World TB Day 2026: टीबी म्हणजेच क्षयरोग हा एक संसर्गजन्य आजार आहे. याच्या लक्षणांकडे अनेकदा लोक सामान्य आजार म्हणून दुर्लक्ष करतात. मात्र जर एखाद्या व्यक्तीला ३ आठवड्यांहून अधिक काळ खोकला, थुंकीतून रक्त येणे, वजन कमी होणे आणि रात्री घाम येणे यांसारख्या समस्या जाणवत असतील, तर हे टीबीचे गंभीर लक्षण असू शकते. वेळेवर तपासणी आणि योग्य उपचारांनी टीबी पूर्णपणे बरा होऊ शकतो.

२४ मार्च: जागतिक क्षयरोग दिन

दरवर्षी २४ मार्च रोजी ‘जागतिक क्षयरोग दिन’ (World Tuberculosis Day) साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश लोकांना टीबीबद्दल जागरूक करणे आणि हा आजार मुळापासून संपवण्यासाठी प्रयत्न करणे हा आहे. टीबी प्रामुख्याने फुफ्फुसांवर परिणाम करतो, तरीही तो शरीराच्या इतर कोणत्याही भागात होऊ शकतो. अँटीबायोटिक्सच्या मदतीने यावर यशस्वी उपचार शक्य आहेत. अडचण तेव्हा येते जेव्हा लोक सुरुवातीच्या लक्षणांना सामान्य सर्दी, खोकला किंवा प्रदूषणाचा परिणाम समजून दुर्लक्ष करतात. हीच निष्काळजीपणाची वृत्ती आजाराला गंभीर बनवते आणि इतरांना संसर्ग होण्याचा धोका वाढवते.

डॉक्टरांचा सल्ला: ‘या’ ५ लक्षणांकडे लक्ष द्या

नवी दिल्लीतील प्रसिद्ध पल्मोनोलॉजिस्ट डॉ. भगवान मंत्री यांनी टीबीच्या प्रमुख लक्षणांची माहिती दिली आहे:

Award Banner
  • सततचा खोकला (३ आठवड्यांहून अधिक): सलग ३ आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त काळ राहणारा खोकला हे टीबीचे सर्वात सामान्य लक्षण आहे. हा खोकला कोरडा किंवा कफयुक्त असू शकतो. जर कफ सिरप घेऊनही आराम मिळत नसेल, तर तातडीने तपासणी करणे गरजेचे आहे.
  • थुंकीतून रक्त येणे: जेव्हा संसर्ग फुफ्फुसांच्या ऊतींना (tissues) इजा पोहोचवतो, तेव्हा रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. यामुळे थुंकीतून रक्त येऊ शकते. रक्ताचे प्रमाण कमी असले तरीही याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.
  • छातीत दुखणे आणि श्वास घेण्यास त्रास: टीबीमुळे फुफ्फुसात सूज येते, त्यामुळे दीर्घ श्वास घेताना किंवा खोकताना छातीत तीव्र वेदना होऊ शकतात. वाढत्या संसर्गामुळे श्वास घेण्यास त्रास होतो आणि याचा परिणाम दैनंदिन कामांवर होतो.
  • अचानक वजन कमी होणे आणि भूक न लागणे: कोणत्याही कारणाशिवाय वजन वेगाने कमी होणे हे टीबीचे लक्षण असू शकते. शरीर संसर्गाशी लढण्यासाठी जास्त ऊर्जा खर्च करते त्यामुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवतो.
  • रात्री घाम येणे आणि ताप: टीबीच्या रुग्णांना अनेकदा संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी हलका ताप येतो. तसंच झोपेत असताना प्रचंड घाम येणे हे शरीराची रोगप्रतिकारशक्ती संसर्गाशी लढत असल्याचे लक्षण आहे.
  • टीबी हा बॅक्टेरियामुळे होणारा आजार असला तरी तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. भारतात सरकारी योजनांतर्गत याचे मोफत उपचार उपलब्ध आहेत. उपचाराचा कोर्स अर्धवट सोडू नका, कारण यामुळे आजार अधिक बळावू शकतो.