Heart Surgeon Reveals 5 Lifestyle Changes to Reduce Heart Attack Risk: हृदयविकाराचा झटका ही आजच्या काळातील सर्वांत गंभीर आरोग्य समस्यांपैकी एक मानली जाते. कमी वयातही अनेकांना अचानक हृदयविकाराचा झटका येत असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे स्वतःच्या हृदयाची काळजी नेमकी कशी घ्यावी, कोणत्या सवयी बदलल्या पाहिजेत आणि धोका कमी करण्यासाठी काय करायला हवं, याबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न असतात.
याच पार्श्वभूमीवर अमेरिकेतील प्रसिद्ध हृदय शल्यविशारद डॉ. जेरेमी लंडन यांनी सोशल मीडियावर एक माहितीपूर्ण व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी अवघ्या एका मिनिटात हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी जीवनशैलीतील पाच महत्त्वाच्या बदलांवर भर दिला आहे. त्यांच्या मते, हृदयविकार टाळण्यासाठी कोणताही एक जादुई उपाय नाही. त्यासाठी रोजच्या सवयींमध्ये सातत्याने बदल करणे आवश्यक आहे.
डॉ. जेरेमी लंडन हे २५ वर्षांहून अधिक काळ हृदय शस्त्रक्रिया क्षेत्रात कार्यरत आहेत. प्रतिबंधात्मक आरोग्य, आरोग्यदायी जीवनशैली आणि वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित उपचार यावर त्यांचा विशेष भर आहे.
१. धूम्रपान आणि व्हेपिंग पूर्णपणे टाळा
डॉ. लंडन यांचा पहिला सल्ला म्हणजे कोणत्याही प्रकारचं धूम्रपान टाळा. सिगारेट, व्हेपिंग किंवा गांजाचे धूम्रपान यांपैकी कोणतीही सवय हृदयासाठी घातक ठरू शकते. धूम्रपानामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊन हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
२. रक्तदाब नियमित तपासा
उच्च रक्तदाब हा अनेकदा कोणतीही ठळक लक्षणं न दाखवता, शरीराला हानी पोहोचवत असतो. त्यामुळे घरीच रक्तदाब मोजण्याचं यंत्र ठेवावं आणि वेळोवेळी रक्तदाब तपासावा, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
डॉ. लंडन यांच्या मते, उच्च रक्तदाबामुळे रक्तवाहिन्यांच्या आतील आवरणाचं नुकसान होऊ शकतं आणि पुढे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
३. कोलेस्ट्राॅलकडे दुर्लक्ष करू नका
हृदयाच्या आरोग्यासाठी कोलेस्ट्राॅलची पातळी नियंत्रणात असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. विशेषतः ApoB आणि Lp(a) या रक्त तपासण्यांकडे लक्ष देण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
तज्ज्ञांच्या मते, या तपासण्यांमुळे हृदयविकाराचा धोका किती आहे, याचा अंदाज घेण्यास मदत होऊ शकते. रक्तातील लिपोप्रोटीनची पातळी वाढल्यास हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढू शकतो.
४. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवा
डॉ. लंडन यांच्या मते, आहारातील अतिरिक्त साखर कमी करणं आवश्यक आहे. रक्तातील साखरेची पातळी सतत वाढत-घटत राहिल्यास इन्सुलिन प्रतिकाराची समस्या निर्माण होऊ शकते. दीर्घकाळ अशी स्थिती राहिल्यास त्याचा परिणाम हृदयाच्या आरोग्यावरही होऊ शकतो.
म्हणून संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणं आवश्यक असल्याचं ते सांगतात.
५. एकटेपणापासून दूर राहा
हृदयाच्या आरोग्याचा संबंध फक्त शरीराशीच नसून, मानसिक आरोग्याशीही आहे, याकडे डॉ. लंडन यांनी विशेष लक्ष वेधलं आहे.
त्यांच्या मते, कुटुंब, मित्र आणि समाजाशी जोडलेलं राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सततचा एकटेपणा, ताण व सामाजिक संबंधांचा अभाव यांचाही हृदयविकाराच्या धोक्याशी संबंध असू शकतो. त्यामुळे आपल्या माणसांशी संवाद ठेवणं आणि सामाजिक नातेसंबंध जपणंही तेवढंच गरजेचं आहे.
तज्ज्ञांचा महत्त्वाचा संदेश
डॉ. जेरेमी लंडन यांच्या मते, हृदयविकाराचा धोका एका कारणामुळे वाढत नाही. धूम्रपान, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्राॅल, रक्तातील साखर आणि मानसिक आरोग्य या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम हृदयावर होतो. त्यामुळे या पाच गोष्टींकडे नियमित लक्ष दिल्यास हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.
(महत्त्वाची सूचना : ही माहिती सोशल मीडियावर डॉ. जेरेमी लंडन यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर आधारित असून, ती केवळ जनजागृतीसाठी आहे. ही वैद्यकीय सल्ल्याची जागा घेऊ शकत नाही. हृदयाशी संबंधित कोणतीही तक्रार असल्यास किंवा उपचारांबाबत शंका असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
