Heart Attack Symptoms in Youth: सध्याची जीवनशैली, कामाचं प्रेशर तसंच इतर अनेक गोष्टींमुळे मानसिक आणि शारीरिक ताण असह्य होतो. त्यात तरूणांच्या बाबतीतही हीच परिस्थिती आहे. नुकतंच हरियाणाची अभिनेत्री आणि सोशल मीडिया पर्सनॅलिटी दिव्यांका सिरोही हिच्या अचानक निधनाच्या बातमीने मनोरंजनविश्वाला मोठा धक्का बसला आहे. रात्री अचानक प्रकृती बिघडली. त्यानंतर कुटुंबीयांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल्याचे वृत्त दि टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
माहितीनुसार, दिव्यांकाला घरातच हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले जात आहे. वयाच्या ३०व्या वर्षी हार्ट अटॅकने मृत्यू झाल्यामुळे तरूणांमध्ये यासंबंधित वाढणाऱ्या समस्यांबाबत पुन्हा चर्चा होऊ लागली आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे की, तरुण आणि वरकरणी निरोगी दिसणाऱ्या व्यक्तींनाही हृदयाशी संबंधित गंभीर समस्या होऊ शकतात का?
हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्ट एकच आहेत का?
डॉ. ऋषिकेश पाटील, असोसिएट डायरेक्टर, कार्डियाक हार्ट सेंटर, डॉ. एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटल यांच्या मते, हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्ट या दोन वेगळ्या वैद्यकीय स्थिती आहेत. हार्ट अटॅकमध्ये हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत अचानक अडथळा निर्माण होतो. त्यामुळे छातीत दुखणे किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
दुसरीकडे, कार्डियाक अरेस्टमध्ये हृदयाची विद्युत प्रणाली बिघडते आणि हृदय प्रभावीपणे रक्त पंप करणे अचानक थांबवते. हार्ट अटॅक हा कार्डियाक अरेस्टचा एक महत्त्वाचा कारण असू शकतो; मात्र कार्डियाक अरेस्टची इतरही अनेक कारणे असू शकतात. काही आनुवंशिक हृदयविकार, हृदयाच्या स्नायूंचे आजार, कोरोनरी आर्टरीमधील जन्मजात समस्या, मायोकार्डायटिस तसेच काही आनुवंशिक विद्युत विकार सुरुवातीला कोणतीही स्पष्ट लक्षणे न देता राहू शकतात.
तरुण वयात हृदयाशी संबंधित समस्या का होऊ शकतात?
डॉ. संजय कुमार चुघ, डायरेक्टर आणि युनिट हेड, कार्डिओलॉजी, आकाश हेल्थकेअर यांच्या मते, हृदयविकाराचा संबंध सामान्यतः वाढत्या वयाशी जोडला जातो. मात्र २० ते ३० या वयोगटातील व्यक्तींनाही हृदयाशी संबंधित समस्या होऊ शकतात. फक्त व्यक्ती फिट, सडपातळ किंवा बाहेरून निरोगी दिसते म्हणून हृदय पूर्णपणे निरोगी आहे, असे गृहीत धरता येत नाही.
आनुवंशिकता, वाढलेले कोलेस्टेरॉल, हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज, लठ्ठपणा, इन्सुलिन रेसिस्टन्स आणि काही विशिष्ट हृदयविकार यामुळे तरुण वयातही हृदयाशी संबंधित धोका निर्माण होऊ शकतो. याशिवाय धूम्रपान, शारीरिक हालचालींचा अभाव, असंतुलित आहार, जास्त मद्यपान, दीर्घकाळाचा ताण आणि अपुरी झोप यांसारख्या जीवनशैलीशी संबंधित सवयीही हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात.
कोविडनंतरचे हृदयाचे आरोग्य
डॉ. पाटील यांच्या मते, कोविड-१९ संसर्गाचा हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. संसर्गादरम्यान किंवा त्यानंतर शरीरातील दाह, रक्त गोठण्याची प्रक्रिया आणि रक्तवाहिन्यांच्या आतील अस्तरातील बदल यामुळे काही व्यक्तींमध्ये हृदयविकार, हृदयाची अनियमित धडधड किंवा स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. मात्र याचा अर्थ कोविड झालेल्या प्रत्येक तरुणाला हृदयविकाराचा धोका असतो, असा नाही. तरुणांमधील हृदयविकाराच्या जोखमीमध्ये धूम्रपान, उच्च कोलेस्टेरॉल, मधुमेह, हाय ब्लड प्रेशर, लठ्ठपणा, काही रक्तविकार, कोरोनरी आर्टरीच्या जन्मजात समस्या आणि इतर कारणांचाही विचार करावा लागतो.
तरुणांनी कोणती लक्षणं अजिबात दुर्लक्षित करू नयेत?
