निरोगी जीवनशैलीसाठी नियमित योगा करणे आणि संतुलित आहार घेणे हे फायद्याचे ठरते. दररोज योगा केल्याने आरोग्याच्या विविध समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते. आजकाल यकृताचे आजार होण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. यकृत हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. अन्नपचनाची क्रिया व्यवस्थितपणे पार पाडण्याचे काम यकृत करते. यकृताचे कार्य बिघडले की, त्याचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होतो. यकृताचे आरोग्य चांगले राहावे आणि चुकीच्या आहाराचा कोणताही दुष्परिणाम होऊ नये, यासाठी डॉक्टरांनी काही योगासने सुचवली आहेत. योग तज्ज्ञ कामिनी बोबडे यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

संशोधन काय म्हणते?

मंगळुरू विद्यापीठाच्या संशोधनात सहभागींनी ४५ दिवस रोज एक तासाच्या योगानंतर यकृत एन्झाइम पातळीत उल्लेखनीय बदल झाल्याचे अनुभवले. चार आठवडे योग साधना, निसर्गोपचार व पारंपरिक औषधे यांमुळे यकृताची कार्ये, रक्तदाब व शरीराचे वजन यामध्ये त्यांना सुधारणा दिसून आली. चला तर मग जाणून घेऊ यकृत निरोगी ठेवण्यासाठी कोणती योगासने करावीत.

पश्चिमोत्तानासन

पश्चिमोत्तानासन हे योगासन अतिशय फायदेशीर आहे. या योगासनाला ‘सीटेड फॉरवर्ड बेंड’, असेही म्हटले जाते. या योगासनाचा नियमित सराव केल्याने संपूर्ण शरीराचे स्ट्रेचिंग होण्यास, तसेच मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. विशेष म्हणजे या योगासनामुळे शरीर लवचिक होते. पश्चिमोत्तानासनाचा दररोज सराव केल्याने तुमचे सर्वांगीण आरोग्य उत्तम राखणे, तसेच पाठीचा कणा आणि त्याच्या सभोवतालच्या स्नायूंमध्ये रक्ताभिसरण योग्य प्रकारे होणे यांसाठी मदत मिळते.

पश्चिमोत्तानासनाची पद्धत

१. पश्चिमोत्तानासन करण्यासाठी तुमच्यात परिपक्वता असणे आवश्यक आहे. जर हे योगासन तुम्ही पहिल्यांदाच करीत असाल, तर योगतज्ज्ञाची अवश्य मदत घ्या.

२. पश्चिमोत्तानासनाचा सराव हा सुरुवातीला तुम्हाला थोडा कठीण वाटू शकतो. परंतु, हळूहळू याचा सराव वाढवल्यास तुम्ही यात परिपक्व होऊ शकाल.

३. या योगासनाच्या सरावासाठी सर्वांत आधी योगा मॅटवर दोन्ही पाय पसरून जमिनीवर बसा.

४. त्यानंतर एक दीर्घ श्वास घ्या आणि तुमचे शरीर हळूहळू पुढे वाकवा.

५. आता तुमच्या पायाच्या बोटांना दोन्ही हातांनी स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.

६. या स्थितीमध्ये तुमचे दोन्ही गुडघे ताठ असायला हवेत.

७. आता काही सेकंद या स्थितीमध्ये राहिल्यानंतर तुम्हाला शरीरात ताण जाणवेल.

८. त्यानंतर तुम्ही पुन्हा सामान्य स्थितीमध्ये या.

हेही वाचा >> Low back pain: पाठदुखीची समस्या पाठ सोडत नाही? चिंता करु नका! डॉक्टरांनी सांगितले सोपे उपाय

मेरू वक्रासन : हे योगासन अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे यकृत, ग्रंथी, स्वादुपिंड व मूत्रपिंड सक्रिय होते. चला तर मग मेरू वक्रासन करण्याची योग्य पद्धत जाणून घेऊ.

मेरू वक्रासनाची पद्धत

हे बसून करावयाचे आसन आहे. वक्र म्हणजे वाकडे. हे आसन करताना शरीर वक्र होते. या आसनामुळे पाठीच्या कण्याचा व्यायाम होतो. मानदुखी असलेल्यांनाही या आसनामुळे आराम मिळतो.

१. दोन्ही पाय सरळ पुढे पसरवून दोन्ही हात बगलेत ठेवावेत. ताठ बसून नजर समोर ठेवावी.

२. उजवा पाय हळूहळू गुडघ्याकडे वळविताना डावा पाय गुडघ्यापासून अगदी सरळ ठेवावा.

३. त्यानंतर उजवा हात मागे घेऊन जा. हात पाठीच्या कण्याला समांतर ठेवा.

४. थोड्या वेळानंतर डावा पाय गुडघ्याकडे वळवून हे आसन पूर्ण करा.

५. त्यानंतर डाव्या हाताला उजव्या पायाच्या गुडघ्याकडे वाकडे करून जमिनीवर ठेवा.

६. मान हळूहळू मागच्या बाजूला वळवून पूर्णपणे मागे पाहण्याचा प्रयत्न करा.