Natural Remedy for Uric Acid :संधिवाताचे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी एक म्हणजे गाऊट. शरीरातील युरिक ॲसिड वाढल्यामुळे प्रामुख्याने गाऊट होतो. जेव्हा मूत्रपिंडे युरिक ॲसिड पूर्णपणे बाहेर काढून टाकू शकत नाहीत, तेव्हा ते रक्तात जमा होऊ लागते आणि मग त्याचे सांध्यांमध्ये स्फटिक तयार होतात, ज्यामुळे तीव्र वेदना, सूज आणि लालसरपणा येतो. तज्ज्ञांच्या मते, युरिक ॲसिडची सामान्य पातळी ६ mg/dL पेक्षा कमी असावी. जर ते त्यापेक्षा जास्त असेल, तर गाऊटचा धोका वाढतो. गाऊटमुळे विशेषतः पायाची बोटे, हाताची बोटे आणि घोट्यांमध्ये अचानक तीव्र वेदना होतात. त्याकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास, त्यामुळे किडनी स्टोनची समस्यादेखील उद्भवू शकते.

एम्सचे माजी सल्लागार, साओल हार्ट सेंटरचे संस्थापक व ज्येष्ठ हृदयरोगतज्ञ डॉ. बिमल झज्जर यांच्या मते, युरिक ॲसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी केवळ औषधांवर अवलंबून राहणे पुरेसं नाही. योग्य आहार, संतुलित प्रथिन सेवन आणि काही पारंपरिक घरगुती उपायदेखील ही समस्या नियंत्रणात ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

डॉ. झांझर म्हणतात की, गाऊट टाळण्यासाठी लाल मांस, मद्यपान आणि उच्च प्रथिनयुक्त आहार टाळणे आवश्यक आहे. त्याव्यतिरिक्त मर्यादित प्रमाणात नियमितपणे एका विशिष्ट हर्बल चटणीचे सेवन करणे फायदेशीर ठरते. या चटणीमधील नैसर्गिक घटक दाहविरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहेत, जे सूज कमी करण्यास, शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास आणि युरिक ॲसिडची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकतात. चला जाणून घेऊया की, ही हर्बल चटणी कशी तयार केली जाते आणि ती गाऊट व वाढलेल्या युरिक ॲसिडच्या पातळीवर कशी मदत करू शकते.

हर्बल चटणी युरिक ॲसिडवर नियंत्रण कसे ठेवते?

हर्बल चटणी युरिक ऍसिड कमी करण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी प्रभावी मानली जाते. कोथिंबिरीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि दाहशामक गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात, जे सूज कमी करण्यास मदत करतात. या चटणीतील आले सूज कमी करते व सांधेदुखीपासून आराम देते. लसूण खाल्ल्याने युरिक ऍसिड कमी होण्यास मदत होते. मेथीचे दाणे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करतात आणि लघवीद्वारे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतात. जिऱ्यामुळे पचनक्रिया सुधारते, तर हळदीतील कर्क्युमिन सूज कमी करते. लिंबाचा रस शरीराला अल्कधर्मी बनविण्यास मदत करतो, तर अॅपल सायडर व्हिनेगर स्फटिक तयार होण्यास प्रतिबंध करतो.

युरिक अॅसिड नियंत्रणासाठी हर्बल चटणी कशी तयार करावी?

लागणारे साहित्य

  • अर्धा कप ताजी कोथिंबीर
  • १ मोठा चमचा किसलेले आले
  • १ मोठा चमचा लसूण
  • १ छोटी हिरवी मिरची
  • १ चमचा मेथीचे दाणे (रात्रभर भिजवलेले)
  • १ मोठा चमचा सफरचंद सायडर व्हिनेगर
  • पाव चमचा जिरे
  • पाव चमचा हळद पावडर
  • १ चमचा ताज्या लिंबाचा रस
  • पाव चमचा सैंधव मीठ किंवा काळे मीठ

तयारीची पद्धत

सर्वप्रथम भिजवलेल्या मेथीच्या दाण्यांमधील पाणी काढून टाका. आता सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून, थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्या. तयार झालेली पेस्ट एका स्वच्छ, कोरड्या, हवाबंद डब्यात फ्रिजमध्ये ठेवा.

चटणी कशी खावी?

रोज जेवणासोबत या चटणीचे एक-दोन चमचे खाणे फायदेशीर ठरेल. तज्ज्ञांच्या मते, नैसर्गिक उपायांनीही युरिक ॲसिड नियंत्रणात राहत नसल्यास, ॲलोपॅथिक औषधांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असू शकते.

कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?

  • लाल मांस आणि मद्यपान टाळा.
  • भरपूर पाणी प्या.
  • संतुलित प्रमाणात प्रथिने खा.
  • तुमच्या युरिक ॲसिडची पातळी नियमितपणे तपासा.