Best Cookware For Health Cooking Utensils : आजकाल स्वयंपाकासाठी नॉन-स्टिाक आणि कोटिंग असलेल्या भांड्यांचा वापर खूप वाढला आहे. मात्र, या भांड्यांवरील कोटिंगबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारची भांडी आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. या पार्श्वभूमीवर, आयुर्वेदिक हेल्थ कोच डिंपल जांगडा यांनी नॉन-स्टिक भांड्यांऐवजी कोणती भांडी वापरणे फायदेशीर ठरू शकते? याबद्दल माहिती दिली आहे.

कास्ट आयर्नची (बीडाची) भांडी :

कास्ट आयर्नच्या कढईत किंवा भांड्यात अन्न शिजवल्याने जेवणातील लोहाचे (आयर्न) प्रमाण लक्षणीयरीत्या वाढते. तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल, तर यात स्वयंपाक करणे अत्यंत फायदेशीर ठरते. पण यामध्ये टोमॅटो किंवा लिंबू यांसारखे आंबट आणि ॲसिडिक पदार्थ शिजवणे टाळावे.

मातीची भांडी :

मातीच्या भांड्यांचा वापर स्वयंपाकाव्यतिरिक्त पिण्याचे पाणी ठेवण्यासाठीही केला जाऊ शकतो. उकळलेले पाणी मातीच्या मडक्यात ठेवल्याने ते नैसर्गिकरीत्या थंड होते आणि त्यातील खनिजांचे प्रमाण सुधारते. तसेच मातीच्या भांड्यात अन्न शिजवल्याने त्यातील पोषक तत्वे आणि चव दोन्ही टिकून राहतात.

तांब्याची भांडी :

तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवल्यास त्याच्या अँटीमायक्रोबियल गुणधर्मांमुळे पाण्यातील हानिकारक जीवाणू आणि विषाणू मोठ्या प्रमाणावर नष्ट होतात. तांब्याच्या भांड्यात पाणी फक्त ८ ते १२ तास ठेवूनच प्यावे. तसेच तांब्याची भांडी दररोज स्वच्छ करावीत.

प्लास्टिकऐवजी काच आणि स्टीलची भांडी :

जेवण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी प्लास्टिकच्या भांड्यांचा अजिबात वापर करू नका. त्याऐवजी काच आणि स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांचा वापर करा.