फळे, पालेभाज्या, कडधान्य आणि मासे खाल्ल्याने जास्त वजन असलेल्या व्यक्तींना नियमित होणारा वेदनांचा त्रास कमी होण्यास मदत होत असल्याचे एका नव्या अभ्यासात दिसून आले आहे

शरीराचे वजन वाढणे आणि वेदना होणे याचा परस्परांशी संबंध आहे. शरीराचे वजन वाढल्याने शरीरात दाह होऊन वेदना होण्यास सुरुवात होते. मात्र दाह कमी करणारे अन्न घेतल्याने या वेदना कमी होत असल्यचे दिसून आले.

मासे, काजू आणि सोयाबीन हे शरीरातील वाढलेला दाह कमी करण्यात महत्त्वाची भूमीका बजावतात. दाह कमी झाल्यामुळे शरीरातील वेदना कमी होण्यास मदत होत असल्याचे दिसून आले, असे अमेरिकेतील ओहिओ स्टेट विद्यापीठाचे संशोधक चार्ल्स एमरी यांनी माहिती देताना सांगितले.

आरोग्यदायी अहार आणि वजन व वेदना यांचा परस्परांशी संबंध असल्याचे आम्हाला दिसून आले. मात्र यावर उपाय म्हणून समुद्री अन्न, वनस्पती प्रथिने अर्थात मटार, काजू आणि सोयाबीन घेतल्यास शरीराच्या वेदना कमी होण्यास मदत मिळत असल्याचे एमरी यांनी सांगितले.

आपण जास्त प्रमाणात अहार घेण्यापेक्षा संपूर्ण अहार घेतल्यास त्याचा शरीरावर सकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसून येते. अहारामध्ये फळे, भाजीपाला, मासे, कडधान्य घेतल्यास त्याचा जास्त वजन असलेल्या व्यक्तींच्या शरीरातील दाह कमी करून वेदना कमी करण्यास मोलाची मदत होत असल्याचे संशोधकांना अभ्यासात दिसून आले.

या अभ्यासासाठी २० ते ७८ वर्षे वयोगटाच्या ९८ पुरुष आणि स्त्रियांना सहभागी करून घेण्यात आले होते. त्यांना निरोगी अहार देण्यात आल्याने त्यांच्या शरीरामध्ये होत असलेल्या वेदना कमी झाल्याचे दिसून आले. हे संशोधन ‘पेन’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.