Yoga For Spine Neck Spondylitis Pain: औषधांविना मणका आणि मानेचे आरोग्य सांभाळा योग किंवा योगासने हा अस्सल भारतीय प्रकार असून तो आता जगभरात लोकप्रिय होतो आहे. यासाठी आपल्याला कोणत्याही बाह्य गोष्टींची गरज नसते आणि सर्वात स्वस्त आणि सर्वात जास्त परिणामकारक असा हा प्रकार आहे, याची खात्री आता जगाला पटू लागली आहे. किंबहुना त्यामुळे जगभरात लोकप्रियता वाढताना दिसते आहे. यातील काही योगासने ही अगदी हृदय रोगापासून ते कॅन्सरपर्यंतही उपचारांसाठी उपयुक्त आहेत. त्याविषयी आपण गेल्या भागात माहिती घेतली. आता आपण आपला पाठीचा मणका कसा लवचिक ठेवायचा त्यासाठी कोणते आसन करायचे, याची माहिती घेणार आहोत.

अर्धवज्रासन

आजकाल पाठीच्या मणक्याचे विकार फार वाढत चालले आहेत. कारकुनी स्वरूपाच्या कामामुळे सतत पुढे वाकून लिहिणे, नकळत बाक काढून बसण्याची सवय व दीर्घकाळची बैठक, यामुळे मधुमेह वाढतो व कंबर विलक्षण दुखू लागते. अज्ञान म्हणा, व्यवसायातील एक भाग म्हणा, डॉक्टर लोक, वैद्यमंडळीही पेनकिलर औषधे देतात, रोगी खातात; पण माझा स्वत:चा अनुभव असा की, चवड्यावर पाय गुडघ्यात दुमडून आपण सवयीने खुर्चीतसुद्धा बसू शकतो. पँटवाले लोक व साडीवाल्या स्त्रियांना ते थोडे अवघड आहे; पण पाठ, कंबरदुखी इन्स्टंट थांबण्याकरिता अर्धवज्रासनात ताठ बसण्यासारखा व्यायाम नाही. त्यामुळे मणक्यांचे स्लिप डिस्कसारखे विकार सुधारतात.

पोटात वायू साठणार नाही

अर्धवज्रासनात म्हणजे बरोबर काटकोनात बसावे. असे आसन मी माझे दवाखान्यात खुर्चीवर बसून अनेक वर्षे करतो. उत्तम गुण आहे. फक्त गुडघेदुखी ज्यांची खूप काळजी आहे, त्यांनी फार वेळ हे आसन करू नये. हे आसन करताना भिंतीला किंवा खुर्चीला पूर्णपणे टेकावे म्हणजे चक्कर, तोल जाणे, फेकण्यासारखे होणे हा विकार दूर होतो. अर्धवज्रासनात ऑफिसमध्ये आलटून पालटून केले, तर मध्येच पाय खाली सोडून खुर्चीत बसावे. या आसनाने पोटात वायू साठत नाही, वायू त्रास न देता मोकळा होतो. मलावरोध टळतो. खुर्चीत असे बसणारा बॉस ताठ दिसतो, त्याचा दरारा वाढतो.

Indian-Yoga-Pranayam-Pritishree-Ingale
भारतीय योगासने- प्राणायाम- (फोटो सौजन्य- प्रितीश्री इंगळे)

कमान व्यायाम

साठीच्या माणसांच्या विकारांवर आणखी एक अक्सर इलाज म्हणजे कमान व्यायाम होय. मान व पाठीत क्रमाक्रमाने सावकाश वर्तुळाकार मागे वाकत जाऊन व शरीराचा तोल सांभाळून केलेला व्यायाम कंबरेच्या भागाचे दु:ख तात्काळ दूर करतो. जे स्थूल आहेत व कमान करावयाची भीती, धास्ती वाटते त्यांनी कोणाला तरी आपली कंबर पकडून ठेवावयास सांगावे, त्याचा आधार घेऊन हा व्यायाम करावा. या व्यायामात कंबरेतून वाकून पुन्हा वर येताना सावकाश यावे. कोणतीही कृती हिसक्याने घाईघाईने करू नये. कोनीकल मुव्हमेंट नको. सर्क्युलर- गोलाकार व्यायाम मात्र पाच-सहा वेळा ‘स्लो टाइम’मध्ये करावा.

जखडलेली कंबर बरी होते

कंबर बारीक होते. विशेषत: विशाल, अतिविशाल महिलांकरिता हा उत्तम व्यायाम आहे. घरी उभ्याचा ओटा व ऑफिसमध्ये टेबल यामुळे शरीराच्या मध्य भागाला अजिबात हालचाल, व्यायाम नसतो. मग छाती, कंबर, नितंब वाढतच जातात. काम करणाऱ्यांचे अंग कसे चवळीच्या शेंगांसारखे लवले पाहिजे. चटपटपणा पाहिजे. तो या कमान आसनात येतो. कमरेचा पट्टा वापरावा लागत नाही. आपण नेहमी पुढे वाकून काम करतो. त्याऐवजी उलटे मागे वाकावे. ‘निदान परिवर्जन’ किंवा मूळ कारण दूर होते. काही योगी मंडळी या व्यायामाला चक्रासन असे संबोधतात.

