पुणे : बदलती जीवनशैली, घर-कार्यालयाची दुहेरी जबाबदारी यांमुळे महिलांच्या दिनचर्येत मोठे बदल होत असून, दीर्घ काळ उभे राहून काम केल्यामुळे महिलांच्या शरीरावर दीर्घकालीन परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सुरुवातीला किरकोळ वाटणाऱ्या तक्रारी पुढे पन्नाशीनंतर गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता असल्याने वेळेतच जीवनशैलीत बदल करणे आवश्यक असल्याचे डॉक्टर सांगतात.
आरोग्यतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वयंपाकघरातील बहुतांश कामे उभे राहून करणे, बसण्या-उठण्याच्या हालचाली कमी होणे, उभ्या-उभ्याच जेवणे किंवा काम करता करता खाणे या सवयींमुळे शरीराच्या हालचाली मर्यादित होत असून, त्याचा परिणाम स्नायू, सांधे आणि एकूणच शारीरिक क्षमतेवर होत आहे. सतत उभे राहिल्यामुळे शरीराचा मोठा भार गुडघे आणि पायांवर पडतो. परिणामी वजन वाढणे, गुडघेदुखी, पायांना सूज येणे, सतत थकवा जाणवणे तसेच स्नायूंमध्ये ताण निर्माण होणे अशा समस्या वाढत आहेत. सुरुवातीला या तक्रारी किरकोळ वाटल्या, तरी वाढत्या वयानुसार त्यांची तीव्रता वाढू शकते. अशा जीवनशैलीमुळे पन्नाशीनंतर बहुतांश स्त्रियांमध्ये स्थूलता, पोटाचा घेर वाढणे, चरबी वाढणे, यातूनच मधुमेह, रक्तदाब, थायरॉईड, कोलेस्ट्रॉल यासारख्या सहव्याधी जडतात.
काय करावे?
स्त्री-रोगतज्ज्ञांच्या मते, महिलांनी शक्य तितक्या वेळा जमिनीवर मांडी घालून बसून पुन्हा उठण्याच्या नैसर्गिक हालचाली करणे, घरात नियमित चालणे आणि सलग तासनतास उभे राहणे टाळणे आवश्यक आहे. साध्या शारीरिक क्रियांमुळे शरीराची लवचीकता टिकून राहते. स्नायू व सांधे सक्रिय राहतात. थकवाही कमी जाणवतो. घरातील कामे जलद उरकण्यापेक्षा योग्य पद्धतीने आणि शरीराला आवश्यक विश्रांती देणे महत्त्वाचे आहे.
तासन्तास उभे राहून काम केल्याने रक्ताभिसरण प्रक्रिया मंदावते. मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो. सतत उभे राहिल्याने अधिक स्त्रियांमध्ये खुब्याच्या समस्या आणि व्हेरिकोज व्हेन्स या नसांच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे काही वेळ खाली बसणे व पुन्हा उभे राहणे ही क्रिया करीत रहावी. प्रत्येक महिलेने दररोज व्यायाम करावा. जेवल्यानंतर स्त्रियांनी वज्रासनात बसावे, यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया चांगली होते. – डॉ. अलका क्षीरसागर, स्त्री रोगतज्ज्ञ
केवळ दीर्घ काळ उभे राहूनच नाही, तर अनेक नोकरदार महिलांना बराच वेळ खुर्चीवर बसून काम करावे लागते. यामुळेदेखील अनेक समस्यांना स्त्रियांना सामोरे जावे लागते. पाठीची दुखणे कंबर दुखणे तसेच मान दुखणे, पाय दुखणे या समस्या उद्भवतात. – डॉ. उमा वानखेडे, अध्यक्ष, पुणे स्त्रीरोग व प्रसुती शास्त्र संस्था
आंतरराष्ट्रीय सर्वेक्षण काय सांगते?
अमेरिकेच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ’ने प्रसिद्ध केलेल्या संशोधनासार, दीर्घ काळ उभे राहून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये कंबरदुखी, पायदुखी, स्नायूंचा थकवा, पाय सुजणे आणि रक्ताभिसरणाशी संबंधित समस्या वाढण्याची शक्यता असते. विशेषतः महिला कर्मचाऱ्यांमध्ये या तक्रारी अधिक प्रमाणात आढळून येत असल्याचे विविध अभ्यासांमधून स्पष्ट झाले आहे.
दैनदिन सवयींमध्ये बदल आवश्यक
- सलग अर्धा तास उभे राहिल्यानंतर थोडा वेळ चाला अथवा बसा.
- शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी किमान अर्धा तास चालणे तसेच वेट ट्रेनिंगचा व्यायाम करणे
- घरकाम करताना खाली बसताना शक्यतो मांडी घालून बसणे
- जेवणानंतर काही मिनिटे वज्रासन करणे
- सतत उभे राहिल्याने वजनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवा
- कॅल्शियम- प्रथिनेयुक्त आहार घ्या.
(स्त्री-रोगतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार)
