Vinesh Phogat did sauna for weight loss : पॅरिस ऑलम्पिकच्या अंतिम पेरीसाठी भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट ( Vinesh Phogat) अपात्र ठरली हे ऐकून सर्वच जण हळहळले. अंतिम फेरीसाठी वजन करण्याच्या वेळी विनेश फोगटचे वजन १०० ग्रॅम जास्त होते. पण, या स्पर्धेसाठी वजन कमी करण्यासाठी तिने कोणतीही कसर सोडली नव्हती. अगदी कठीणात कठीण उपायांचा तिने वापर केला; पण शेवटी ती अयशस्वी ठरली.

विनेश फोगटने (Vinesh Phogat) केस कापणे, कपडे लहान करणे यांसह रात्रभरात वजन कमी करण्याचे सर्व कठीण उपाय करून पाहिले. पण, दुर्दैव म्हणजे एवढे सर्व करूनही ती ५० किलो वजनाच्या श्रेणीतील अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकली नाही, असे पॅरिसमधील भारतीय दलाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिनशॉ पार्डीवाला यांनी सांगितले आहे.

डॉक्टर दिनशॉ पार्डीवाला पुढे म्हणाले की, कुस्तीपटू सहसा त्यांच्या नैसर्गिक वजनापेक्षा कमी वजनाच्या गटात भाग घेतात. कारण- त्यांना कमी वजन असलेल्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध नेहमीच फायदा मिळतो. तसेच कुस्तीपटूंच्या सकाळी वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये अन्न, पाण्याचे मोजमाप केलेले निर्बंध समाविष्ट असतात. त्याशिवाय ॲथलीटला घाम येणे आवश्यक असते. त्यामुळे घाम येण्यासाठी ॲथलीट स्टीम रूम किंवा बाथ आणि व्यायाम हा पर्याय निवडतात, असे त्यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा…Masaba Gupta: मसाबा गुप्ता तंदुरुस्त, निरोगी राहण्यासाठी ‘अशा प्रकारे’ खाते पोळी; पण हे खरंच फायदेशीर ठरते का? आहारतज्ज्ञ म्हणतात की…

स्टीम रूम हा वजन कमी करण्याचा जलद मार्ग ठरेल का?

बंगळुरूच्या एस्टर व्हाइटफिल्ड हॉस्पिटलच्या मुख्य सल्लागार व एचओडी डॉक्टर सुचिस्मिता राजमान्या यांनी सांगितले की, स्टीम रूम वा बाथ हा वजन पटकन कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे. पण, ते कसे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

स्टीम रूममध्ये राहिल्याने शरीराचे तापमान आणि हृदयाची गती वाढते; जसे तुम्ही व्यायाम करीत असता तेव्हा तुम्हाला घाम येतो, शरीर नैसर्गिकरीत्या थंड होते. स्टीम रूममध्ये गमावलेले वजन हे प्रामुख्याने पाण्याचे वजन असते आणि त्यामुळे ते तात्पुरते असते. पण, जर तुम्ही स्वतःला रिहायड्रेट केले म्हणजेच पाणी प्यायलात की, पुन्हा शरीरात पाणी जाते, असे डॉक्टर सुचिस्मिता राजमान्या म्हणाल्या आहेत.

saunas rooms म्हणजे स्टीम रूम असतात; ज्या उच्च तापमानात (सामान्यत: १५०° ते २००° दरम्यान) गरम केल्या जातात. तसेच या रूम बसणे किंवा झोपणे यांसाठीच्या बेंचनी सुसज्ज असतात. स्टीम बाथ (आंघोळी)दरम्यान येणऱ्या घामाचे प्रमाण एका तासात ०.६ ते १.० किलोग्रॅमपर्यंत असू शकते. याचा अर्थ असा की, एक तासाच्या स्टीम बाथमध्ये एखादी व्यक्ती संभाव्यतः ०.५ ते १ किलो वजन कमी करू शकते. पण, स्टीम रूमचे तापमान, तेथील आर्द्रता, व्यक्तीच्या घामाचे प्रमाण या घटकांवर वजन कितपत कमी होऊ शकते ते अवलंबून असते, असे वसंत कुंजच्या, फोर्टिस हॉस्पिटलच्या, ॲडिशनल डायरेक्टर डॉक्टर मुग्धा तापडिया म्हणाल्या आहेत.

स्टीम रूम किंवा स्टीम बाथ ही बाब सहसा नियमित घामाद्वारे विषारी पदार्थ बाहेर काढून शरीराच्या डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करते आणि विश्रांतीस प्रोत्साहन देते. तसेच हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचे आरोग्यही सुधारते. तसेच वर्कआउट्समधूनही स्नायूंना बरे होण्यास मदत मिळते, असे डॉक्टर सुचिस्मिता राजमान्या म्हणाल्या आहेत. .

स्टीम रूम किंवा स्टीम बाथ हा व्यायाम किंवा योग्य आहाराचा पर्याय नाही यावर डॉक्टर सुचिस्मिता राजमान्या यांनी भर दिला आहे. अतिगरम वातावरणात राहणे, निर्जलीकरण टाळण्यासाठी भरपूर द्रव पिणे या गोष्टी करताना आपल्या मर्यादा जाणून घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आरोग्य सुधारण्यासाठी चिंता कमी करणे, झोपेची गुणवत्ता वाढवणे या बाबी मदत करू शकतात, असे डॉक्टर सुचिस्मिता राजमान्या म्हणाल्या आहेत.