मानेचे व्यायाम

मानेच्या मणक्याकरिता डॉक्टर व तज्ज्ञ मंडळी मान गोलाकार व दोन्ही बाजूला मान कलवणे हा व्यायाम सांगतात. माझ्या अनुभवतात, आपले डोके, एका कानाकडे खाली वळवून दुसºया कानापर्यंत एकशे ऐंशी अंशात मागच्या बाजूने उखळीत बत्ता फिरवल्याप्रमाणे फिरवावे. डोके पुढील एकशे ऐंशी अंशात आणू नये. असे केले की, मानेचा स्पॉन्डीलायटिस विकार बळावत नाही. मानेला लागलेली रग कमी होते. चक्कर, फेकल्यासारखे होणे, तोल जाणे हा त्रास होत नाही. मानेचा पट्टा किंवा कॉलर वापरावी लागत नाही. या व्यायामाबरोबर उशी न घेणे ही खबरदारी घ्यावी.

प्राणायाम, दीर्घ श्वसन

‘प्राणायामे विनियोग:।’ हे संध्येतील वचन जरी ब्राह्मणांपुरते संपलेले असले तरी त्यापेक्षा फार मोठ्या संख्येने जगभर योगाभ्यास करणारे प्राणायाम या व्यायामाचा मोठा वापर करीत आहेत. प्राणायामामध्ये वायू तत्त्व- शुद्ध हवा- ऑक्सिजन; नाक, श्वासनलिका व फुप्फुसातून खेळविला जातो. प्राणवह स्रोतसाच्या श्वास, सर्दी, पडसे, नाक चोंदणे, आवाज बसणे, कोरडा व ओला खोकला, क्षय या सर्व विकारांत प्राणायाम नियमित करण्याचा खूप मोठा फायदा होतो.

…फुप्फुसाची ताकद वाढते

ज्यांना प्राणायाम नीट करता येत नाही त्यांनी त्यापेक्षा सोपा उपाय दीर्घ श्वसन याचा वापर करावा. एक नाकपुडी बंद करून दुसरीने श्वास घ्यावा. श्वास घ्यायला जेवढा वेळ लागतो त्यापेक्षा पाच अधिक अंक श्वास ठेवावा. नंतर बंद नाकपुडीने श्वास सावकाश सोडावा. या पद्धतीने श्वास घ्यावा. थोडा अधिक काळ ठेवावा व सावकाश सोडावा. या पद्धतीने आलटून-पालटून किमान पाच ते सहा वेळा करावे. या पद्धतीने केल्यावर मग दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घ्यावा व तोंडाने श्वास सोडावा. या प्रकारे पाच वेळा करावे. या दीर्घ श्वसनाने नाक, कपाळ, फुप्फुसातील लहान द्राक्षासारखे घोसातील मलिन कफ, अडथळे दूर होतात. ज्यांना फुप्फुसाची ताकद वाढवायची, छाती रुंदावयाची आहे, त्यांनी मात्र प्राणायाम जरूर अवलंबावा.

पळणे, पोहणे, दोरीच्या उड्या

तरुण मुले, मुली ज्यांना आपले शरीर मजबूत, बळकट करावयाचे आहे त्यांच्याकरिता साधे-सोपे घरात करू शकू, खर्च पडणार नाही असे व्यायाम खूप आहेत. त्यातील दोरीच्या उड्या हा सर्वात चांगला व्यायाम आहे. त्यामुळे स्टॅमिना वाढतो. रक्ताभिसरण सुधारते. उंची नक्कीच तीन महिन्यांत एक इंच वाढते. बास्केटबॉल, कुस्ती, बॉक्सिंग, फुटबॉल या सगळ्या खेळांकरिता लागणारी शारीरिक क्षमता निर्माण होते. त्यांच्या जोडीला पळणे, पोहणे, जोर बैठका या व्यायामांचा उपयोग जरूर करावा.

उंची वाढण्यासाठी उत्तम व्यायाम

तलावांच्या फीमुळे पोहणे महाग झाले असले तरी उंची वाढवायला, स्टॅमिना वाढवायला पोहण्यासारखा दुसरा चांगला व्यायाम नाही. माझी स्वत:ची उंची सातत्याने पोहण्याने दोन वर्षांत चार इंच वाढली यावर माझाच विश्वास आता बसणार नाही. पोहणे या व्यायामात शरीरातून घाम बाहेर जात नाही हा मोठा फायदा आहे. किमान ५० जोर, तरुण मुला-मुलींनी काढले तर त्यांना आयुष्यभराचे सामर्थ्य मिळते. औषधावर पैसे खर्च करण्यापेक्षा बैठका काढून त्यानंतर लागणाऱ्या खुराकावर- शेंगदाणे, खारीक, खोबरे यावर खर्च करू या.