World Cancer Day 2026: ४ फेब्रुवारी रोजी दरवर्षी जागतिक कर्करोग दिन जगभरात साजरा केला जातो. कॅन्सरबाबत जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. भारतात सर्वात सामान्य कॅन्सर प्रकारांपैकी डोक्याचा आणि मानेच्या कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अनेक पाश्चात्य देशांमध्ये धूम्रपान हा कॅन्सरसाठी एक प्रमुख कारणीभूत घटक मानला जात असला तरी, भारतात कॅन्सरजन्य घटकांचा संपर्क अधिक प्रमाणात आढळतो. तंबाखू आणि सुपारीच्या सेवनामुळे या कॅन्सरचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले. फोर्टिसमधील कॅन्सरतज्ज्ञ डॉ. बी. निरंजन नाईक यांनी याबाबत काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

तंबाखूचा अति वापर

डॉ. नाईक यांनी सांगितले की, तोंडाच्या कॅन्सरचे सर्वात मोठे कारण म्हणजे तंबाखूचे अति प्रमाणात सेवन. धूम्रपान (बिडी, सिगारेट, हुक्का) आणि धूररहित उत्पादने (गुटखा, खैनी, पान मसाला, जर्दा) असे. जगात धूररहित तंबाखूच्या उत्पादनांचे सेवन करणाऱ्यांची संख्या भारतात सर्वाधिक आहे आणि ही उत्पादने तोंडी पोकळी, घशाची पोकळी आणि स्वरयंत्राच्या कॅ्सरशी जवळून संबंधित आहेत. सुपारी बहुतेकदा निरूपद्रवी आणि जुन्या पद्धतींनुसार खाण्यास साधारण मानली जाते, ती स्वत: कॅन्सरला कारणीभूत आहे. शिवाय फक्त सुपारी किंवा तंबाखूसोबत मोठ्या प्रमाणात सेवन केली जाते. लवकर सुरूवात आणि दीर्घकालीन सवयीचा वापर धोका आणखी वाढवतो.

मद्यपान

तंबाखूसोबत मद्यपान केल्यानेही कॅन्सरचे प्रमाण वाढते. एकूणच मद्यपान श्लेष्मल ऊतींना नुकसान करतात. शिवाय तोंडाची अस्वच्छता , खराब दात आणि तोंडाच्या अस्तराची दीर्घकालीन जळजळ देखील कॅन्सरच्या वाढीला कारणीभूत ठरते. जे दातांवर वेळेवर उपचार करत नाही त्यांना देखील कॅन्सरचा धोका वाढतो.

सामाजिक-आर्थिक असमानता

कॅन्सरच्या वाढत्या घटनांमध्ये सामाजिक-आर्थिक असमानता देखील महत्त्वाची भूमिका बजावते. भारतातील मोठा लोकसंख्या वर्ग अशा परिस्थितीत राहतो जिथे कॅन्सरच्या जोखमीच्या घटकांबद्दल जागरूकता खूपच कमी आहे. तसंच आरोग्य सेवादेखील कमी आहेत. गरिबी आणि कमी साक्षरता आरोग्य सेवेच्या शोधात अडथळा ठरतात. त्यामुळे अनेकदा कॅन्सरचे निदान प्रगत होते. ग्रामीण भागात आणि शहरातील झोपडपट्टी भागात राहणाऱ्या लोकांना विशेष कॅन्सर सेवा मिळवण्यात मोठ्या अडचणी येतात.

पान-सुपारी चघळणे

तंबाखू किंवा सुपारी चघळण्याची पद्धत ही महिला आणि किशोरवयीन मुलांमध्येही कॅन्सरचा धोका वाढवू शकते. तंबाखू आणि सुपारी उद्योगांकडून आक्रमक मार्केटिंग केली जाते. ती बहुतेकदा तरूणांना लक्ष्य करते.

तपासणी आणि लवकर निदानाचा अभाव

तपासणी आणि लवकर निदान हादेखील एक महत्त्वाचा घटक आहे. तोंडाचा कॅन्सर हा डोळ्यांना दिसणारा कॅन्सर आहे आणि तो सुरुवातीच्या टप्प्यात ओळखणे सोपे आहे. तरीही मोठ्या प्रमाणात पद्धतशीर तपासणी मर्यादित प्रमाणातच आहे. प्रशिक्षित आरोग्य कर्मचार्‍यांचा अभाव आणि कॅन्सर केंद्रांच्या असमान वितरणामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.

डॉ. नाईक यांनी सांगितले की, भारतात डोक्याचा आणि मानेचा कॅन्सर होण्याचे प्रमाण जास्त असण्याला तंबाखू आणि सुपारीचा व्यापक वापर, सामाजिक आर्थिक असमानता, पूर्वीच्या पद्धती, मर्यादित जागरूकता आणि प्रतिबंधात्मक उपायांचा अभाव आणि निदान होण्यास लागणारा वेळ असे अनेक घटक कारणीभूत आहेत. त्यासाठी तंबाखूच्या सेवनावर नियंत्रण, जनजागृती, तपासणी कार्यक्रम आणि प्राथमिक आरोग्य व्यवस्था मजबूत करणे आवश्यक आहे.