Health Benefits Of Swimming : पोहणे हा केवळ एक व्यायाम नसून, एक पूर्ण बॉडी वर्कआउट आहे; कारण यात तु्म्हाला संपूर्ण शरीराची हालचाल करावी लागते. संपूर्ण शरीरावर कमी ताण देणारा (low-impact) हा व्यायाम प्रकार मानसिक शांततेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. पण, जर तुम्ही सलग एक महिना रोज पोहण्याचा निश्चय केला तर तुमच्या शरीरात नेमके काय बदल होतात? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, रोज पोहणे खरोखरच फायदेशीर आहे का? या प्रश्नांची उत्तरं आपण डॉक्टरांकडून सविस्तर जाणून घेऊ…
इंडियन एक्स्प्रेसने मुंबईतील ग्लेनेगल्स हॉस्पिटलच्या कन्सल्टंट – इंटरनल मेडिसिन, डॉ. मंजुषा अग्रवाल यांच्याशी याबाबत चर्चा केली, ज्यावर डॉ. मंजुषा अग्रवाल म्हणाल्या की, रोज पोहल्याने शरीराला केवळ फिटनेसपेक्षाही बरेच मोठे फायदे मिळतात.
१. हृदय मजबूत होते आणि स्टॅमिना वाढतो
रोज पोहल्यामुळे सर्वात पहिला आणि महत्त्वाचा फायदा तुमच्या हृदयाला होतो. सातत्याने पोहल्याने हृदयाचे कार्य सुधारते, ज्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण (blood circulation) वेगवान होते आणि हृदय व रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता (cardiovascular endurance) वाढते. डॉ. मंजुषा अग्रवाल सांगतात, रोज पोहल्याने हृदय मजबूत होते, रक्तप्रवाह सुधारतो आणि एकंदरीत शारीरिक स्टॅमिना वाढतो. याचा अनुभव तुम्हाला दैनंदिन जीवनात येऊ लागतो; जसे की पायऱ्या चढताना दम न लागणे किंवा न थकता जास्त वेळ पोहणे.
२. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते
इतर व्यायामांच्या तुलनेत पोहताना श्वासोच्छवासावर नियंत्रण ठेवावे लागते. महिनाभर हे सातत्याने केल्यास फुप्फुसांवर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. डॉ. अग्रवाल यांच्या मते, “पोहण्यामुळे नियंत्रित श्वास घेण्याची सवय लागते, ज्यामुळे फुप्फुसांची क्षमता वाढते आणि शरीर ऑक्सिजनचा अधिक प्रभावीपणे वापर करू शकते. यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी सुधारते आणि इतर शारीरिक कष्टांची कामे करतानाही फायदा होतो.
३. वजन कमी होते आणि स्नायू टोन्ड होतात
पोहताना पाण्याचा रोध (water resistance) असल्यामुळे संपूर्ण शरीराला सतत मेहनत करावी लागते. डॉ. अग्रवाल सांगतात, रोज पोहल्याने मोठ्या प्रमाणावर कॅलरीज बर्न होतात आणि संपूर्ण शरीराची हालचाल होत असल्याने वजन कमी करण्यास मोठी मदत होते. यासह जिममधील जड वजनांचा ताण न घेता हात, पाय, पोट आणि पाठीचे स्नायू मजबूत व सुडौल (toned) बनतात. एका महिन्यात तुमचे शरीर अधिक सुटसुटीत आणि संतुलित दिसू लागते.
४. सांध्यांना आराम मिळतो, लवचिकता वाढते
पोहण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पाण्याचा शरीराला मिळणारा आधार. पाण्यामुळे शरीराचे वजन हलके वाटते, ज्यामुळे सांध्यांवर अजिबात ताण येत नाही. डॉ. अग्रवाल स्पष्ट करतात, नियमित पोहणे सांध्यांसाठी अतिशय सौम्य असते. पाणी शरीराचे वजन पेलत असल्यामुळे सांध्यांवरचा ताण कमी होतो आणि दुखापतीचा धोका टळतो. याच वेळी, पाण्याच्या प्रवाहातील हालचालींमुळे शरीराची लवचिकता (flexibility) आणि गतिशीलता वाढते.
५. मन शांत आणि संतुलित राहते
शारीरिक फायद्यांइतकेच पोहण्याचे मानसिक फायदेही थक्क करणारे आहेत. पोहण्याची एक ठराविक लय असते — श्वास घेणे, हाता-पायांची हालचाल आणि पाण्यात तरंगणे — यामुळे मन एकाग्र होते. डॉ. अग्रवाल म्हणतात, नियमित पोहण्यामुळे शरीरात ‘एंडोर्फिन’सारखे आनंदी संप्रेरक (feel-good hormones) तयार होतात, ज्यामुळे मानसिक ताण कमी होतो आणि मनाला शांतता लाभते, यामुळे नैराश्य दूर होऊन मूड सुधारतो.
पण लक्षात ठेवा… अति तिथे माती!
कोणतीही विश्रांती न घेता रोज अतिप्रमाणात पोहल्यास शरीराला थकवा येऊ शकतो किंवा स्नायू दुखावू शकतात, विशेषतः खांद्याला दुखापत होण्याची शक्यता असते. डॉ. अग्रवाल सतर्क करतात की, पुरेशी विश्रांती न घेता रोज पोहल्यास स्नायूंचा थकवा, खांद्यांवर ताण आणि ओव्हरयुज इंज्युरी (overuse injuries) होऊ शकतात, त्यामुळे व्यायामामध्ये समतोल राखणे गरजेचे आहे. आठवड्यातून काही दिवस हलके पोहावे किंवा शरीराला पूर्ण विश्रांती द्यावी.
(टीप- कोणतेही उपाय, व्यायाम प्रकार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
