When Is the Body Ready for Sex?: शारीरिक संबंध (सेक्स) म्हटलं की, काहीतरी वाईट किंवा चुकीचं असाच समज आजही आपल्या समाजात आहे. त्यामुळे, आयुष्यात पहिल्यांदा त्या अनुभवाला सामोरे जाताना मनात भीती आणि अनेक प्रश्न असतात. किंबहुना पहिल्या समागमाची योग्य वेळ कोणती? पहिल्यांदा संभोग करताना वेदना आणि रक्तस्राव होतो का? आणि ते गरजेचे असतेच का? पहिल्याच संभोगानंतर गर्भधारणा होऊ शकते का? शरीरातील नेमक्या कोणत्या बदलानंतर शरीर समागमासाठी तयार असत? एखाद्या मुलीला मासिक पाळी सुरू झाली, मुलाचा आवाज बदलला किंवा शरीरात लैंगिक आकर्षण जाणवू लागले म्हणजे शरीर समागमासाठी तयार झाले, असे असते का? या आणि अशा काही महत्त्वाच्या प्रश्नांचा हा शास्त्रीय आढावा.
या प्रश्नांची उत्तरं केवळ एका वयाच्या आकड्यात देता येत नाहीत. वैद्यकीय विज्ञानानुसार पौगंडावस्थेत प्रजननक्षमता विकसित होणे आणि एखादी व्यक्ती सुरक्षित लैंगिक संबंधासाठी शारीरिक, मानसिक, सामाजिक व कायदेशीरदृष्ट्या तयार असणे या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. शरीरात प्रजननक्षमता निर्माण झाली म्हणून सेक्स करणे आवश्यक किंवा सुरक्षित ठरत नाही.
सेक्ससाठी ‘योग्य वय’ ही संकल्पना
पहिल्यांदा सेक्स करण्यासाठी शरीर नेमके कोणत्या वयात तयार होते, यासाठी एक ठरावीक असा वैज्ञानिक आकडा नाही. व्यक्तिनुसार पौगंडावस्थेचे वय बदलते. पौगंडावस्थेबरोबर मेंदूचा भावनिक व निर्णयक्षमतेशी संबंधित विकास होत असतो, नातेसंबंध समजून घेण्याची क्षमता, स्वतःच्या मर्यादा आणि जोखीम समजून घेण्याची क्षमता यांचाही विकास होत असतो. त्यामुळे शारीरिकदृष्ट्या प्रजननक्षम असणे आणि सेक्ससाठी आपण पूर्ण तयार आहोत याची गल्लत करू नये.
सुरक्षित निर्णयासाठी किमान पुढील गोष्टी महत्त्वाच्या ठरतात:
- कायदेशीर वय
- दबावाशिवाय स्पष्ट संमती
- गर्भधारणा कशी होते याची माहिती
- गर्भनिरोधकांची माहिती
- STI पासून संरक्षण
- कंडोम योग्यरीत्या वापरण्याची क्षमता
- “नको” किंवा “थांब” म्हणण्याचे स्वातंत्र्य
- अनपेक्षित गर्भधारणा किंवा STI झाल्यास मदत कुठे घ्यायची याची माहिती
- भारतीय कायद्याचा महत्त्वाचा संदर्भ
कायदा काय सांगतो?
भारतात ‘Protection of Children from Sexual Offences (POCSO) Act’ अंतर्गत १८ वर्षांखालील व्यक्तीला बालक मानले जाते आणि त्यामुळेच लैंगिक कृतीसाठी त्याची/ तिची संमती कायदेशीर मानली जात नाही. किशोरवयीन मुला-मुलींमधील परस्पर संमतीच्या संबंधांबाबत या कायद्यावर वैद्यकीय व कायदेविषयक क्षेत्रात चर्चा सुरू असली, तरी सध्याच्या कायदेशीर चौकटीत १८ वर्षे ही अत्यंत महत्त्वाची मर्यादा आहे. म्हणून जैविक क्षमता आणि कायदेशीर परवानगी यांची गल्लत करू नये, अशे तज्ज्ञ सांगतात.
पौगंडावस्था आणि शारीरिक परिपक्वता
पौगंडावस्थेत मेंदूतील हायपोथॅलॅमिक- पिट्यूटरी- गोनाडल (hypothalamic-pituitary-gonadal) प्रणाली सक्रिय होते. इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन आणि टेस्टोस्टेरॉनसारख्या हार्मोन्समुळे शरीरात अनेक बदल होतात. मुलींमध्ये स्तनांची वाढ, जननेंद्रियांचा विकास, शरीरावरील केस आणि मासिक पाळी सुरू होऊ शकते. मुलांमध्ये अंडकोष आणि लिंगाचा विकास, शुक्राणू निर्मिती, आवाज बदलणे आणि शरीरावरील केस वाढणे असे बदल दिसतात.
