Heart Attack Symptoms: गेल्या काही वर्षांत हार्ट अटॅकच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामागे चुकीचा आहार आणि बिघडलेली जीवनशैली ही मुख्य कारणं मानली जातात. पण जे लोक सतत मानसिक ताण घेतात, त्यांनाही हार्ट अटॅक येऊ शकतो का? डॉक्टरांच्या मते, मानसिक ताण शरीरासाठी खूप धोकादायक असतो. त्याचा थेट परिणाम हृदयावरही होतो.

डॉक्टर सांगतात की, आजच्या धावपळीच्या जीवनात उशिरापर्यंत काम करणं, सतत मानसिक ताणाखाली राहणं आणि पुरेशी झोप न घेणं यामुळे हळूहळू आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

अनेक लोक कामाचा ताण किंवा जास्त स्क्रीन टाइममुळे रोजच्या झोपेशी तडजोड करतात. पण ही सवय दीर्घकाळ सुरू राहिली तर त्याचा परिणाम हृदयावरही होऊ शकतो. झोपेची कमतरता आणि सततचा मानसिक ताण यामुळे रक्तदाब वाढू शकतो. तसेच शरीरातील ताणाशी संबंधित हार्मोन्सचे संतुलनही बिघडू शकते.

विशेषतः जे लोक दिवसभर बसून काम करतात, वेळेवर जेवत नाहीत आणि व्यायाम करत नाहीत, त्यांना हार्टच्या आजारांचा धोका जास्त असतो. व्यायामासाठी वेळ न काढणं आणि सतत तणावात राहणं या सवयी एकत्र आल्यास हृदयाच्या आजारांचा धोका आणखी वाढू शकतो.

मानसिक ताणामुळे हार्ट अटॅक कसा येऊ शकतो?

यशोदा मेडिसिटी हॉस्पिटलमधील इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी विभागाचे संचालक डॉ. असित खन्ना यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या मते, मानसिक ताण आल्यावर मेंदूमधील कोर्टिसोलसारख्या हार्मोन्सचं संतुलन बिघडतं. त्यामुळे हृदयाचे ठोके वेगाने पडू लागतात आणि रक्तदाब वाढतो.

यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांवर ताण येतो आणि त्या अरुंद होऊ शकतात. त्यामुळे हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा होण्यात अडथळा येतो. काही प्रकरणांमध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये आधीपासून साचलेला प्लाक फुटू शकतो. त्यामुळे रक्ताची गाठ (ब्लड क्लॉट) तयार होते आणि रक्तप्रवाह थांबतो. यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो. जे लोक कायम मानसिक ताणात राहतात, त्यांना हा धोका अधिक असतो.

हार्ट अटॅकची लक्षणं

  • छातीत तीव्र वेदना होणं आणि ती वेदना डाव्या हातापर्यंत जाणं
  • श्वास घेण्यास त्रास होणं
  • धाप लागणं
  • कोणतंही कारण नसताना थंड घाम येणं
  • जबड्यात वेदना होणं

हृदयाचे आजार टाळण्यासाठी काय करावं?

  • रोज किमान ७ ते ८ तास झोप घ्या.
  • दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम करा.
  • छातीत दुखणं, धाप लागणं किंवा हृदयाचे ठोके खूप वेगाने पडत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
  • मानसिक ताण टाळा. ताण कमी करण्यासाठी रोज योग किंवा ध्यान करण्याची सवय लावा.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)