भारतात सर्वत्र नारळ मिळतात. देशात मोठ्या प्रमाणावर लोक नारळ पाण्याचे सेवन करतात. नारळ पाणी फक्त चवीलाच गोड नसते तर त्यामुळे अनेक फायदेही मिळतात. नारळाच्या पाण्यात आढळणारे कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि सोडियम यांपासून शरीराला अनेक पौष्टिक घटक मिळतात. इतकेच नाही, तर नारळाच्या पाण्यात ९४ टक्के पाणी असते, जे शरीराला पूर्णपणे हायड्रेट ठेवण्यास मदत करते. कमी कॅलरीज आणि कमी फॅट फूल आहार म्हणून नारळ पाण्याचे सेवन केलं जातं. कोणीही आजारी असल्यास या व्यक्तीला पाहण्यासाठी लोक नारळ पाणी घेऊन जातात.

शरीरातील पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी किंवा कोणत्याही आजारासाठी डॉक्टर नेहमी नारळ पाणी पिण्याचा सल्ला देतात. नारळाचे पाणी शरीरासाठी इतके फायदेशीर आहे की, त्याचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत. थंडीच्या या दिवसांमध्ये बहुतेक लोकांना स्कीनशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तर अशावेळी या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी नारळ पाणी फायदेशीर ठरते. पण, नारळाचं पाणी दररोज प्यायल्याने शरीरावर कोणते परिणाम होतात तुम्हाला माहिती आहे का..? याच प्रश्नाचे उत्तर गुरुग्राम नारायण हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ मोहिनी डोंगरे यांनी दिले असल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसनी दिले आहे.

आहारतज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, नारळ पाणी पिणे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स, लॉरिक ॲसिड, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि झिंक भरपूर प्रमाणात असते, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. नारळाच्या पाण्यात पोटॅशियम असते जे कॅलरीज कमी करण्यास मदत करते. नारळ पाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. कारण त्यात पोटॅशियम असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवते. त्याचप्रमाणे  रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास आणि हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यास नारळ पाणी मदत करते. कारण त्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त आहे.  

(हे ही वाचा : पंतप्रधान मोदींच्याही आहाराचा भाग असलेल्या शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने झपाट्याने वजन कमी होऊ शकते? तज्ज्ञांनी दिलं उत्तर…)

याव्यतिरिक्त, तुम्हाला थकवा किंवा तणाव जाणवत असेल तर नारळ पाणी प्यायल्याने तुम्हाला रिलॅक्स आणि फ्रेश वाटू शकते. नारळाच्या पाण्यात भरपूर खनिजे, इलेक्ट्रोलाइट्स आणि अँटिऑक्सिडंट असतात, जे तुमची ऊर्जा पातळी त्वरित वाढवण्यास मदत करतात. व्यायाम करताना नारळ पाणी प्यायल्यास थकवा आणि डिहायड्रेशनची समस्या कमी होण्यास मदत होते.

नारळ पाणी नियमित सेवन करणे योग्य आहे का?

काही अभ्यासातून असे दिसून आले की, नारळाच्या पाण्याचे सेवन केल्याने किडनी स्टोनची समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते. नारळ पाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे आहेत. परंतु, नारळाचे पाणी एक पौष्टिक पेय असले तरी संयम महत्वाचा आहे. कारण, जास्त प्रमाणात नारळाचे पाणी सेवन केल्याने कॅलरी आणि साखरेचे प्रमाण वाढू शकते, ज्यामुळे वजन व्यवस्थापनावर परिणाम होऊ शकतो.

कोणत्याही पदार्थाचे अतिसेवन शरीरासाठी घातक ठरत असतं. जर शरीरात नारळाच्या पाण्याचे प्रमाण जास्त वाढले, तर पोटाच्या समस्येने ग्रस्त लोकांना अतिसाराची समस्या उद्भवू शकते. अशा परिस्थितीत नारळाच्या पाण्याचे कमी प्रमाणात सेवन करणे उत्तम ठरेल. नारळाच्या पाण्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने एखाद्या व्यक्तीमध्ये हायपरक्लेमिया (पोटॅशियम टॉक्सिसिटी) होऊ शकतो. त्यामुळे आहारतज्ज्ञ म्हणतात, आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी आपल्या डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Story img Loader