या शारीरिक बदलांचा अर्थ शरीर प्रजननक्षमतेकडे जात आहे, असा होतो; पण यावरून लैंगिक संबंध सुरक्षित, सुखद किंवा मानसिकदृष्ट्या योग्य ठरतील असे म्हणता येत नाही. किशोरवयात शरीर विकसित होत असतानाच निर्णयक्षमता, सामाजिक परिणाम समजून घेणे आणि नातेसंबंधातील सीमांची जाणीव यांचाही विकास होत असतो. त्यामुळे केवळ शरीराच्या बाह्य स्वरूपावरून समागमासाठी एखादी व्यक्ती तयार आहे, अथवा नाही हे ठरवता येत नाही.
“पौगंडावस्थेत मुला-मुलींमध्ये होणारे शारीरिक आणि लैंगिक बदल नैसर्गिक आहेत. या वयात त्यांना योग्य व्यक्तीकडून शास्त्रीय लैंगिक शिक्षण मिळणे गरजेचे आहे. योग्य माहितीमुळे गैरसमज आणि धोकादायक प्रयोगांची शक्यता कमी होते तसेच लैंगिकतेकडे जबाबदारीने पाहण्याची समज विकसित होते.”
मासिक पाळी सुरू होणे, म्हणजे सेक्ससाठी शरीर तयार आहे का?
पहिली मासिक पाळी मिनार्की (menarche) ही प्रजननसंस्थेच्या विकासातील एक महत्त्वाची घटना आहे. परंतु तिचा अर्थ फक्त एवढाच की, शरीराने मासिक चक्राच्या दिशेने कार्य सुरू केले आहे. पहिल्या काही वर्षांत मासिक चक्र अनियमित असू शकते आणि प्रत्येक महिन्यात अंडोत्सर्ग होईलच असे नाही. दुसरीकडे, अंडोत्सर्ग नेमके कधी होईल हेही सहज सांगता येत नाही.
पाळी आधीच्या अंडोत्सर्गाचे अर्थ
महत्त्वाची बाब अशी की, मासिक पाळी येण्याआधी अंडोत्सर्ग होतो. त्यामुळे सैद्धांतिकदृष्ट्या पहिली पाळी दिसण्यापूर्वी झालेल्या पहिल्या अंडोत्सर्गाच्या काळातही गर्भधारणा शक्य असू शकते. म्हणून पाळी आली आहे म्हणजे आता सेक्स सुरक्षित आहे किंवा पाळी अजून सुरू झालेली नाही म्हणजे गर्भधारणा होणार नाही हे दोन्ही निष्कर्ष चुकीचे आहेत.
शरीराची उत्तेजना आणि नैसर्गिक ओलावा
शरीर लैंगिकदृष्ट्या उत्तेजित झाल्यावर योनीच्या आसपास रक्तप्रवाह वाढतो आणि नैसर्गिक ओलावा तयार होतो. शरीरातील हे बदल पेनेट्रेशन (penetration) अधिक सुकर करण्यात मदत करतात. परंतु ओलावा किती निर्माण होईल हे व्यक्तीनुसार आणि परिस्थितीनुसार बदलते. भीती, ताण, घाई, वेदनेची अपेक्षा, काही औषधे किंवा अपुरी उत्तेजना यामुळे ओलावा कमी असू शकतो. यामुळे घर्षण वाढून जळजळ, वेदना किंवा सूक्ष्म जखमा होऊ शकतात. म्हणून पेनेट्रेशन करणे हे सहन करण्याचे काम नाही. वेदना होत असल्यास थांबणे योग्य होय. आवश्यक असल्यास कंडोमला सुसंगत water-based किंवा silicone-based lubricant वापरता येतो. लॅटेक्स कंडोम (Latex condom) बरोबर तेल, पेट्रोलियम जेली किंवा काही oil-based पदार्थ वापरल्यास लॅटेक्स कमकुवत होऊन कंडोम फाटण्याचा धोका वाढू शकतो.
पहिल्यांदा सेक्स करताना वेदना होणे अपरिहार्य आहे का?
पहिल्या वजायनल इंटरकोर्स (vaginal intercourse) वेळी काहींना सौम्य ताण किंवा अस्वस्थता जाणवू शकते; काहींना जवळपास काहीही वेदना होत नाहीत. तीव्र वेदना ही पहिल्यांदा असल्यामुळे सामान्यच असते, गृहित धरू नये.
