Boiled Eggs And Coffee Breakfast Benefits : सकाळच्या वेळी तीन उकडलेली अंडी आणि एक कप कॉफी पिणे हा हाय-प्रोटिन आणि झटपट तयार होणारा नाश्ता म्हणून अनेकांचा आवडता पर्याय आहे. अनेकांना हा नाश्ता आरोग्यदायी वाटू शकतो, पण जर तुम्ही महिनाभर दररोज सकाळी हेच रूटीन फॉलो केले तर शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

दिल्लीतील कैलास दीपक हॉस्पिटलच्या सल्लागार आहारतज्ज्ञ ऋचा शर्मा यांच्या मते, या नाश्त्याचे काही अल्पकालीन फायदे आहेत. अंड्यांमध्ये उच्च दर्जाची प्रथिने (प्रोटिन), हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन डी, बी-व्हिटॅमिन्स आणि कोलीन भरपूर प्रमाणात असतात, तर कॉफीमधून अँटीऑक्सिडंट्स मिळतात.

या प्रकारचा आहार तुम्हाला दीर्घकाळ पोट भरलेले ठेवण्यास मदत करते, भूकेवर नियंत्रण ठेवते आणि वजन कमी करण्यातही मदत करू शकते. सुरुवातीच्या काही दिवसांत अनेकांना भूक कमी लागल्याचे आणि दिवसभरातील खाण्यावर नियंत्रण आल्याचे जाणवते. अंड्यांमधील उच्च प्रथिनांमुळे स्नायू मजबूत राहण्यास मदत होते, ज्यामुळे तंदुरुस्ती (फिटनेस) किंवा डाएटिंगवर लक्ष केंद्रित करणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय वाटू शकतो.

दुष्परिणाम आणि आरोग्याच्या समस्या

ऋचा शर्मा यांनी असेही नमूद केले की, अंड्यांमध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर (फायबरयुक्त पदार्थ), फळे आणि भाज्यांचा अभाव असतो, ज्यामुळे हा नाश्ता पोषणाच्या दृष्टीने अपूर्ण ठरतो. दीर्घकाळ हे रूटीन फॉलो केल्यास ऊर्जेची पातळी कमी होणे, बद्धकोष्ठतेसारख्या पचनाच्या समस्या आणि पोषक तत्त्वांचे शोषण कमी होणे अशा समस्या उद्भवू शकतात. फायबरच्या कमतरतेमुळे आतड्यांच्या आरोग्यावर (Gut Health) परिणाम होऊ शकतो, तर इतर आवश्यक पोषक तत्त्वांच्या अभावामुळे रोगप्रतिकारक शक्ती आणि एकूणच आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

मुंबईतील ग्लेनेगल्स हॉस्पिटलचे ज्येष्ठ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट (पोटविकार तज्ज्ञ) डॉ. शंकर झनवार सांगतात की, फायबरच्या कमतरतेमुळे महिनाभर हे रूटीन फॉलो केल्यास आतड्यांमधील चांगल्या जीवाणूंवर (Gut Bacteria) परिणाम होऊ शकतो.

डॉ. झनवार पुढे सांगतात की, जास्त प्रमाणात अंडी खाल्ल्याने सूज येणे (Bloating), पोटदुखी आणि अतिसार (डायरिया) यांसारख्या पचनाच्या समस्या उद्भवू शकतात, तर कॉफीमधील आम्लता (Acidity) आतड्याच्या अस्तराला धोका निर्माण करू शकतात, ज्यामुळे अस्वस्थता किंवा पोट फुगल्यासारखे वाटू शकते.

संतुलन राखणे महत्त्वाचे

आहारात संतुलन असणे अत्यंत आवश्यक आहे. अंडी आणि कॉफीवर अतिप्रमाणात अवलंबून राहण्याऐावजी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ओट्स चिला, बेसन चिला, व्हेजिटेबल स्मूदी किंवा व्हेजिटेबल उपमा यांसारख्या आरोग्यदायी नाश्त्याच्या पर्यायांचा समावेश करावा, असा सल्ला गॅस्ट्रो तज्ज्ञांनी दिला आहे.