लंडन : करोना झालेल्या रुग्णांना करोना न झालेल्यांच्या तुलनेत मेंदुविकार (न्यूरो डीजनरेटिव्ह) होण्याचा धोका जास्त असतो. एका अभ्यासात संशोधकांना असे आढळले, की ज्यांना करोनाची लागण झाली आहे त्यांना स्मृतिभ्रंश (अल्झायमर), कंपवात (पार्किन्सन्स) आणि पक्षाघात होण्याची शक्यता जास्त आहे.

मेंदूच्या एखाद्या भागाला रक्तपुरवठा खंडित होऊन मेंदूच्या ऊतींना ऑक्सिजन आणि पोषक तत्त्वे पुरेशी न मिळाल्याने पक्षाघात होतो. व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) येथे युरोपियन अकादमी ऑफ न्यूरोलॉजीच्या आठव्या परिषदेत रविवारी सादर करण्यात आलेल्या या अभ्यासात डेन्मार्कच्या अर्ध्याहून अधिक लोकसंख्येच्या आरोग्यविषयक नोंदींचे विश्लेषण करण्यात आले. या अभ्यासात नऊ लाख १९ हजार ७३१ जणांची कोविड-१९ चाचणी करण्यात आली. त्यापैकी ४३ लाख ३७५ जणांना संसर्ग झाल्याचे आढळले. या रुग्णांत स्मृतिभ्रंशाचा त्रास होण्याची शक्यता ३.५ पटींनी जास्त होती. तसेच कंपवाताचा त्रास होण्याची शक्यता २.६ पटींनी जास्त व पक्षाघात २.७ पटीने आणि मेंदूमध्ये रक्तस्राव (इंटरसेरेब्रल ब्लीिडग) होण्याची शक्यता ४.८ पटीने जास्त असल्याचे आढळले. 

संशोधकांच्या मते करोना काळात मेंदूला सूज आल्याने या विकारांची शक्यता अधिक बळावते. हे विकार होण्यामागे करोना काळात मेंदूला आलेली सूज असू शकते.  या अभ्यासात फेब्रुवारी २०२० ते नोव्हेंबर २०२१ दरम्यान डेन्मार्कमधील कोविड रुग्ण, महासाथीच्या आधीचे रुग्ण आणि महासाथीच्या आधीच्या इन्फ्लूएंझा रुग्णांचेही विश्लेषण करण्यात आले. संभाव्य जोखमीची गणना करण्यासाठी संशोधकांनी सांख्यिकीय तंत्रांचा वापर केला आणि परिणाम रुग्णालयात दाखल झाल्यानंतरची स्थिती, वय, लिंग आणि पूर्वी असलेल्या रोग-विकारांनुसार रुग्णांचे वेगवेगळे गट करून हा अभ्यास करण्यात आला.