Healthy Roti for Cholesterol Control: आजकाल बदललेली जीवनशैली, बैठे काम, व्यायामाचा अभाव आणि आहारातील वाढलेले तेलकट व प्रक्रिया केलेले पदार्थ यांमुळे लठ्ठपणा आणि कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या अनेकांमध्ये दिसून येते. विशेष बाब म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढले तरी सुरुवातीला शरीरात कोणतीही ठळक लक्षणे जाणवत नाहीत. त्यामुळे अनेकांना ही समस्या आहे, याची कल्पनाच नसते. मात्र, कोलेस्ट्रॉलचे प्रमाण दीर्घकाळ नियंत्रणाबाहेर राहिल्यास हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

अशा वेळी आहाराकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरते. तुम्ही दररोज दोन वेळा पोळी खात असाल, तर पोळी बनवण्याची पद्धत थोडी बदलून, त्यात काही तंतुमय पदार्थांचा समावेश करता येऊ शकतो. काही पदार्थांचा योग्य प्रमाणात वापर केल्यास आहारातील तंतू वाढण्यास मदत होऊ शकते.

कोलेस्ट्रॉल म्हणजे नेमकं काय?

कोलेस्ट्रॉल हा शरीरासाठी आवश्यक असलेला मेदासारखा पदार्थ आहे. शरीरातील पेशी तयार करण्यासाठी, काही हार्मोन्सच्या निर्मितीसाठी आणि इतर महत्त्वाच्या प्रक्रियांसाठी त्याची गरज असते. मात्र, रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त झाल्यास समस्या निर्माण होऊ शकते.

कोलेस्ट्रॉलचे प्रामुख्याने एलडीएल आणि एचडीएल, असे दोन महत्त्वाचे प्रकार सांगितले जातात. एलडीएलला अनेकदा ‘खराब कोलेस्ट्रॉल’ म्हटले जाते. कारण- त्याचे प्रमाण जास्त असल्यास रक्तवाहिन्यांच्या भिंतींमध्ये मेद साचण्यास हातभार लागू शकतो. एचडीएलला ‘चांगले कोलेस्ट्रॉल’ म्हटले जाते. त्याशिवाय ट्रायग्लिसराइड्स हा रक्तात आणखी एक महत्त्वाचा मेद हा चरबीचा प्रकार आहे. ज्याचे वाढलेले प्रमाणही हृदयाच्या आरोग्यासाठी चिंतेचे ठरू शकते.

कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयविकाराचा धोका का वाढतो?

रक्तातील एलडीएलचे प्रमाण जास्त राहिल्यास कालांतराने रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक म्हणजे मेदाचे थर जमा होऊ शकतात. त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होण्याची शक्यता असते. रक्तप्रवाहात अडथळा निर्माण झाल्यास हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघातासारख्या गंभीर समस्यांचा धोका वाढू शकतो.

म्हणूनच कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी केवळ औषधांवर अवलंबून न राहता संतुलित आहार, नियमित व्यायाम, वजन नियंत्रण आणि धूम्रपान टाळणे याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

१. पोळीच्या पिठात जवस मिसळा

जवसाच्या बियांमध्ये तंतू आणि ओमेगा-३ या प्रकारची चरबी आढळते. जवस बारीक करून, त्याची पूड तयार करता येते. पोळीचे पीठ मळताना त्यात साधारण दोन ते चार चमचे जवसाची पूड मिसळण्याची पद्धत वापरली जाते.

आहारातील तंतू वाढल्यामुळे पचनक्रिया आणि हृदयाच्या आरोग्यासाठी ही जोड उपयुक्त ठरू शकते. मात्र, प्रमाण व्यक्तीनुसार बदलू शकते.

२. ओट्सची पूड करून पिठात मिसळा

साधे ओट्स बारीक करून, त्याची पूड करता येते. गव्हाच्या पिठात थोडी ओट्सची पूड मिसळून पोळी बनवता येईल.

ओट्समध्ये विद्राव्य तंतू असतात. त्यातील बीटा-ग्लुकान हा तंतू आहाराचा महत्त्वाचा घटक आहे. संतुलित आहाराचा भाग म्हणून त्याचे सेवन केल्यास एलडीएल कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.

३. इसबगोलचा भुसा वापरा

इसबगोलमध्ये मोठ्या प्रमाणात तंतू असतात. त्यामुळे पोट साफ होण्यास आणि शौचाची नियमितता राखण्यास मदत होऊ शकते. काही जण पोळीच्या पिठात थोड्या प्रमाणात इसबगोलचा भुसा मिसळतात.

मात्र, इसबगोल घेताना पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. तसेच काही आजार किंवा औषधे सुरू असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्याचा वापर करणे योग्य ठरते.

४. गव्हाच्या पिठात हरभऱ्याचे पीठ मिसळा

हरभऱ्याच्या पिठात प्रथिने आणि तंतू असतात. त्यामुळे गव्हाच्या पिठात थोडे हरभऱ्याचे पीठ मिसळल्यास पोळीच्या पोषणमूल्यात भर पडू शकते.

अशा प्रकारे पोळी अधिक तंतुमय आणि पोटभरीची होऊ शकते. त्यामुळे वजन नियंत्रणाच्या प्रयत्नांमध्येही संतुलित आहाराचा भाग म्हणून त्याचा उपयोग होऊ शकतो.

फक्त पोळी बदलून कोलेस्ट्रॉल कमी होईल का?

ही गोष्ट लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. केवळ पोळीमध्ये जवस, ओट्स किंवा इतर पदार्थ मिसळल्याने कोलेस्ट्रॉलची समस्या पूर्णपणे दूर होत नाही. आहारातील तंतू वाढविण्यासोबत तेलकट पदार्थ, तळलेले पदार्थ, जास्त साखर आणि अतिप्रक्रिया केलेले अन्न कमी करणे गरजेचे आहे.

नियमित चालणे किंवा व्यायाम, वजन नियंत्रण आणि डॉक्टरांनी सांगितल्यास रक्तातील कोलेस्ट्रॉलची तपासणी करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असल्यास डॉक्टर आवश्यकतेनुसार औषधोपचार सुचवू शकतात. त्यामुळे घरगुती आहारातील बदल हे वैद्यकीय उपचारांचा पर्याय मानू नयेत.

(आरोग्यविषयक सूचना : ही माहिती सामान्य जनजागृतीसाठी आहे. कोलेस्ट्रॉल वाढलेले असल्यास किंवा हृदयविकाराचा धोका असल्यास आहारात मोठे बदल करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.)