Healthy vegetable peels: भाज्यांच्या बाबतीत बहुतेक लोक त्यांची साल काढून फेकून देतात. काहींच्या मते सालींमधून पोषण मिळत नाही, तर काहींच्या मते त्या चविष्ट लागत नाहीत. पण, तुम्हाला माहीत आहे का की, काही भाज्यांच्या साली चवदार असोत वा नसोत, आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. आज आम्ही अशा भाज्यांच्या सालींबद्दल माहिती देणार आहोत, ज्यांचे सेवन केल्यास शरीराला असंख्य पोषक तत्त्वे मिळतात आणि म्हणूनच या साली कधीही फेकून देऊ नका.

‘या’ भाज्यांच्या सालीमध्ये असतात पोषकतत्त्व

बटाटे ही एक अशी भाजी आहे, जी सालीसकट खाण्याची शिफारस केली जाते. बटाट्याच्या सालीमध्ये ४० ते ५० टक्के आहारातील फायबर असतात आणि ती जीवनसत्त्वांचाही एक चांगला स्रोत आहे, त्यामुळे बटाट्याची साल खाल्ल्याने शरीराला केवळ एकच नाही तर अनेक फायदे मिळतात.

वाटाण्याचे कवच

लोक अनेकदा वाटाण्याची टरफले टाकून देतात आणि अख्खे दाणे खातात. पण, तुम्हाला माहीत आहे का की वाटाण्याच्या टरफलांमध्ये प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि जस्त भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे तुम्ही वाटाण्याची टरफले खाऊ शकता.

दुधी भोपळ्याची साल

केवळ दुधी भोपळाच नाही, तर त्याची सालदेखील आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दुधी भोपळ्याच्या सालीमध्ये कर्बोदके, एस्कॉर्बिक ॲसिड, बी जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. या सालीमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमदेखील आढळते. दुधी भोपळ्याची साल खाल्ल्याने वजन कमी होण्यासही मदत होऊ शकते.

बीटाची साल

बीट आणि त्याच्या सालीमध्ये फोलेट, लोह आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. ते खाल्ल्याने ॲनिमिया कमी होण्यास आणि आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते, त्यामुळे बीट सालीसकट खाल्ले जाऊ शकते.

भोपळ्याची साले

भोपळा ही एक अशी भाजी आहे, जिची साल सहसा खाल्ली जात नाही, पण त्याचे फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्ही तो सालीसकट खायला सुरुवात करू शकता. भोपळ्याच्या सालीमध्ये डायटरी फायबर असते, जे आतड्यांसंबंधी समस्या दूर करण्यासाठी प्रभावी ठरते.

अशाप्रकारे सालींचे सेवन करा

  • जर तुम्हाला या साली भाज्यांमध्ये शिजवून खायच्या नसतील, तर तुम्ही त्यापासून चिप्स बनवूनही खाऊ शकता.
  • सालींचे वेगळे सॅलेड बनवूनही त्या खाता येतात.
  • सालींपासून जॅम किंवा चटणी बनवता येते.
  • साली वाटून ग्रेव्हीमध्ये वापरता येतात.
  • या सालींचा वापर स्मूदी बनवण्यासाठी केला जाऊ शकतो.