PM Modi On Yoga Day 2024: येत्या २१ जून रोजी देशात योग दिवस साजरा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी जागतिक योग दिनाची सुरुवात केली होती. त्यानिमित्ताने यंदा १० वा जागतिक योग दिन साजरा केला जाणार आहे. या योग दिनानिमित्ताने देशभर योग उपक्रमांची जनजागृती झाली. अनेकांनी योगा करण्यास सुरुवात करून आयुष्यात अमूलाग्र बदल घडवून आणला आहे. आता यंदाच्या योग दिनाला अवघे ६ दिवस उरलेले असताना पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाला आपल्या आयुष्यात अविभाज्य भाग बनवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी यासंदर्भात एक्सवर पोस्ट केली आहे. यानुसार तुम्हीही निरोगी राहण्यासाठी मोदी यांनी सांगितलेले योगा प्रकार करू शकता.

योगतज्ज्ञ कामिनी बोबडे यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

ताडासन : ताडासन हे आसन तुमचा तणाव दूर करण्यासाठी तसेच तुमच्या मेंदूला शांत करण्यासाठी फार महत्त्वाचे आहे. तसेच या आसनामुळे शरीरावर तुमचा तोलही नीट राहतो.

त्रिकोनासन : हे पचन सुधारते आणि यकृत, स्वादूपिंड आणि पोटासाठी चांगले असते. पोट, कंबर, पाय आणि शरीराच्या बाजूच्या स्नायूंसाठी हे आसन करावे. तसेच पोटाची चरबीही कमी करते, मज्जातंतू शांत करण्यास मदत करते. कानाच्या समस्याही हे आसन केल्यानंतर दूर होण्यास मदत होते.

चक्रासन : सध्या चक्रासन या योगासन प्रकाराची जास्त चर्चा होते. चला तर चक्रासन हे योगासन सविस्तर जाणून घेऊ. चक्रासन हे एक उत्कृष्ट योगासन आहे, ज्याला इंग्रजीमध्ये व्हील योग पोझ असेही म्हणतात. त्याला योगामध्ये उर्ध्वा धनुरासन असेही नाव देण्यात आले आहे. यामुळे ऊर्जा आणि शरीरातील उष्णता वाढते, हात, पाय, पाठीचा कणा, पोटाचे स्नायू मजबूत होतात. पेक्टोरल स्नायू उघडतात. खांदे, तसेच हिप फ्लेक्सर व कोर स्नायू ताणले जातात. मासिक पाळीदरम्यान ज्यांना पोटदुखी, रक्तस्त्राव यांचा खूप त्रास होतो, त्यांच्यासाठीही हे आसन फायदेशीर आहे. तसेच मन शांत करण्यासाठीही याचा फायदा होतो. बेली फॅट म्हणजेच पोटावरची चरबी कमी करण्यासाठीही चक्रासन करणे फायदेशीर ठरते.

पादहस्तासन : हे आसन केल्याने पोटाच्या मांसपेशी निरोगी राहतात. स्नायू चांगले राहतात. पोटाशी संबंधित सर्व आजार दूर होण्यास मदत होते. यामुळे लठ्ठपणा आणि गॅसचा त्रास दूर होतो. शरीर लवचिक राहण्यास मदत होते. शरीरात ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते.

शशांकासन : एक दीर्घ खोलवर श्वास भरून घ्यायचा व तोंडाने जोरात फुंकर मारत सोडून द्यायचा. थोडक्यात श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना मी तणावमुक्त होत आहे हा विचार करायचा. क्षणभर का होईना खूप छान वाटतं. मनाला शांतता प्रदान करणारे आसन केल्या केल्या शांतता जाणवून देणारं एक नितांत सुंदर सोपं आसन म्हणजे शशांकासन.

वक्रासन: हे बसून करायचे आसन आहे. वक्र म्हणजे वाकडे. हे आसन करताना शरीर वक्र होते. या आसनामुळे पाठीच्या कण्याचा व्यायाम होतो. मानदुखी असलेल्यांनाही आराम मिळतो.

भुजंगासन : या आसनामुळे पोटाचे स्नायू ताणले जातात, त्यामुळे वाढलेलं पोट कमी होण्यासाठी त्याचा फायदा होतो. भुजंगासन करताना पोट ताणलेलं असताना चालू असलेल्या मंद श्वसनाचा उपयोग फुप्फुसांचं आरोग्य सुधारण्यासाठी होतो. या आसनामुळे फुप्फुसं मजबूत होतात

पवनमुक्तासन : पवनमुक्तासन या योगसाधनेतील एका आसनामुळे पोट सहज कमी करणं शक्य आहे. पवनमुक्तासनामुळे पोटाचा जडपणा कमी होतो, रक्तप्रवाह सुधारतो. चेतापेशी उद्दिपित होतात. पवनमुक्तासनामुळे पोटातील वायू बाहेर पडायला मदत होते. तसेच पवनमुक्तासनाला डिटाॅक्स व्यायाम प्रकार असंही संबोधलं जातं. पवनमुक्तासनामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.

शलभासन : शलभ म्हणजे टोळ. टोळ नावाच्या कीटकाच्या शरीराची पुढची बाजू खाली आणि मागची बाजू वर असते. हे आसन करताना माणसाचे शरीरही याप्रमाणे दिसते, त्यामुळे या आसनाला शलभासन असे म्हणतात. या आसनामुळे कंबर व नितंबाच्या स्नायूंना बळकटी येते. पोटावर दाब येत असल्याने पोटाचेही आरोग्य सुधारते. कंबरदुखी दूर होते.

सेतुबंधनासन : यामुळे पाठीचा कणा आणि खालच्या पाठीच्या स्नायूंची लवचिकता वाढते आणि बैठी काम करणाऱ्यांना या आसनाची मदत होऊ शकते.

हेही वाचा >> Mental Stress: अवघ्या काही मिनिटांत व्हाल तणावमुक्त अन् ताजेतवाने; करा फक्त ‘ही’ योगासने

नाडी शोधन : नाडी शोधन प्राणायामात डाव्या आणि उजव्या नासिकेने आलटून-पालटून श्वास घेतल्याने डाव्या व उजव्या मेंदूच्या कार्यात समतोल राखणे शक्य होते. केवळ काही मिनिटांचा सराव केल्याने मन आनंदी, शांत आणि स्थिर ठेवण्यास मदत होते. शारीरिक व मानसिक ताणतणाव घालवण्यासाठी हे प्राणायाम अधिक महत्त्वाचे आहे. या प्राणायामामुळे श्वसनमार्ग मोकळा होतो आणि रक्ताभिसरण सुधारते.