World Oral Health Day 2023: तोंड हे मानवी शरीरातील प्रमुख प्रवेशद्वारांपैकी एक आहे. अन्नपदार्थ मुखावाटे पोटापर्यंत पोहोचत असतात. हे पचनक्रियेचे सुरुवातीचे टोक असते. तोंडामध्ये दात, जीभ असे अन्य अवयव देखील असतात. शरीरासाठी हे अवयव महत्त्वपूर्ण असल्यामुळे यांची निगा राखणे अत्यंत आवश्यक समजले जाते. दात स्वच्छ राहावेत यासाठी लोक दिवसातून दोनहा दात घासत असतात. दात घासले की तोंड स्वच्छ झालं असा बहुतांश लोकांना गैरसमज असतो. दातांबरोबर जीभ, हिरड्या देखील साफ होणे आवश्यक असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तोंडाच्या स्थितीचा संबंध प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मानवी शरीराच्या स्थितीशी येत असतो. जीभेचा रंग, हिरड्यांची स्थिती, तोंडातून येणारा वास अशा काही गोष्टींवरुन एखादी व्यक्ती कोणत्या आजाराचा सामना करत आहे हे ओळखता येते. मौखिक आरोग्य (Oral Health) आपल्या शरीरामध्ये झालेल्या नकारात्मक बदलांचे संकेत देत असते. हे संकेत ओळखणे आवश्यक असते. असे केल्यास प्राथमिक स्तरावरच आजाराचे निदान करता येईल आणि लगेच त्यावर उपचार देखील सुरु होतील.

हिरड्यातून होणारा रक्तस्त्राव

हिरड्यांच्या स्थितीवरुन शरीरामध्ये होत असलेले काही बदल ओळखता येतात. जर एखाद्या व्यक्तीच्या हिरड्यांचा रंग पांढरा-फिकट झाला असेल किंवा त्यातून रक्त येत असेल, तर त्याच्या हिरड्या कमकुवत झाल्या आहेत असे म्हटले जाते. अशा परिस्थितीमध्ये पीडित व्यक्तीला अन्य आजार देखील झालेले असू शकतात. हार्वर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरड्यांसंबंधित आजार असलेल्या लोकांना हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्याची शक्यता दोन ते तीन पट जास्त असते.

आणखी वाचा – World Oral Health Day 2023: आपल्या तोंडाशी संबंधित ‘या’ रंजक गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?

जीभेचा रंग बदलणे.

जीभेवर थोड्या प्रमाणामध्ये पांढरा थर असणे सामान्य असते. पण याचे प्रमाण जास्त असल्यास ते संसर्गाचे किंवा कर्करोगाचे लक्षण असू शकते असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. कर्करोगाव्यतिरिक्त जीभेचा रंग बदलणे हे STI सिफिलीस या आजाराचेही लक्षण मानले जाते. जीभेचा रंग प्रमाणापेक्षा जास्त पांढरा होत असल्यास डॉक्टरकडे जाऊन त्यांचा सल्ला घ्यावा.

तोंडामध्ये व्रण/फोड येणे.

दातांमध्ये जीभ, तोंडातील आतील भाग चावल्याने व्रण येऊ शकतात. ही समस्या उद्भवण्याची अन्य कारणेही आहेत. हे व्रण सामान्य: निरुपद्रवी असतात. काही दिवसांमध्ये ते निघून जातात. ही स्थिती हार्मोनल बदलांमुळेही होऊ शकते. हात-पाय यांच्याशी संबंधित आजार, ओरल लाइकेन प्लॅनस (oral lichen planus), क्रोहन डिझीस (crohn’s disease) अशा काही आजारांमुळेही तोंडामध्ये लाल फोड/व्रण येऊ शकतात. HIV किंवा lupus यांसारख्या गंभीर आजारांमुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. यामुळेही तोंडात फोड येण्याची शक्यता असते.

आणखी वाचा – पनीर की चिकन? फिट राहण्यासाठी कोणता पर्याय अधिक फायदेशीर आहे जाणून घ्या सविस्तर

तोंडावाटे दुर्गंधी येणे.

शरीरामध्ये बिघाड झाल्यास लगेच तोंडाला दुर्गंध यायला लागतो. सामान्य: तोंडाची निगा न राखल्याने असे घडत असते. श्वसनाचा त्रास, सायनस किंवा घश्यामध्ये जळजळ होत असल्यास तोंडाला घाणेरडा वास येतो. याव्यतिरिक्त पोटाचे विकार, अन्न पचन योग्य प्रकारे न झाल्यानेही ही समस्या उद्भवते. कर्करोग झालेल्या व्यक्तीच्या तोंडाला दुर्गंधी येत असते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World oral health day 2023 our mouth can tell a lot about health including early signs of cancer and other disease yps
First published on: 20-03-2023 at 11:51 IST