दही हे एक प्रोबायोटिक आहे, जे चांगल्या जीवाणूंनी समृद्ध आहे. जे आतड्यांचे आरोग्य आणि पचनक्रिया सुधारते. उन्हाळ्यात दही खाणे फायदेशीर मानले जाते. कारण- याच्या सेवनाने शरीरास थंडावा मिळतो. त्याशिवाय त्यात प्रोटीन, कॅल्शियम व लॅक्टिक अॅसिडसह अनेक पोषक तत्त्वे असतात. त्यामुळे तुमच्या दैनंदिन आहारात दह्याचा समावेश करणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते त्यामुळे स्नायू, तसेच हाडांचे आरोग्य सुधारते. तसेच त्वचा आणि केसांसाठीदेखील ते फायदेशीर ठरते. पण, काही लोकांना दही खाल्ल्यानंतरही अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो. दह्याबरोबर काही चुकीचे पदार्थ खाल्ल्याने असे घडते. त्यामुळे दह्याबरोबर काय खावे आणि काय खाऊ नये याविषयी जाणून घेऊ..

आयुर्वेदात आहारविषयक अनेक नियम सांगितले आहेत, ज्यात काही फूड कॉम्बिनेशन अत्यंत फायदेशीर मानले जातात; तर काही हानिकारक आहेत. दही आरोग्यासाठी फायदेशीर आहे; परंतु चुकीच्या पदार्थांबरोबर ते खाल्ल्याने अॅसिडिटीसारख्या आरोग्य समस्या उदभवू शकतात. आहारतज्ज्ञ श्वेता शाह यांनी दही खाण्याची योग्य पद्धत समजावून सांगितली आहे.

दह्यात ‘ही’ गोष्ट मिसळून खाऊ नका

आहारतज्ज्ञ श्वेता शाह सांगतात की, दही हा एक अतिशय आरोग्यदायी पदार्थ आहे; परंतु कधी कधी चुकीच्या पदार्थाबरोबर खाल्ल्यास त्रास होऊ शकतो. दही खाल्ल्यानंतरही आम्लपित्त किंवा गॅस होऊ शकतो. त्यामुळे सल्ला दिला जातो की, दही मिठाबरोबर खाऊ नये. उन्हाळ्यात अनेक जण रायता बनवून खातात; पण मीठ आणि दही हे आरोग्यदायी मानले जात नाही.

‘या’ पदार्थांनी मिळेल थंडावा

आहारतज्ज्ञ श्वेता शाह सांगतात की, दह्यामध्ये साखर किंवा खडीसाखर मिसळून खाल्ल्याने थंडावा मिळतो. म्हणून जर तुम्हाला उन्हाळ्यात दही आवडत असेल, तर ते साखर किंवा खडीसाखर मिसळून खाण्याचा प्रयत्न करा.

पित्त नियंत्रित करेल दही

आहारतज्ज्ञ श्वेता शाह सांगतात की, आवळा पावडरबरोबर दही खाल्ल्याने तुमच्या शरीरातील पित्त नियंत्रित होण्यास मदत होते. आवळ्यामध्ये क जीवनसत्त्व असल्याने हे मिश्रण तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करते. आवळा त्वचेसाठी आणि केसांसाठीदेखील फायदेशीर आहे.

दही वडा सर्वांत खराब कॉम्बिनेशन

दही वडा अनेक जण आवडीने खातात. त्याबाबत आहारतज्ज्ञ श्वेता शाह सांगतात की, दही हे उडदाच्या डाळीपासून बनवलेल्या वड्याबरोबर खाणं आरोग्यासाठी घातक आहे. तुम्ही त्याऐवजी मूग डाळीचे वडे बनवू शकता. हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

दही खाण्याची योग्य वेळ

तुम्ही दुपारच्या जेवणाच्या वेळी दही खाऊ शकता. ती दही खाण्याची योग्य वेळ आहे. तसेच तुम्ही नाश्त्यातही दही खाऊ शकता. सकाळी उठल्यावर सर्वांत आधी काहीतरी हलके खा. त्यानंतर दुपारच्या जेवणात दह्याचा समावेश करा. रात्री दही खाणे हे आरोग्यासाठी योग्य नाही. विशेषतः जर तुम्हाला कफ, सर्दी, खोकला किंवा घसा खवखवणे यांसारख्या समस्या असतील, तर रात्री दही खाणे टाळा.