Chia Seeds Benefits : चिया सीड्सने हल्ली पौष्टिक पदार्थ म्हणून प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. खरं तर चिया सीड्सचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. या चिया सीड्सचा वापर जेवण किंवा नाश्ता बनवताना केला जातो, पण तज्ज्ञ हे चिया सीड्स उपाशीपोटी खाण्याचा सल्ला देतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल, असे का? द इंडियन एक्स्प्रेसनी तज्ज्ञांच्या हवाल्याने याविषयी माहिती सांगितली आहे.

उत्तर प्रदेशच्या आंबेडकरनगर येथील डिगा ऑरगॅनिकचे संस्थापक आणि कृषीतज्ज्ञ आलोक सिंग सांगतात, “उपाशीपोटी चिया सीड्स खाल्ल्याने चांगली ऊर्जा मिळते. यामध्ये ऊर्जा वाढवणारे पोषक घटक, ओमेगा ३ आणि फायबर असतात. याशिवाय यामध्ये भरपूर अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म असतात.”

उपाशीपोटी चिया सीड्सचे खाल्ल्याने पचन आणि चयापचय क्रियांवर कसा परिणाम होतो?

सिंग सांगतात, “चिया सीड्स हा एक छोटा पॉवरहाऊस पदार्थ आहे. हे सहज पाणी शोषून घेतात, त्यामुळे ते खाल्ल्यानंतर आपल्याला फार भूक लागत नाही. यामुळे पचन आणि चयापचय क्रिया सुरळीत राहते. चिया सीड्स तुमच्या शरीरातील साखरेची पातळी कमी करून ऊर्जा पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतात. हे आतड्यांचे आरोग्य आणि एकंदरीत शरीर सुदृढ ठेवण्यास मदत करतात.”

चिया सीड्स उपाशीपोटी खाल्ल्यामुळे कोणते दुष्परिणाम दिसून येतात?

चिया सीड्स तुमच्या आहारासाठी सुरक्षित आणि आरोग्यदायी आहेत, पण सिंग सांगतात की आपल्या शरीराची गरज समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. काही लोकांना अति प्रमाणात फायबर खाल्ल्यामुळे अस्वस्थ वाटू शकते. विशेषत: उपाशीपोटी चिया सीड्स खाल्ल्याने असे जाणवू शकते. त्यामुळे जर तुम्हाला चिया सीड्स किंवा पचनक्रियेशी संबंधित कोणतीही अॅलर्जी असेल तर चिया सीड्सचा आहारात समावेश करण्यापूर्वी डॉक्टरांशी संपर्क साधा. चिया सीड्स पाणी शोषून घेतात, त्यामुळे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी दिवसभर पाणी पिणे गरजेचे आहे.

हेही वाचा : रक्तातील लोह वाढवण्यासाठी ‘बीट, अननस अन् लिंबाचा रस ठरेल का फायदेशीर? काय सांगतात तज्ज्ञ?

उपाशीपोटी चिया सीड्स खाल्ल्याने रक्तप्रवाहात पोषक घटकांचा समावेश होतो. चिया सीड्स तुम्ही दही किंवा सॅलेडमध्ये मिसळून खाल्ले तर त्याचे अनेक फायदे दिसून येतील. त्यामुळे दिवसाची सुरुवात चिया सीड्सने करा, तुम्हाला याचा प्रभाव तुमच्या आरोग्यावर दिसून येईल.

तुम्ही जर नाश्त्याबरोबर किंवा एक ग्लास पाण्यात चिया सीड्स एकत्रित करून किंवा उपाशीपोटी खाल्ल्या तर तुम्हाला अनेक प्रकारचे आरोग्यदायी फायदे दिसू शकतात.

पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास आणि वजन नियंत्रित ठेवण्यास चिया सीड्स मदत करतात. हृदयाच्या आरोग्यापासून जळजळ कमी करण्यापर्यंत चिया सीड्स फायदेशीर आहे. चिया सीड्स आकारमानाने जरी लहान दिसत असल्या तरी त्यातीत पौष्टिक घटक आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.