scorecardresearch

आरोग्यवार्ता : संप्रेरक संतुलन बिघडवणारे घटक टाळा!

आपल्या भाव-भावनांपासून (मूड) वजनापर्यंत अनेक बाबींत शरीरातील संप्रेरके (हार्मोन) महत्त्वाची ठरतात.

आरोग्यवार्ता : संप्रेरक संतुलन बिघडवणारे घटक टाळा!
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : आपल्या भाव-भावनांपासून (मूड) वजनापर्यंत अनेक बाबींत शरीरातील संप्रेरके (हार्मोन) महत्त्वाची ठरतात. प्रकृती चांगली राखण्यासाठी संप्रेरकांसारखे रासायनिक घटक अत्यावश्यक असतात. या संप्रेरकांत असंतुलन झाल्यास आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होतात. टाइप २ मधुमेह, हायपोथायरॉइडिझम (थॉयरॉइड विकार), स्थूलत्व,  स्त्रियांत पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस), त्रासदायक मासिकपाळी, वंध्यत्व, सांधे विकार, तोंडावरचे मुरूम, अनावश्यक केस आदी विकार संप्रेरकांच्या असंतुलनामुळे होतात.

संप्रेरक संतुलनावर परिणाम करणारे घटक

संप्रेरकांचे असंतुलन होण्यामागे अनेक घटक कारणीभूत आहेत. आहार यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावतो. आवश्यक पोषक आहाराअभावी, तसेच अनावश्यक आहारामुळेही संप्रेरकांवर दुष्परिणाम होतो. साखरेचा समावेश असलेल्या प्रक्रियायुक्त अन्नामुळे शरीरातील ‘इन्श्युलिन’चे प्रमाण वाढून, शरीरावर सूज येते. तसेच ‘इन्श्युलिन’ स्तर वाढल्याने स्थूलत्वाची जोखीम वाढते. तसेच इस्ट्रोजन व टेस्टोस्टेरॉन या संप्रेरकांचे प्रमाण अयोग्यरीत्या वाढते. दूध अथवा दुग्धजन्य पदार्थाच्या अतिसेवनानेही संप्रेरक संतुलन बिघडते. त्यामुळे आतडय़ांना सूज येते. एकूण पचनसंस्थेवर परिणाम होतो. साखर, अल्कोहोल, कॅफेन, ताण आणि पुरेशा झोपेच्या अभावामुळे ‘कॉर्टिझोल’ हे तणाववाढ करणारे संप्रेरक वाढते. हे प्रभावी संप्रेरक असून, इतर महत्त्वाच्या संप्रेरकांवरही ते दुष्परिणाम करते. सौम्य व्यायामामुळे ‘कॉर्टिझोल’चे प्रमाण घटते. प्लास्टिक बाटल्या, कंटेनर, श्ॉम्पू, सुगंधी द्रव्यातील (परफ्यूम) रासायनिक घटक, डिओड्रंट, भाजीपाला-अन्नधान्यातील रासायनिक द्रव्ये (पेस्टिसाइड) यामुळेही संप्रेरकांच्या कार्यावर दुष्परिणाम होतो. व्यायामाचा-शारीरिक हालचालींचा अभाव, बैठय़ा कार्यशैलीमुळे कामोत्तेजक संप्रेरकांचा स्तर घटतो.

 संतुलन करण्यासाठी काय करावे?

संतुलित पोषणयुक्त आहार, पौष्टिक कबरेदकयुक्त आहार, प्रथिने, चांगला मेदयुक्त घटक असलेले पदार्थ संप्रेरक निर्मितीस व संतुलनास मदत करतात. त्याचबरोबर सेंद्रिय अन्नधान्य-भाजीपाला खाणे गरजेचे आहे. जीवनातील तणावाचे योग्य व्यवस्थापन करून, तो कमी करणे आणि पुरेसा व्यायाम करणे संप्रेरक संतुलनासाठी गरजेचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Healthnews avoid factors disrupt hormone balance body hormone nature ysh