अकोला: निरोगी शरीरात मूत्रपिंडाचे कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण असते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांमुळे मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात १२ ते २१ टक्क्यांपर्यंत मूत्रपिंडाचे रुग्ण आढळून येतात. मूत्रपिंडाच्या सुरक्षेसाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी जागतिक मुत्रपिंड आरोग्य दिन साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश लोकांमध्ये मूत्रपिंडांच्या (किडनीच्या) आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि आजार टाळण्यासाठी योग्य सवयी अंगीकारण्यास प्रेरित करणे हा आहे.

मूत्रपिंडांचे कार्य काय?

मानवी शरीरात दोन मुत्रपिंडे असतात. ती रक्तातील अपायकारक पदार्थ व अतिरिक्त पाणी गाळून लघवीद्वारे बाहेर टाकण्याचे काम करतात. तसेच शरीरातील पाणी-मीठ संतुलन राखणे, रक्तदाब नियंत्रित ठेवणे आणि लाल रक्तपेशींच्या निर्मितीत मदत करणे हीही त्यांची महत्त्वाची कार्ये आहेत. मूत्रपिंडाचे आरोग्य जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य आहार, निरोगी जीवनशैली आणि वेळेवर तपासणी यामुळे त्याचे आजार टाळता येऊ शकतात

Award Banner

मूत्रपिंड विकाराची लक्षणे कोणती?

लघवीत बदल, खूप जास्त किंवा खूप कमी लघवी होणे, लघवीतून फेस येणे किंवा रक्त जाणे, पाय, घोटे, हात किंवा डोळ्यांच्या खाली सूज येणे, थकवा आणि अशक्तपणा, ऊर्जा कमी वाटणे, त्वचेवर सतत खाज सुटणे, भूक न लागणे, वजन कमी होणे आणि मळमळ वाटणे, स्नायूंमध्ये पेटके येणे, श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे, निद्रानाश किंवा झोपेत समस्या आदी लक्षणे आढळून येतात.

आजारांची प्रमुख कारणे?

दीर्घकाळ नियंत्रणात नसलेला मधुमेह मूत्रपिंडाला हानी पोहोचवतो. रक्तदाब वाढलेला असल्यास मूत्रपिंडावरील ताण वाढतो. जास्त मीठ, तेलकट पदार्थ आणि कमी व्यायाम यामुळे मूत्रपिंडाचे आरोग्य बिघडू शकते. या सवयींमुळे रक्तवाहिन्यांवर व मूत्रपिंडावर काय परिणाम होतो. वेदनाशामक औषधे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेतल्यास मूत्रपिंडावर दुष्परिणाम होऊ शकतो.

प्रतिबंधासाठी काळजी काय घेता येईल?

दररोज पुरेसे पाणी पिणे, संतुलित व पौष्टिक आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, रक्तदाब व रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे, धूम्रपान व मद्यपान टाळणे, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे न घेणे, नियमित आरोग्य तपासणी करून घेणे आदी काळजी घेता येऊ शकते, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.