Heart Attack Symptoms: हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक) ही अचानक होणारी घटना वाटते; पण तज्ज्ञांच्या मते शरीर आधीच काही संकेत देत असते. मोठा हार्ट अटॅक येण्याच्या २४ ते ४८ तास आधी शरीर काही इशारे देऊ लागते. या महत्त्वाच्या काळाला वैद्यकीय भाषेत ‘प्रोड्रोमल विंडो’ असे म्हणतात; पण अनेक लोक या संकेतांकडे साधा थकवा किंवा गॅसची समस्या समजून दुर्लक्ष करतात.
डॉक्टरांच्या मते, या काळात हृदयापर्यंत जाणाऱ्या रक्तपुरवठ्यावर परिणाम होऊ लागतो आणि हृदयावरील ताण वाढतो; मात्र पूर्ण ब्लॉकेज होण्याइतकी समस्या अजून गंभीर झालेली नसते. जर याच टप्प्यात रुग्णाने डॉक्टरांशी संपर्क साधला, तर संभाव्य गंभीर नुकसान बऱ्याच प्रमाणात टाळता येऊ शकते. चला, ऑनलाइन आरोग्यविषयक माहिती देणारी वेबसाइट Mayo Clinic यांच्या मते यावेळी कोणती गंभीर लक्षणे दिसू शकतात ते जाणून घेऊया.
असामान्य आणि सतत जाणवणारा थकवा
सर्वांत सुरुवातीचा आणि सामान्य संकेत म्हणजे अचानक आणि कारण नसताना जाणवणारा थकवा. हा थकवा रोजच्या साध्या थकव्यापेक्षा वेगळा असतो. अनेक रुग्ण सांगतात की, थोडंसं चाललं किंवा हलकं काम केलं तरी त्यांना खूपच थकवा जाणवतो.
छातीत येणारा-जाणारा दाब किंवा जळजळ
हार्ट अटॅक येण्यापूर्वी छातीत होणारी वेदना नेहमीच तीव्र किंवा टोचणारी असेलच, असे नाही. अनेक वेळा ही समस्या दाब, जडपणा, आवळल्यासारखे वाटणे किंवा हलकी जळजळ अशा स्वरूपात जाणवते. थोडा आराम केल्यावर ती काही वेळासाठी कमी होते. म्हणून लोक त्याला ॲसिडिटी किंवा स्नायू ताणल्याची समस्या समजतात; पण अशा प्रकारे दुर्लक्ष करणे पुढे अधिक धोकादायक ठरू शकते.
असू शकतात लक्षणे
आरामात असतानाही श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हृदय शरीरापर्यंत पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन पोहोचवू शकत नसल्याचाहा संकेत असू शकतो. विशेषतः हे लक्षण अचानक सुरू झाले आणि थकवा किंवा छातीत त्रासासोबत दिसले, तर त्वरित तपासणी करणे गरजेचे आहे.
कधी कधी वेदना फक्त छातीपुरतीच मर्यादित राहत नाही; ती डाव्या हातात, खांद्यामध्ये, मानेत, जबड्यात, पाठीच्या वरच्या भागात किंवा पोटाच्या वरच्या भागातही पसरू शकते. महिला, वयोवृद्ध व डायबिटीजचे रुग्ण यांच्यामध्ये अशी लक्षणे जास्त प्रमाणात दिसतात, त्यामुळे अनेकदा हार्ट अटॅक ओळखायला उशीर होतो.
त्याशिवाय थंड वातावरण असतानाही अचानक घाम येणे चक्कर येणे, मळमळ होणे किंवा कारण नसताना भीती वाटणे हेही धोक्याचे संकेत असू शकतात. अनेक रुग्ण सांगतात की, त्यांना काहीतरी बरोबर नाही, असे वाटू लागते. शरीर देत असलेल्या अशा स्वरूपाच्या इशाऱ्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये.

