Benefits Of Leaving Tea For 90 Days : तुमच्यापैकी अनेकजण चहा न पिण्याचा निर्णय घेतात. पण काही दिवसांनी पुन्हा तीच सवय सुरु ठेवतात. पण, जर तुम्ही सलग तीन महिने चहा पिणे बंद केले, तर तुमच्या शरीरात नेमके काय बदल घडतील? हे समजून घेण्यासाठी इंडियन एक्सप्रेसने ठाण्याच्या ‘किम्स हॉस्पिटल्स’चे (KIMS Hospitals) डायबेटॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. विजय नेगलूर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, याचे परिणाम व्यक्तीच्या चहा पिण्याच्या प्रमाणावर आणि प्रत्येकाच्या शरीरावर वेगवेगळे असू शकतात.
डॉ. नेगलूर म्हणाले, जे लोक दिवसातून अनेक वेळा चहा पितात, त्यांच्या शरीरात सुरुवातीला कॅफिनच्या कमतरतेमुळे काही लक्षणे दिसू शकतात. मात्र, हळूहळू शरीर या बदलाशी जुळवून घेते. त्यानंतर लोकांना त्यांच्या ऊर्जा पातळीत (Energy levels), झोपेच्या गुणवत्तेत आणि चहावरील अवलंबित्वात सकारात्मक बदल जाणवू लागतात.
पहिल्या दोन आठवड्यांत काय बदल होतात?
नियमित चहा पिणाऱ्यांसाठी सुरुवातीचे एक ते दोन आठवडे सर्वात कठीण असू शकतात. डॉ. नेगलूर यांनी सांगितले की, सुरुवातीला काहींना डोकेदुखी, थकवा, चिडचिड होणे, एकाग्रता न लागणे किंवा चहा पिण्याची तीव्र इच्छा (Cravings) होणे अशा समस्या जाणवू शकतात. ही लक्षणे प्रामुख्याने कॅफिनच्या कमतरतेमुळे (Caffeine Withdrawal) दिसतात आणि ती तात्पुरती असतात. जसजसे शरीर या बदलाशी जुळवून घेईल, तसतसा हा त्रास कमी होतो.
सुरुवातीच्या टप्प्यानंतर काय होते?
तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यादरम्यान अनेक लोकांना शारीरिक आणि मानसिक पातळीवर अधिक संतुलित वाटू लागते. त्यांची ऊर्जा पातळी दिवसभर स्थिर राहते. चहा पिल्यानंतर मिळणारी तात्पुरती ऊर्जा आणि नंतर येणारा थकवा (Highs and Lows) थांबतो. अनेकांची चहाची ओढ कमी होते आणि ताजेतवाने राहण्यासाठी चहाची गरज भासणे बंद होते, असे डॉ. नेगलूर यांनी स्पष्ट केले.
चहा सोडल्याने झोपेवर परिणाम होतो का?
होय, नक्कीच,” डॉ. नेगलूर यांनी दुजोरा दिला. चहामध्ये कॅफिन असते. त्यामुळे चहा पिणे बंद केल्यास किंवा प्रमाण कमी केल्यास शांत झोप लागण्यास मदत होते. विशेषतः जे लोक संध्याकाळनंतर किंवा रात्री चहा पितात, त्यांच्या झोपेची गुणवत्ता सुधारते. चांगली झोप मिळाल्यामुळे दिवसा कामावर लक्ष केंद्रित करणे सोपे जाते, मूड चांगला राहतो आणि आरोग्यात सुधारणा होते.
पचनसंस्थेला काही फायदा होतो का?
काही लोकांसाठी हे नक्कीच फायदेशीर ठरते. डॉ. नेगलूर यांच्या मते, जे लोक सकाळी रिकाम्या पोटी चहा पितात, त्यांना चहा सोडल्यानंतर अॅसिडिटी (पित्त), पोट फुगणे किंवा पोटातील अस्वस्थता यासारख्या समस्यांपासून आराम मिळू शकतो. मात्र, पचनाशी संबंधित फायदे हे त्या व्यक्तीच्या इतर खाण्याच्या सवयी आणि जीवनशैलीवरही अवलंबून असतात.
तीन महिन्यांनंतर (९० दिवसांनी) कोणते बदल दिसतात?
९० दिवसांच्या शेवटी शरीर पूर्णपणे या बदलाशी जुळवून घेते. अनेक लोकांना गाढ झोप येणे, दिवसभर स्थिर ऊर्जा मिळणे, कॅफिनची ओढ पूर्णपणे संपणे आणि स्वतःच्या दैनंदिन दिनचर्येवर अधिक नियंत्रण मिळवणे शक्य होते. जर आधी चहाचे प्रमाण खूप जास्त असेल, तर चहा सोडल्याने अति-कॅफिनचा धोका टळतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. याशिवाय, दातांवर पडणारे चहाचे डागही हळूहळू कमी होतात, अशी माहिती डॉ. नेगलूर यांनी दिली.
आरोग्यासाठी प्रत्येकानेच चहा सोडणे गरजेचे आहे का?
अजिबात नाही, असे डॉ. नेगलूर यांनी स्पष्ट केले. मर्यादित प्रमाणात चहा पिणे हे निरोगी जीवनशैलीचा भाग असू शकते. “समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा चहाचे अतिसेवन केले जाते किंवा थकवा घालवण्यासाठी दिवसातून अनेक कप चहावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे चहा पूर्णपणे बंद करण्याऐवजी, आपल्या खाण्याच्या सवयी, झोप, व्यायाम आणि तणावाचे व्यवस्थापन यावर लक्ष देणे अधिक महत्त्वाचे आहे.
