Causes of Heart Attack in Women: खराब आहार, तणावग्रस्त जीवनशैली आणि बसून राहण्याची सवय… या सर्वांचा परिणाम फक्त शरीरावर नाही तर थेट हृदयावर होत आहे. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात महिलांमध्ये हार्ट अटॅकचा धोका झपाट्यानं वाढत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. एक धक्कादायक संशोधन समोर आलं असून त्यानुसार १८ ते ५५ वयोगटातील महिलांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता पुरुषांपेक्षा जास्त असल्याचं दिसून आलं आहे.
महिलांच्या हृदयावर वाढता ताण!
दररोजच्या धावपळीमध्ये महिलांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळच राहत नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत घर आणि कामाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना अनियमित झोप, चुकीचा आहार व सततचा ताण हे त्यांच्या शरीरात हळूहळू हानिकारक बदल घडवतात. या कारणांमुळे रक्ताभिसरणावर परिणाम होतो आणि शेवटी हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
या ‘५’ कारणांमुळे महिलांना जास्त धोका
तज्ज्ञांच्या मते, महिलांमध्ये खालील चार कारणांमुळे हृदयविकाराचं प्रमाण झपाट्यानं वाढत आहे.
- उच्च रक्तदाब (हाय ब्लडप्रेशर)
- अतिरिक्त वजन आणि स्थूलता
- खराब आहार
- अनारोग्यकारक जीवनशैली
- सततचा मानसिक ताण
वरील सांगितलेल्या कारणांमुळे शरीरातील रक्तवाहिन्या अरुंद होतात. त्यामुळे रक्त हृदयापर्यंत योग्य प्रमाणात पोहोचत नाही; परिणामी हृदयावरील ताण वाढतो. या सर्वांमुळे हार्ट अटॅकचा धोका काही पटींनी वाढतो.
संशोधन काय सांगतं?
कॅनडातील टोरंटो येथील सनीब्रूक हेल्थ सायन्सेस सेंटरमध्ये केलेल्या एका मोठ्या अभ्यासात तब्बल १.७५ लाख लोकांच्या आरोग्याचा अभ्यास करण्यात आला. त्यात जवळपास ६० टक्के महिला सहभागी होत्या. अभ्यासात आढळलं की, बिघडलेलं आरोग्य असलेल्या महिलांना हार्ट अटॅकचा धोका निरोगी महिलांपेक्षा जवळपास पाच पट अधिक होता.
या संशोधनात आहार, झोप, शारीरिक क्रिया, धूम्रपान, बॉडी मास इंडेक्स, ब्लड शुगर, लिपिड्स व रक्तदाब या आठ घटकांचा विचार करण्यात आला. या सर्व बाबतीत महिलांमध्ये नकारात्मक घटक जास्त असल्याचे स्पष्ट झाले.
महिलांनी आता तरी सावध व्हा!
तज्ज्ञ सांगतात की, हृदयविकार पुरुषांइतकाच महिलांनाही घातक ठरू शकतो; पण महिलांमध्ये लक्षणं अनेकदा सामान्य थकवा, श्वास लागणे किंवा छातीत जळजळ अशा रूपांत दिसतात. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष होते. वेळेत तपासणी न केल्यास परिणाम घातक ठरू शकतो.
म्हणूनच दररोज थोडं चालणं, पोषक आहार घेणं, ताण कमी ठेवणं व नियमित आरोग्य तपासणी करणं हे अत्यावश्यक आहे. कारण- एक चुकीची सवय तुमच्या हृदयावर प्रहार करू शकते.
