मुंबई : जगभरात लाखो बालकांचे जीव घेणाऱ्या मलेरियाविरुद्ध अखेर एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने नवजात व अतिशय लहान बालकांसाठी खास तयार करण्यात आलेल्या मलेरियाच्या औषधाला अधिकृत मंजुरी दिली आहे.आरोग्य क्षेत्रात ही घटना ऐतिहासिक मानली जात असून सर्वात असुरक्षित गटासाठी आता सुरक्षित उपचाराचा मार्ग खुला झाला आहे.

ही मंजुरी आर्टिमेथर ल्युफ्नेट्राईन या औषधाच्या विशेष बालक-आवृत्तीला देण्यात आली आहे. आतापर्यंत नवजात बालकांसाठी वेगळे औषध उपलब्ध नव्हते. त्यामुळे डॉक्टरांना मोठ्या मुलांसाठी बनवलेल्या गोळ्या तोडून किंवा डोस बदलून उपचार करावे लागत होते. या पद्धतीत अचूक डोस न मिळण्याचा धोका होता, ज्यामुळे साइड इफेक्ट्स किंवा उपचार अपयशी ठरण्याची शक्यता वाढत होती. आता मात्र हे संकट मोठ्या प्रमाणात दूर होणार आहे.

दरवर्षी जगभरात सुमारे तीन कोटी बालकांचा जन्म मलेरिया-प्रभावित भागात होतो. विशेषतः आफ्रिका खंडात या आजाराचा मोठा कहर आहे. अशा परिस्थितीत नवजात बालकांसाठी सुरक्षित आणि अचूक औषध उपलब्ध होणे म्हणजे लाखो कुटुंबांसाठी जीवनदान ठरणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेच्या या निर्णयामुळे आता हे औषध विविध देशांच्या सरकारी आरोग्य यंत्रणांमध्ये समाविष्ट होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.मलेरिया अजूनही जागतिक आरोग्यासमोरील एक गंभीर आव्हान आहे.

अलीकडील आकडेवारीनुसार, दरवर्षी कोट्यवधी लोक या आजाराने बाधित होतात आणि लाखो मृत्यू होतात. यात सर्वाधिक बळी हे पाच वर्षांखालील मुलांचे असतात. त्यामुळे बालकांसाठी वेगळ्या उपचाराची गरज तातडीची होती. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस यांनी या निर्णयाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, मलेरियामुळे अनेक पिढ्या त्रस्त झाल्या, पण आता आपण या लढ्यात निर्णायक टप्प्यावर पोहोचलो आहोत.

त्यांनी यासोबतच सर्व देशांना या औषधाचा वेगाने प्रसार करण्याचे आवाहनही केले आहे.एकूणच, नवजात बालकांसाठी मलेरियावर पहिल्यांदाच उपलब्ध झालेले हे औषध केवळ वैद्यकीय प्रगती नसून मानवतेसाठी मोठा दिलासा आहे. आता खरी कसोटी असेल ती म्हणजे हे औषध गरजूंपर्यंत किती लवकर आणि प्रभावीपणे पोहोचते.