डॉ. चुघ यांच्या मते खालील लक्षणांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे:
- छातीत दुखणे किंवा दाब जाणवणे
- अचानक किंवा कारण नसताना श्वास लागणे
- चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे
- नेहमीपेक्षा जास्त आणि अनाकलनीय थकवा
- हृदयाची धडधड वेगाने किंवा अनियमित होणे
- व्यायाम किंवा शारीरिक मेहनत करताना त्रास जाणवणे
हृदयविकाराच्या झटक्यामध्ये छातीत दुखण्यासोबत घाम येणे, मळमळ, श्वास घेण्यास त्रास किंवा हात, खांदा, पाठ, मान अथवा जबड्याकडे जाणारे दुखणे अशी लक्षणेही दिसू शकतात. मात्र छातीत दुखणे म्हणजे नेहमी हार्ट अटॅकच असे नाही. अॅसिडिटी, स्नायूंच्या समस्या, चिंता किंवा इतर अनेक कारणांमुळेही छातीत दुखू शकते. त्यामुळे तीव्र, अचानक किंवा कारण न समजणारी लक्षणे वारंवार होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
कुटुंबातील इतिहास महत्त्वाचा का?
कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला कमी वयात हृदयविकार झाला असेल किंवा अचानक आणि कारण न समजता मृत्यू झाला असेल, तर ही माहिती डॉक्टरांना सांगणे महत्त्वाचे आहे. काही आनुवंशिक आजारांमध्ये सुरुवातीला कोणतीही ठळक लक्षणे दिसत नाहीत. उदाहरणार्थ, फॅमिलियल हायपरकोलेस्ट्रोलेमियामध्ये लहान वयापासून LDL कोलेस्ट्रॉलची पातळी खूप वाढू शकते, ज्यामुळे कमी वयात हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. अशा परिस्थितीत कुटुंबातील इतर सदस्यांनीही डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक तपासण्या करून घेण्याचा विचार करावा.
तरुण वयात कोणत्या तपासण्या उपयोगी ठरू शकतात?
डॉ. पाटील यांच्या मते प्रत्येक तरुण व्यक्तीने मोठ्या प्रमाणावर हृदयाच्या तपासण्या करून घेण्याची गरज नसते. मात्र नियमित आरोग्य तपासणीमध्ये पुढील बाबींकडे लक्ष देता येते:
- ब्लड प्रेशर, वजन आणि BMI, कंबरेचा घेर, कोलेस्टेरॉल, रक्तातील साखर/HbA1c, धूम्रपान आणि जीवनशैली आणि कुटुंबातील हृदयविकाराचा इतिहास.
काही व्यक्तींमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार Lp(a) सारख्या चाचण्यांचाही विचार केला जाऊ शकतो. ECG, ट्रेडमिल टेस्ट, इकोकार्डिओग्राफी किंवा CT कोरोनरी अँजिओग्राफी या तपासण्या प्रत्येक लक्षणविरहित आणि कमी-जोखीम असलेल्या तरुण व्यक्तीसाठी नियमितपणे आवश्यक असतीलच असे नाही. लक्षणे आणि वैयक्तिक जोखमीच्या आधारे डॉक्टर योग्य तपासणी ठरवू शकतात.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी तरुणांनी काय करावे?
हृदयाच्या आरोग्यासाठी प्रतिबंधक उपाय मध्यमवयात सुरू करण्याची गरज नाही. तरुण वयापासूनच काही सवयी अंगीकारणे फायदेशीर ठरू शकते. नियमित व्यायाम, संतुलित आणि हृदयासाठी पोषक आहार, निरोगी वजन, पुरेशी झोप, ताणाचे योग्य व्यवस्थापन आणि तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहणे याकडे लक्ष द्यावे. तसेच ब्लड प्रेशर, कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेची पातळीही वेळोवेळी तपासणे महत्त्वाचे आहे. ज्यांच्या कुटुंबात कमी वयात हृदयविकाराचा इतिहास आहे, तसेच ज्यांना उच्च कोलेस्टेरॉल, मधुमेह किंवा उच्च रक्तदाब आहे, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने अधिक नियमित तपासणी करून घ्यावी.
तरुणांच्या हृदयासाठी ‘फिट दिसणं’ पुरेसं नाही
दिव्यांका सिरोही यांच्या अचानक निधनाच्या वृत्तामुळे तरुण वयातील हृदयाच्या आरोग्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र अशा घटनेनंतर प्रत्येक २०-३० वर्षांच्या व्यक्तीने घाबरून जाण्याची गरज नाही, असे तज्ज्ञ सांगतात. महत्त्वाचे म्हणजे वय, शरीरयष्टी किंवा बाहेरून दिसणारा फिटनेस यावरच हृदयाच्या आरोग्याचा अंदाज बांधू नये.
