पुणे : शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणे, डोळ्यांचे आरोग्य जपणे आणि वाढीस चालना देणे यासाठी व्हिटॅमिन ए हे महत्त्वाचे पोषकतत्त्व मानले जाते. मात्र, शरीराला आवश्यक असलेल्या प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात व्हिटॅमिन एचे सेवन केल्यास त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

सध्या अनेकजण डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ओव्हर-द-काउंटर व्हिटॅमिन एची औषधे घेत असल्याचे दिसून येते. मात्र, कोणालाही हे जीवनसत्त्व देण्यापूर्वी त्याची गरज व योग्य मात्रा निश्चित करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, व्हिटॅमिन ए या जीवनसत्त्वाची कमतरता असेल, तर रातांधळेपणा, रोगप्रतिकारक क्षमता कमी होणे, डोळे कोरडे पडणे, ही प्रमुख लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच गोळ्या अथवा डोस घ्यावेत.

बरेच जण डॉक्टरांकडे जाण्याचा कंटाळा करतात आणि जवळच्या औषध विक्रेत्याकडून अथवा ऑनलाइन व्हिटॅमिन एची औषधे मागवली जातात. ऑनलाइन मागवताना रेटिंग पाहिले जाते, हेदेखील चुकीचे असून, शरीराला गरज नसताना नियमितपणे जर व्हिटॅमिन एचे औषध घेतले, तर याचा यकृत आणि जठरावर दुष्परिणाम होऊन त्याचे रूपांतर गंभीर आजारातही होऊ शकते, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञ देतात.

संतुलित आहारात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन ए

आहार तज्ज्ञांच्या मते, व्हिटॅमिन एची कमतरता भरून काढण्यासाठी प्रत्येक वेळेस औषधच घ्यायला पाहिजे, असे नसते, तर संतुलित आहारातूनही मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन एची कमतरता भरून काढणे सहज शक्य आहे. त्यासाठी आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, गाजर, पपई, आंबा यातून चांगल्या प्रमाणात शरीराला व्हिटॅमिन एची पोषक तत्त्वे मिळू शकतात.

तज्ज्ञ काय सांगतात?

‘डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय व्हिटॅमिन ए घेणे चुकीचे आहे. जर यकृत, जठराशी संबंधित व्याधी असतील, तर अशा वेळेस हे औषध मूलभूत तपासणी केल्याशिवाय देऊ नये,’ असे वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सचिन तांबरे यांनी सांगितले.

सेवानिवृत्त मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल जोशी म्हणाले, ‘व्हिटॅमिन ए हे ‘फॅट सोल्युबल’ जीवनसत्त्व आहे. वॉटर सोल्युबल (उदा. व्हिटॅमिन सी किंवा बी-कॉम्प्लेक्स) जीवनसत्त्वांसारखी ती लघवीवाटे शरीराबाहेर पडत नाहीत. जर या गोळ्यांचे डोस अयोग्य पद्धतीने किंवा जास्त प्रमाणात झाले, तर शरीरात ‘हायपरव्हिटॅमिनोसिस’ होऊन यकृत किंवा मूत्रपिंडावर ताण येऊ शकतो.’