Blood sugar level 300 Here’s what to do: भारतातील अनेक जण हे मधुमेहग्रस्त आहेत. मधुमेह हा जीवनशैलीमुळे झपाट्याने वाढणारा आजार आहे. दुर्दैवाने यावर कोणताही इलाज नाही. एकदा का मधुमेहाची लागण झाली, तर तुम्हाला त्याच्यासोबतच जगावे लागते. मधुमेह असलेल्या लोकांना विशेषत: उच्च किंवा कमी रक्तातील साखरेचा सामना करावा लागतो, ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. आजकाल मधुमेह, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी-जास्त होणे ही सामान्य बाब झाली आहे. रक्तातील साखर नियंत्रणात नसेल, तर इतर अवयवांसह एकंदरीत आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी, अयोग्य वेळा आणि शारीरिक कष्टाचा अभाव यांमुळे मधुमेहासारखे आजार मागे लागतात. मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची पातळी वाढणे ही चिंताजनक परिस्थिती आहे. कारण- त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांच्या आरोग्यासंबंधित समस्या वाढू शकतात.
मधुमेहाच्या रुग्णांची सर्वांत मोठी समस्या ही आहे की, त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी रिकाम्या पोटी जास्त राहते. पण, जेवणानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर ही पातळी आणखी वाढते. खाल्ल्यानंतर अनेक रुग्णांच्या रक्तशर्करेची पातळी ३०० च्या पुढे जाते. जर ही पातळी ३०० च्या पुढे गेली, तर ते चिंतेच कारण ठरू शकते. जेवणानंतर रक्तातील साखर वाढू नये यासाठी काय कराल? याचविषयी दिल्लीतील सी. के. बिर्ला हॉस्पिटलच्या इंटर्नल मेडिसिनच्या संचालक डॉ. मनीषा अरोरा यांनी उपाय सुचविल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. यासंबंधी सविस्तर जाणून घेऊ..
डॉ. अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुमच्या आहारामध्ये गोड किंवा केकसारखे उच्च ग्लायसेमिक किंवा कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखर वेगाने वाढू शकते. त्यामुळे जेवणानंतर रक्तातील साखरेच्या वाढीचे व्यवस्थापन करण्यासाठी निरोगी जीवनशैलीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. साधारणपणे रक्तातील ग्लुकोजची पातळी १४० mg/dL पेक्षा कमी असेल, तर ती सामान्य मानली जाते. परंतु, ती २०० mg/dL वर असेल तर तुमच्या रक्तातील साखर वाढली आहे, असा त्याचा अर्थ होतो. परंतु ती ३०० mg/dL वर गेली असेल, तर ती खूप घातक ठरू शकते. अशा वेळी तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
डायबिटीस एक मेटाबॉलिक डिसीज आहे, ज्यात रक्तशर्करेची पातळी वाढू लागते. असे तेव्हा होते जेव्हा शरीरात इन्सुलिन या संप्रेरकाची पातळी कमी होऊ लागते. अनेकदा इन्सुलिन तयार तर खूप होते; पण शरीर त्याचा वापर करू शकत नाही. जर कोणा व्यक्तीची रक्तशर्करा ३०० एमजी/डीएल किंवा त्यापेक्षा अधिक असेल, तर ते फार धोकादायक मानले जाते.
जेवणानंतर रक्तशर्करा न वाढण्यासाठी काय कराल?
खाल्ल्यानंतर अनेक रुग्णांच्या रक्तशर्करेची पातळी ३०० च्या पुढे जाते. जर तुम्ही मिठाई, ब्रेड, भात, पास्ता व बटाटे यांसारख्या पदार्थांचे सेवन करीत असाल, तर ते खाल्ल्यानंतर तुमच्या रक्तशर्करेची पातळी वाढण्याची शक्यता आहे. म्हणून आपल्या आहारात कमीत कमी गोड पदार्थांचा समावेश करा. या गोष्टींचा आहारात कमीत कमी समावेश करणे किंवा हे पदार्थ पूर्णपणे टाळणे कधीही चांगले होय.
- रक्तातील साखर वाढू नये यासाठी तुम्ही कमी ग्लायसेमिक इंडेक्स (GI) असलेले पदार्थ खावेत.
- आहारात फायबरयुक्त पदार्थ, प्रथिने व आरोग्यदायी चरबीचा समावेश करा.
- व्यायाम करा. वेगाने चालणे, सायकल चालवणे किंवा पोहणे यांसारख्या क्रिया रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात मदत करू शकतात.
- तणाव कमी करा.
- पुरेशी झोप घ्या
- साखर आणि किटोन्स वारंवार तपासा
- डाॅक्टरांशी संपर्क साधा.
- औषधांचा आढावा घ्या.
साखर नियंत्रित ठेवण्यासाठी काय खावे?
खाण्या-पिण्याच्या सवयी नीट ठेवाव्यात. काही पदार्थ हे ग्लुकोजचे नियमन करण्यास मदत करतात; तर इतर पदार्थ त्याउलट म्हणजे शरीरातली साखर वाढविण्याचे कार्य करतात. तेव्हा शक्य तितक्या भाज्या खाण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिलाय.