Side effects of eating oats daily: अनेक जण नाश्त्यामध्ये ओट्सचे सेवन करणे पसंत करतात. फिटनेसकडे चांगल्या प्रकारे लक्ष देणारे लोक ओट्सचे सेवन करण्यास प्राधान्य देतात. त्याशिवाय हल्ली वजन नियंत्रणात ठेवण्यापासून शरीर फिट ठेवण्यासाठीही दैनंदिन आहाराऐवजी ओट्सचे सेवन केले जाते. नुसते ओट्स खाऊन कंटाळा येत असल्याने त्यापासून हल्ली वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. दरम्यान, हृदयाच्या आरोग्य सांभाळण्यापासून वजन नियंत्रणात ठेवण्यापर्यंत ओट्सचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यातील पौष्टिक घटकांमुळे तुम्ही संतुलित आणि निरोगी आयुष्य जगू शकता. परंतु, कोणत्याही गोष्टीचे अति सेवन शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दररोज नाश्त्यामध्ये ओट्स खाणे, विशेषतः बाजारात मिळणारे फ्लेवर्ड किंवा इन्स्टंट ओट्स प्रत्येकासाठी फायदेशीर नसतात. त्याचे सतत आणि अति सेवन केल्याने पोट फुगणे, गॅस आणि काही पोषक अन्नाची कमतरता यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

ओट्स पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात; परंतु दररोज आणि जास्त प्रमाणात त्याचे सेवन केल्याने काही लोकांना आरोग्य समस्यांचा त्रास होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, संतुलित प्रमाणात आणि मर्यादित दिवसांसाठी ओट्स खाणे अधिक चांगले आहे. चला, दररोज ओट्स खाण्याने शरीरावर होणारे परिणाम आणि त्याचे किती प्रमाण सुरक्षित मानले जाते हे जाणून घेऊ…

झटपट आणि पौष्टिक ओट्सचा नाश्ता

डॉक्टरांच्या मते, आजकाल लोकांनी जीवनशैली खूपच व्यग्र झाली आहे. त्यामुळे बरेच लोक झटपट नाश्ता करणे पसंत करतात. याच कारणामुळे ओट्सची लोकप्रियता खूप वाढली आहे आणि अनेक लोकांनी आपल्या रोजच्या नाश्त्यामध्ये त्यांचा समावेश करण्यास सुरुवात केली आहे.

दररोज ओट्स खाणं आरोग्यासाठी घातक

ग्लुटेन संवेदनशीलतेचा धोका वाढतो

ओट्स नैसर्गिकरीत्या ग्लुटेनमुक्त असतात; परंतु ज्या कारखान्यांमध्ये ते बनवले जातात, तिथेच गव्हावरही प्रक्रिया केली जाते. परिणामत: क्रॉस कंटॅमिनेशनमुळे काही लोकांना ग्लुटेनची संवेदनशीलतेचा त्रास होऊ शकतो. सीलिअॅक रोग असलेल्या लोकांनी याबाबत विशेष सावधगिरी बाळगली पाहिजे.

गॅस आणि पोटफुगीची समस्या वाढते

ओट्समध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. फायबर शरीरासाठी आवश्यक असले तरी त्याचे जास्त सेवन केल्यास गॅस, पोट फुगणे असे त्रास होऊ शकतात. त्याचप्रमाणे अशा अति सेवनाने पोषक तत्त्वांचे शोषणही कमी होते.

फायटिक अॅसिड जे पोषक तत्वांना कमी करते

ओट्समध्ये फायटिक ऑसिड असते, जे कॅल्शियम, लोह व जस्त यांसारख्या खनिजांच्या शरीरातील शोषणात अडथळा आणू शकते. दीर्घकाळ मोठ्या प्रमाणात ओट्सचे सेवन केल्याने या पोषक तत्त्वांची कमतरता निर्माण होऊ शकते.

कॅलरी ओव्हरलोडचा धोका

ओट्स निश्चित पौष्टिक आहेत; पण ते कॅलरीयुक्त पदार्थ म्हणूनही ओळखले जातात. जर प्रमाणात सेवन केले नाही, तर अगदी कमी प्रमाणात सेवन केल्यानेही अतिरिक्त उष्मांक शरीरात जाऊन वजन वाढू शकते.

पोषक तत्त्वांचे असंतुलन होऊ शकते

जर एखादी व्यक्ती दररोज नाश्त्यामध्ये फक्त ओट्सचाच समावेश करीत असेल, तर शरीराला इतर आवश्यक पोषक तत्त्वे पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. त्यामुळे आहारात विविधता राखणे आवश्यक आहे. माफक प्रमाणात ओट्सचे सेवन करण्याचेही मोठे फायदे आहेत.