शिकागो : अंधाराऐवजी प्रकाशात झोप घेणाऱ्यांच्या हृदयगतीवर परिणाम होऊन हृदयविकार, मधुमेह, पचनावर दुष्परिणाम होण्याचा अधिक संभव असतो. प्रकाशात झोपी जाणाऱ्यांवर त्याचा काय दुष्परिणाम होतो, याचा अभ्यास नुकताच संशोधकांनी केला. त्यांच्या निष्कर्षांनुसार आपल्या शयनकक्षाचा एक दिवा जरी रात्रभर चालू ठेवला तरी आपल्या हृदयाची धडधड वाढते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी आपल्या  चयापचय प्रक्रियेवर परिणाम होतो. अंधार करून झोपण्याची सवय आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगली असते.

शिकागोच्या विद्यापीठातील संशोधकांनी झोपायच्या ठिकाणी विविध तीव्रतेचा प्रकाश असताना झोप घेतल्यास प्रकृतीवर काय परिणाम होतात, याचा अभ्यास केला.  झोपताना अगदी दूरचित्रवाणी (टीव्ही) उशिरापर्यंत पहात राहिल्याने स्थूलपणा वाढतो. सकाळी अथवा रात्री मंद प्रकाशाऐवजी नीलप्रकाशाने रक्तशर्करा वाढून इन्शुलिन प्रतिरोध कमी होऊन रक्तशर्करा वाढते, असा निष्कर्षही दुसऱ्या एका अभ्यासात काढण्यात आला होता. झोपताना प्रकाश असल्यास ज्येष्ठांमध्ये  टाईप २ मधुमेह होण्याचा धोका असतो.

या अभ्यासात संशोधकांनी २० जणांचे दोन गट केले व ३ दिवस आणि २ रात्री प्रयोगशाळेत मुक्काम करायला लावला व त्यांच्या झोपेचा अ‍ॅक्टिग्राफी (झोपेची तीव्रता मोजणारे यंत्र) आणि नोंदवहीद्वारे अभ्यास केला. पहिल्या गटाला पहिल्या रात्री मंद प्रकाशात झोपवले गेले. दुसऱ्या रात्री तीव्र प्रकाशात निजवण्यात आले. दुसऱ्या गटाला दोन्ही रात्री मंद प्रकाशात झोपवण्यात आले. त्यानंतर सहभागी व्यक्तींचे रक्तनमुने घेण्यात आले. त्यांच्या झोपेची गुणवत्ता तपासण्यासाठी पॉलिसोम्नोग्राफीही करण्यात आली. दर दोन तासांनी या सहभागी व्यक्तींना पेंगुळलेपणा जाणवतो का, त्यांची भावावस्था बदलते का अथवा त्यांच्या भुकेवर काही परिणामांचे सर्वेक्षण केले. दर दोन तासांनी रक्तदाब व दर चार तासांनी हृदयगती मोजली.