Heart Attack Symptoms in Women: गेल्या वर्षभरापासून देशात हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कमी वयात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होत आहेत. जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका येणे, जी सावरण्याची संधीही देत नाही आणि लोकांचे प्राण घेत आहे. तारुण्यात हृदयविकार होऊन अकाली मृत्यू येणं यामागे बदलती जीवनशैली, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव ही मोठी कारणं असावीत असं तज्ज्ञ सांगतात. आजकाल कमी वयाचे तरुण आणि महिलांमध्ये हृदयविकाराचा झटका ही एक गंभीर समस्या बनत चाललीय. हृदयविकाराचा झटका पुरुष आणि महिला दोघांसाठीही तितकाच घातक ठरतो. खरं तर हृदयरोगाचा धोका टाळण्यासाठी काही बेसिक गोष्टी माहीत असाव्या लागतात. जर या लक्षणांकडे वेळीच लक्ष दिले तर धोका टाळता येऊ शकतो. महिलांना हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी कोणती लक्षणे दिसतात? फोर्टिस हॉस्पिटल शालीमार बाग येथील सल्लागार डॉ. सौरभ बग्गा यांनी माहिती दिल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसनी दिले आहे. यासंबंधी सविस्तर जाणून घेऊया..

महिलांमध्ये हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात दिसून येतात ही लक्षणे

  • श्वास घेण्यास त्रास
  • मान, जबडा, खांदा, पाठीचा वरचा भाग किंवा पोटात अस्वस्थता
  • एका किंवा दोन्ही हातात वेदना
  • सतत उलट्या आणि मळमळ
  • घाम येणे
  • चक्कर येणे
  • असामान्य किंवा अत्यंत थकवा

तज्ज्ञांच्या मते ही लक्षणे सामान्यतः अपचन किंवा पोटदुखी, ताण आणि वजन वाढण्याशी संबंधित असू शकतात. महिलांना केवळ त्यांच्या मुख्य धमन्यांमध्येच नव्हे तर हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या लहान धमन्यांमध्येही अडथळ्यांमुळे छातीत अस्वस्थतेची लक्षणे दिसू शकतात. त्याचप्रमाणे उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, मधुमेह असलेल्या महिलांना मधुमेह असलेल्या पुरुषांपेक्षा हृदयरोगाचा धोका जास्त असतो.

सर्व वयोगटातील महिलांनी हृदयरोग गांभीर्याने घ्यावा. ६५ वर्षांखालील महिलांनी, विशेषतः हृदयरोगाचा कौटुंबिक इतिहास असलेल्यांनी, जोखीम घटकांकडे लक्ष दिले पाहिजे. हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी ते जीवनशैलीत अनेक बदल करू शकतात, त्याचप्रमाणे आठवड्यातील बहुतेक दिवस प्रत्येकाने व्यायाम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसे की वेगवान गतीने चालणे किंवा त्यांच्या आवडीची कोणतीही एरोबिक क्रियाकलाप करणे, असे डॉ. बग्गा सुचवतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हृदयविकाराच्या झटक्यापासून वाचण्यासाठी अशी घ्या स्वतःची काळजी

कोणतीही लक्षणं आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. रक्तातील साखरेचे प्रमाण आणि रक्तदाब नेहमी नियंत्रणात राहील याची काळजी घ्या. तसेच कोलेस्ट्रॉल वाढवणारे पदार्थ खाणे टाळा. जेवणातील जंकफूडचा समावेश यामुळे तसेच धूम्रपान, मद्यपान अशा सवयींमुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. अशा आरोग्यासाठी हानिकारक असणाऱ्या सवयी टाळण्याचा सल्ला दिला जातो.