सडपातळ होण्यासाठी तुम्ही आहारनियमन (डाएट) करता मात्र काहीच परिणाम होत नाही. मग तुमच्या नियोजनात काही चूक तर नाही ना? काही आवडणारे पदार्थ आहारात टाळून मग बारीक होऊ यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र त्याचा परिणाम फारसा होत नाही. त्यापेक्षा तुम्हाला जेवताना आनंद वाटेल असा पौष्टिक आहार करा, असा सल्ला संशोधकांनी दिला आहे.
जे आवडते ते खाण्याचे टाळल्यास अनेक वेळा परिणाम उलटा होतो, असे मत अमेरिकेच्या बेलोर विद्यापीठातील मेरिडीथ डेव्हिस यांनी व्यक्त केले. याबाबत ५४२ जणांचा समावेश करून तीन अभ्यास करून हे निष्कर्ष काढल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत काही जणांना जेव्हा विचारणा केली तेव्हा काही गोष्टी आम्ही खाताना कटाक्षाने टाळत असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यांचे खाण्यावर नियंत्रण कमी आहे त्यांना असे नियमन करण्यात फारसे यश मिळत नाही. अशा लोकांना तेलकट पदार्थ अधिक आवडतात, तर उत्तम आहारनियमन करणाऱ्या व्यक्ती हे पदार्थ टाळतात. पौष्टिक आहार कटाक्षाने करणाऱ्या व्यक्तींना स्वाभाविकपणे यात यश आल्याचे आम्हाला या संशोधनात आढळल्याचे डेव्हिस यांनी सांगितले. आजारांना आमंत्रण देईल असे पदार्थ खाऊच नयेत असे त्यांनी सांगितले.




सध्या तर विविध माध्यमांद्वारे काय खावे, आहारात काय असू नये याचे सल्ले दिले जातात. तुम्ही जेव्हा आहारनियमन करू पाहता तेव्हा परिपूर्ण आहारावर लक्ष केंद्रित करा, असा सल्ला डेव्हिस यांनी दिला आहे.
(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)