वेदनेची अनेक कारणे असू शकतात
अपुरी उत्तेजना, ओलाव्याचा अभाव, घाई, भीतीमुळे पेल्विक फ्लोअर (pelvic-floor) स्नायू घट्ट होणे, वल्वोडायनिया (vulvodynia), संसर्ग, एंडोमेट्रिओसिस (Endometriosis), त्वचेचे काही विकार किंवा जेनिटो-पेल्विक पेन/पेनेट्रेशन डिसऑर्डर (genito-pelvic pain/penetration disorder) यांसारख्या वैद्यकीय कारणांमुळे समागम वेदनादायक होऊ शकतो. वेदना म्हणजे कौमार्य नष्ट होत आहे असा जैविक नियम नाही.
रक्तस्राव आणि हायमेन बाबत सर्वात मोठे मिथक
पहिल्या सेक्सवेळी प्रत्येक मुलीचे रक्त आलेच पाहिजे हा समज वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचा आहे. हायमेन म्हणजे योनी पूर्णपणे बंद करणारा पडदा नाही. तो योनीच्या प्रवेशद्वाराभोवती असणाऱ्या लवचिक ऊतींचा भाग असतो आणि त्याचा आकार, जाडी व लवचिकता व्यक्तीनुसार बदलतात. पहिल्या समागमाच्यावेळी काहींना थोडे spotting होऊ शकते; अनेकांना अजिबात रक्त येत नाही. रक्त न येणे म्हणजे त्या व्यक्तीने यापूर्वी सेक्स केलेला होता, असा निष्कर्ष काढता येत नाही. त्याचप्रमाणे हायमेन पाहून एखाद्या व्यक्तीने पूर्वी संभोग केला आहे की नाही हे विश्वसनीयरीत्या ठरवता येत नाही. म्हणून तथाकथित ‘virginity test’/ कौमार्य चाचणीला वैद्यकीय विश्वसनीयता नाही.

रक्त का येऊ शकते?
रक्तस्राव झाल्यास त्याचे कारण हायमेन असणे आवश्यक नाही. अपुरे ल्युब्रिकेशन (lubrication), जास्त घर्षण, लहान जखम किंवा इतर स्त्रीरोगविषयक कारणेही असू शकतात. जास्त रक्तस्राव, सतत रक्त येणे किंवा तीव्र वेदना असल्यास डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे.
पहिल्याच वेळी गर्भधारणा होऊ शकते का?
पहिल्यांदा गर्भधारणा होत नाही हा धोकादायक गैरसमज आहे. शुक्राणू योनीत गेले आणि त्या काळात अंडोत्सर्गाच्या आसपासचा फर्टाईल पिरियड (fertile period) असेल, तर पहिल्याच समागमानंतर (vaginal intercourse) गर्भधारणा होऊ शकते. शरीराला पहिल्या सेक्सनंतरच गर्भधारणेची क्षमता मिळते, या दाव्यात तथ्य नाही.
Withdrawal मेथड सुरक्षित असते का?
वीर्यस्खलनापूर्वी लिंग बाहेर काढणे म्हणजेच विड्रॉअल (withdrawal) हे गर्भधारणा टाळण्याचे तुलनेने कमी विश्वासार्ह साधन आहे. योग्य वेळ साधण्यात चुका होऊ शकतात आणि STI पासूनही ते संरक्षण देत नाही. गर्भधारणा टाळणे महत्त्वाचे असल्यास अधिक विश्वसनीय गर्भनिरोधकाचा विचार करावा. हार्मोनल इम्प्लांट (Hormonal contraception-implant-intrauterine contraception) गर्भधारणेपासून अत्यंत प्रभावी संरक्षण देऊ शकतात; पण त्यापैकी बहुतेक STI पासून संरक्षण देत नाहीत. त्यामुळे अनेक परिस्थितीत कंडोम आणि प्रभावी गर्भनिरोधक अशी दुहेरी संरक्षक (dual protection) पद्धत उपयुक्त ठरते.
असुरक्षित सेक्स झाल्यास?
कंडोम वापरला नाही, फाटला किंवा निसटला… अशा वेळी गर्भधारणेचा धोका असल्यास इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शनचा विचार करता येतो. इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन जितक्या लवकर घेतली जाते तितकी सामान्यतः अधिक परिणामकारक असते; प्रकारानुसार वापरण्याची कालमर्यादा वेगवेगळी असते. त्यामुळे अशा परिस्थितीत शक्य तितक्या लवकर डॉक्टर, स्त्रीरोगतज्ज्ञ किंवा प्रशिक्षित आरोग्यसेवा व्यावसायिकाशी संपर्क साधणे उत्तम. पाळी अपेक्षित वेळेपेक्षा उशिरा आल्यास किंवा असुरक्षित संबंधानंतर गर्भधारणेची शक्यता असल्यास प्रेग्नन्सी टेस्ट (pregnancy test) करणे आवश्यक ठरू शकते.
