Constipation Relief Tips : तुम्हीही बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त आहात का? शौचासाठी टॉयलेटमध्ये खूप वेळ बसून राहावे लागते का, ज्यामुळे दिवसातील बराच वेळ याच त्रासात जातो? सकाळी उठल्यावर पोट साफ न होणे ही अनेक लोकांसाठी रोजची डोकेदुखी बनली आहे. काही लोक याकडे सामान्य समस्या म्हणून दुर्लक्ष करतात, तर काही जण लगेच औषधे किंवा घरगुती उपाय सुरू करतात. पण तुम्हाला माहीत आहे का की, बद्धकोष्ठतेचा थेट संबंध तुमच्या दैनंदिन जीवनशैली आणि आहाराशी असतो? आहारात फायबरची कमतरता, कमी पाणी पिणे आणि व्यायाम न करणे ही यामागची प्रमुख कारणे आहेत.

बद्धकोष्ठता म्हणजे फक्त रोज पोट साफ न होणे एवढेच नाही. मल अतिशय कडक होणे, शौचाच्या वेळी जास्त जोर लावावा लागणे किंवा पोट पूर्ण साफ झाले नाही असे वाटणे, हीदेखील बद्धकोष्ठतेचीच लक्षणे आहेत.

योग्य आहार आणि फायबर आवश्यक

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, जीवनशैलीत काही छोटे बदल करून या समस्येतून सुटका मिळवता येते. परंतु, जर बद्धकोष्ठता सतत राहत असेल, मलप्रवाहात रक्त येत असेल, अचानक वजन कमी होत असेल किंवा पोटात तीव्र वेदना होत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे.

१. फायबर आणि पाण्याचे प्रमाण वाढवा

फायबर मल मऊ ठेवण्यास आणि आतड्यांची हालचाल सुरळीत ठेवण्यास मदत करते. आहारात फळे, भाज्या, मोड आलेली कडधान्ये, डाळी आणि पूर्ण धान्यांचा (Whole grains) अभाव असल्यास बद्धकोष्ठता होऊ शकते. प्रौढ व्यक्तीला दररोज साधारण २२ ते ३४ ग्रॅम फायबरची गरज असते. मात्र, फायबर वाढविण्यासोबतच पुरेसे पाणी पिणेही तितकेच महत्त्वाचे आहे. शरीरात पाणी कमी पडल्यास शौचाला कडक होते.

२. शारीरिक हालचाली कमी आहेत का?

शौचाची भावना झाल्यावर ती वारंवार रोखून ठेवल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास वाढतो. असे सतत केल्यास नैसर्गिक सवय बिघडू शकते. त्याशिवाय, दिवसभर एकाच जागी बसून राहणे आणि शारीरिक हालचाल न करणे यांमुळेही पचनसंस्था मंदावते.

दररोज नियमित चालणे किंवा क्षमतेनुसार हलका व्यायाम केल्याने आतड्यांची हालचाल सुधारते आणि पोट साफ होण्यास मदत होते.

३. ‘या’ गोष्टींचीही घ्या काळजी

जर बद्धकोष्ठता केवळ चुकीच्या जीवनशैलीमुळे असेल, तर आहार, पाणी आणि व्यायामातील बदलांमुळे ती लगेच ठीक होऊ शकते. पण जर हा त्रास खूप जुना असेल, तर त्यामागे काही औषधे, थायरॉईड, मधुमेह (Diabetes) किंवा आतड्यांचे विकार असू शकतात. त्यामुळे वेळीच तपासणी करून घेऊन, योग्य ते उपचार घेणे गरजेचे आहे.

जर मलप्रवाहातून रक्त येत असेल, विनाकारण वजन घटत असेल, सतत पोटदुखी, उलट्या किंवा गॅसचा त्रास होत असेल, तर डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या. पोटाच्या गंभीर आजारांमुळेही बद्धकोष्ठता होऊ शकते, ज्यावर वेळेत उपचार होणे आवश्यक आहे.