Low Blood Sugar After Eating Breakfast : रक्तातील साखरेच्या पातळीत होणारे चढ-उतार हे व्यक्तीपरत्वे जीवनशैली, वैद्यकीय तपासण्या आणि परिस्थिती यांनुसार बदलू शकतात. मात्र, जर एखाद्या विशिष्ट पॅटर्नमध्ये हे वारंवार घडत असेल, तर तो तुमच्या शरीराचा तुम्हाला काहीतरी महत्त्वाचे संकेत देण्याचा प्रयत्न असू शकतो. एका इंटरनेट युजरने अशाच एका पॅटर्नकडे लक्ष वेधले आणि Quora वर आपला अनुभव शेअर केला, ज्यात त्याने प्रश्न विचारला की, ‘फक्त नाश्त्यानंतरच माझी ब्लड शुगर लो का होते?’

त्याचे उत्तर शोधण्यासाठी इंडियन एक्स्प्रेसने झॅन्ड्रा हेल्थकेअरचे डायबेटोलॉजी प्रमुख व वेट लॉस एक्स्पर्ट डॉ. राजीव कोविल यांच्याशी संपर्क साधला.

सकाळी तुमच्या शरीरात असे वेगळे काय बदल घडतात? (Why Do I Feel Shaky After Breakfast? Understanding Reactive Hypoglycemia)

“सकाळची चयापचय क्रिया (Metabolism) वेगळी असते. रात्रभराच्या उपवासानंतर शरीर इन्सुलिन सेन्सेटिव्ह झालेले असते,” असे डॉ. कोविल स्पष्ट करतात. कधी कधी स्वादुपिंड (Pancreas) गरजेपेक्षा जास्त इन्सुलिन तयार करते, ज्यामुळे नाश्त्यानंतर साखरेची पातळी अचानक खालावते. त्याला तुम्ही स्वादुपिंडाचा अतिउत्साह, असे म्हणू शकता.

या पॅटर्नला सामान्यतः ‘रिॲक्टिव्ह हायपोग्लायसेमिया’ (Reactive Hypoglycaemia), असे म्हटले जाते. त्यात जेवणानंतर एक ते तीन तासांनी साखरेची पातळी कमी होते. “हे क्लासिकल डायबिटीस हायपोग्लायसेमिया नाही, तर ती एक प्रकारची ‘मेटाबॉलिक ओव्हरकरेक्शन’ आहे,” ज्यामध्ये ग्लुकोज वेगाने वाढते आणि नंतर साखर अचानक कमी होते.

डॉ. कोविल सांगतात, “सकाळच्या वेळी शरीरातील ‘कॉर्टिसोल’ हार्मोनमध्ये होणारे बदल या स्थितीला अधिक तीव्र करतात.” प्री-डायबेटिक असलेल्या भारतीयांमध्ये हा प्रकार सर्रास आढळतो.

नाश्ता ठरू शकतो ट्रिगर?

खरी समस्या तुमच्या ताटात काय पदार्थ आहेत यात दडलेली असते. रिफाईंड आणि लवकर पचणाऱ्या कर्बोदकांचे (Carbohydrates) प्रमाण जास्त असलेल्या आहारामुळे रक्तातील साखर वेगाने वाढते आणि नंतर तितक्याच वेगाने कमी होते.

मैद्यापासून बनवलेले पदार्थ जसे की ‘व्हाईट ब्रेड, कॉर्नफ्लेक्स’ किंवा ‘साखरयुक्त मसाला चहा’ रक्तातील ग्लुकोजमध्ये झपाट्याने वाढ करू शकतात. “नाश्ता जेवढा मऊ, पांढरा आणि प्रक्रिया केलेला (Processed) असेल, तितका धोका जास्त असतो,” असा इशारा डॉ. कोविल देतात. ते पुढे म्हणतात, “इतकेच काय तर इडली, डोसा, पोहा यांसारख्या पारंपरिक भारतीय नाश्त्यामुळेही साखर वेगाने वाढू शकते,” ज्यानंतर इन्सुलिनचा प्रवाह उशिरा वाढतो आणि साखरेची पातळी अचानक खाली येते.

त्यामुळेच अनेकांना जेवणानंतर दोन तासांनी घाम येणे, थरथरणे, भूक लागणे, चिडचिड होणे किंवा चक्कर येणे अशी लक्षणे जाणवतात— जी पुन्हा काहीतरी खाल्ल्यानंतर लगेच बरी होतात. ही लक्षणे महत्त्वाची आहेत.

यावर काय उपाय करता येतात?

असे प्रकार वारंवार घडत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. “तुमच्या ताटात संतुलित पदार्थांचा समावेश करा. साखरेची पातळी अचानक वाढू देऊ नका,” हाच यावरचा सोपा उपाय आहे. एक योग्य नाश्ता म्हणजे : प्रोटीन + फायबर + हेल्दी फॅट + लो जीआय कार्ब्स.

डॉ. कोविल यांनी भारतीय चवीनुसार नाश्त्याचे काही उत्तम पर्याय सुचवले आहेत:

अंडी + मल्टीग्रेन रोटी / व्हेजिटेबल ऑम्लेट

पनीर भुर्जी / टोफू स्क्रॅम्बल

सुका मेवा आणि मोड आलेल्या कडधान्यांचा चाट

ग्रीक योगर्ट + बिया (Seeds)

अंडी, चिकन किंवा मासे आणि बरोबर परतलेल्या भाज्या (Sautéed vegetables)

(टीप – कोणतेही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.)