोम’ अतिक्रियाशील मूत्राशय (OAB), मूत्रमार्गात संसर्ग किंवा कमकुवत पेल्विक फ्लोअर स्नायू असलेल्या व्यक्तींमध्ये अधिक सामान्य बाब आहे, विशेषतः मेनोपॉजनंतरच्या महिला आणि बाळंतपण झालेल्या महिलांना याचा त्रास होतो. “तथापि, प्रोस्टेटच्या (prostate) आजाराने ग्रस्त असलेल्या पुरुषांनाही अशीच लक्षणे जाणवू शकतात,” असे डॉ. रेड्डी म्हणाले.

वरील जर्नल रिपोर्टनुसार, OAB (अधिक सक्रिय मूत्राशय) हा ‘मल्टीफॅक्टोरियल क्लिनिकल सिंड्रोम’ आहे; ज्याची रुग्ण अनेकदा चर्चा करत नाहीत आणि मग त्याचा जीवनाच्या गुणवत्तेवर लक्षणीय परिणाम होतो.

कशी होईल मदत?

जास्त कॅफिनचे सेवन, डिहायड्रेशन आणि काही औषधे यांसारख्या गोष्टींमुळे स्थिती आणखी बिकट होऊ शकते. “केगेल व्यायाम करून पेल्विक फ्लोर स्नायू मजबूत करणे, तसेच ब्लॅडर ट्रेनिंग यांसारख्या गोष्टींचा वापर केल्याने मूत्राशयावर नियंत्रण मिळवण्यास आणि लक्षणे प्रभावीपणे हाताळण्यास मदत होऊ शकते,” असे डॉ. रेड्डी यांनी सांगितले.

“दारातून आत प्रवेश करताना स्वतःचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करावा, असे तज्ज्ञांचे आवाहन आहे. या प्रतिसादावर नियंत्रण ठेवण्यासाठी, ब्लॅडर ट्रेनिंगचा वापर माइंडफुलनेस-आधारित तंत्रांना (mindfulness based techniques) पूरक म्हणून केला जाऊ शकतो,” असे डॉ. अंदनकर पुढे म्हणाले.

काय लक्षात घ्यावे?

जर लघवी करण्याच्या भावनेवर नियंत्रण ठेवणे शक्य होत नसेल किंवा मूत्रगळती होत असेल, तर मूत्राशयासंबंधीची ही समस्या एखाद्या अंतर्निहित वैद्यकीय स्थितीची सूचक असू शकते. “जर हे असेच चालू राहिले, तर नेहमी त्याबाबत वैद्यकीय मदत घ्या,” असे डॉ. रेड्डी यांनी सांगितले.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urge to pee when you enters in your home know expert advice dvr