STI म्हणजे काय आणि पहिल्यांदा सेक्स करणाऱ्यालाही त्याचा धोका असतो का?
एसटीआय (STI) म्हणजे सेक्स्युअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन (Sexually Transmitted Infection) किंवा लैंगिक संसर्ग. क्लेमिडिया (Chlamydia), गॉनेरिया (Gonorrhoea), सिफिलीस (Syphilis), एचआयव्ही (HIV), जिनायटल हर्पीस (Genital Herpes), एचपीव्ही (HPV) आणि ट्रायकोमोनियासिस (Trichomoniasis) यांसारखे संसर्ग असुरक्षित लैंगिक संपर्काद्वारे (वजायनल, ओरल किंवा ॲनल सेक्स) एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरू शकतात.
कंडोमचे महत्त्व किती आहे?
कंडोमचा योग्य आणि सातत्यपूर्ण वापर केल्यास अनपेक्षित गर्भधारणा टाळण्यास तर मदत होतेच, शिवाय एचआयव्ही (HIV), गॉनेरिया (Gonorrhoea) आणि क्लेमिडिया (Chlamydia) यांसारख्या अनेक गंभीर लैंगिक संसर्गांचा (STIs) धोकाही लक्षणीयरीत्या कमी होतो. मात्र, कंडोम १०० टक्के संरक्षणाची हमी देत नाही. एचपीव्ही (HPV), हर्पीस (Herpes) किंवा सिफिलीस (Syphilis) यांसारखे काही संसर्ग हे कंडोमने न झाकल्या गेलेल्या उघड्या त्वचेच्या थेट संपर्कातूनही पसरू शकतात. असे असले तरी, लैंगिक आरोग्याच्या आणि संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने कंडोम हे आजही सर्वांत सोपे आणि अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. याचा पूर्ण फायदा मिळवण्यासाठी प्रत्येक लैंगिक संबंधाच्या वेळी नवीन कंडोम वापरावा आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत तो योग्य पद्धतीने वापरणे गरजेचे आहे.
संमती: शरीराच्या तयारीइतकीच महत्त्वाची गोष्ट
सुरक्षित लैंगिक संबंधांचा विचार करताना केवळ शारीरिक तयारी पुरेशी नसते, तर दोघांची स्पष्ट आणि स्वेच्छेने दिलेली संमती (Consent) तितकीच महत्त्वाची असते.
“पौगंडावस्थेत लैंगिक आकर्षण आणि शारीरिक बदल सुरू होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे; मात्र शरीरात लैंगिक परिपक्वतेची लक्षणे दिसू लागली म्हणजे व्यक्ती शरीरसंबंधांसाठी पूर्णपणे तयार झाली, असा त्याचा अर्थ होत नाही. शरीरसंबंधांचा निर्णय घेताना शारीरिक परिपक्वतेबरोबरच योग्य माहिती, मानसिक तयारी, संमती आणि सुरक्षिततेची जाणीव महत्त्वाची असते.”
डॉक्टरांकडे कधी जावे?
Sex किंवा penetrationशी संबंधित खालील लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये:
- तीव्र किंवा वारंवार होणारी वेदना
- penetration शक्यच न होणे किंवा स्नायू अनैच्छिकरीत्या घट्ट होणे
- जास्त किंवा न थांबणारा रक्तस्राव
- असामान्य vaginal discharge किंवा दुर्गंधी
- जननेंद्रियावर जखमा, फोड किंवा पुरळ
- लघवी करताना तीव्र जळजळ
- pelvic किंवा खालच्या पोटात तीव्र वेदना
- पाळी उशिरा येणे आणि गर्भधारणेची शक्यता
- condom फुटणे किंवा असुरक्षित सेक्स
- STIच्या संपर्काची शक्यता
यापैकी काहीही असल्यास स्त्रीरोगतज्ज्ञ, त्वचा/ लैंगिक रोगतज्ज्ञ किंवा योग्य आरोग्यसेवा व्यावसायिकाचा सल्ला घ्यावा. जबरदस्ती, लैंगिक हिंसा किंवा दबावाची परिस्थिती असल्यास वैद्यकीय मदतीबरोबर विश्वासू व्यक्ती किंवा योग्य संरक्षण यंत्रणेकडून मदत घेणे महत्त्वाचे आहे.
