Why is it important to avoid getting wet in the rain: अनेकांना पावसात भिजायला आवडते. पावसाळा सुरू झाला की इच्छा असो किंवा नसो, आवडत असो किंवा नसो अनेकदा आपल्याला पावसात भिजावे लागते. कोरडे राहण्याचा कितीही प्रयत्न केला तरी मुसळधार पावसासमोर आपले काहीही चालत नाही. अनेकदा पाणी साचलेल्या रस्त्यातून नागरिकांना ये-जा करावी लागते किंवा वाहतूक कोंडीमुळे रस्ते ठप्प होतात, अशावेळी लोक बराच वेळ पावसात भिजतात.

थोड्याशा पावसात भिजल्याने फारसा त्रास होत नसला तरी बराच वेळ ओल्या स्थितीत राहिल्याने आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. याबाबत ‘द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना दिल्ली येथील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्स अंतर्गत औषधांचे वरिष्ठ सल्लागार म्हणून कार्यरत असलेले डॉ. सुरणजीत चॅटर्जी यांनी पावसात भिजण्याबाबत चेतावणी दिली आहे. “पावसात भिजल्यानंतर व्यक्ती बराच वेळ ओल्या कपड्यांमध्ये राहिल्यास ते शरीरातील उष्णता काढून टाकते आणि शरीराच्या तापमानाचे नियमन करण्याची क्षमता धोक्यात येते, ज्यामुळे हायपोथर्मियाचा (hypothermia) धोका वाढतो. असामान्यपणे शरीराचे तापमान कमी झाल्यास ही स्थिती उद्भवते, ज्यामध्ये रुग्णाला हुडहुडी भरते, तो गोंधळतो. तसेच काही गंभीर प्रकरणांमध्ये, रुग्ण बेशुद्ध होऊ शकतो, असेही डॉ. चॅटर्जी यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – “प्रेग्नन्सीदरम्यान माझे ३५ किलो वजन वाढले होते”, सोनम कपूरने केला खुलासा; डॉक्टरांनी सांगितले कारण

डॉ. चॅटर्जी यांच्या मते, “दीर्घकाळापर्यंत ओले राहिल्यास हायपोथर्मियाशिवाय त्वचेच्या संरक्षणात्मक प्रणाली कमकुवत होऊ शकतात, ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. बराच काळ पावसात भिजल्यास त्वचा सुरकतल्यासारखी दिसते. जे जीवाणू आणि बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार करू शकते.”

हेही वाचा – जीवघेणा लव्ह बाईट! Hickey मुळे तुम्हाला स्ट्रोक कसा होऊ शकतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…

तुम्ही बराच काळ पावसात अडकल्यास काय करावे? (What to do if you are stuck in the rain for a long time?

हे धोके कमी करण्यासाठी शक्य तितक्या लवकर पावसापासून आश्रय घेणे सर्वोत्तम उपाय आहे. घरामध्ये पोहचताच ओले कपडे ताबडतोब काढून टाका आणि शरीर पूर्णपणे कोरडे करणे आवश्यक आहे. उबदार पेये प्या, जे शरीराचे मूळ तापमान नियंत्रित करण्यात मदत करू शकते, परंतु मद्यपान टाळा; कारण ते शरीराला नुकसान पोहचवू शकते.

डॉक्टर चॅटर्जी यांनी सल्ला दिला की, “हायपोथर्मियाची लक्षणे, जसे की थरथरणे, गोंधळणे किंवा अस्पष्ट बोलणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे संसर्गाची कोणतीही चिन्हे, जसे की लालसरपणा, सूज किंवा पू येणे आढळल्यास त्वरित तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्या.

संभाव्य धोके समजून घेऊन आणि योग्य ती खबरदारी घेतल्यास, व्यक्ती बराचवेळ पावसात भिजल्यानंतरही संबंधित आरोग्याचे धोके लक्षणीयरीत्या कमी करू शकते.