मानवाचे शरीर ६०% पाण्याने बनले आहे, म्हणजेच पाणी प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य घटकांपैकी एक आहे. निरोगी राहण्यासाठी दररोज पुरेशा प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण काही जणांना कामाच्या गडबडीत, व्यस्त शेड्युलमध्ये योग्य प्रमाणात पाणी पिता येत नाही. तर याउलट काही जणांना जास्त पाणी पिण्याची सवय असते. या जास्त पाणी पिण्याच्या सवयीमुळे ओव्हरहायड्रेशन होऊ शकते. योग्य प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते.
जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाईट्सचे संतुलन बिघडू शकते. तसेच यामुळे रक्तातील सोडीयमचे प्रमाण कमी होऊ शकते. यामुळे हायपोनेट्रेमिया ही स्थिती उद्भवू शकते. यामध्ये अस्वस्थ वाटणे, डोकेदुखी, चिडचिड होणे ही लक्षणं दिसून येतात. यासह जास्त पाणी प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतो जाणून घ्या.
जास्त पाणी पिण्याचे दुष्परिणाम:
स्नायूंमध्ये वेदना जाणवणे
गरजेपेक्षा जास्त पाणी पिल्यास स्नायूंमध्ये वेदना जाणवणे किंवा क्रॅम्प सारखा त्रास जाणवू शकतो. जास्त पाणी प्यायलाने रक्तातील सोडीयमसह इतर इलेक्ट्रोलाइट्स पातळ होतात. ज्यामुळे क्रॅम्प किंवा इतर शारीरिक वेदना जाणवू शकतात.
किडनीवर ताण पडतो
जास्त पाणी प्यायल्याने सतत लघवीला लागते. यामुळे किडनीवर ताण पडतो. हे किडनीच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते.
जुलाब
जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील पोटॅशिअमची पातळी कमी होते. यामुळे जुलाब होऊ शकतात, तसेच यामुळे सतत घाम येण्याची समस्याही सतावते.
आणखी वाचा: औषधांच्या पाकिटावर लाल रेष का असते? जाणून घ्या यामागचे महत्त्वाचे कारण
हायपोनेट्रेमिया
यामध्ये रक्तातील सोडीयमचे प्रमाण कमी होते. हृदय आणि किडनीचे आजार असणाऱ्या व्यक्तींसाठी ही स्थिती अत्यंत धोकादायक ठरू शकते.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)