Heart Attack Risk After 40: वयाची ४० वर्षे पूर्ण होणे हा आपल्या आरोग्याच्या सवयींकडे लक्ष देण्यासाठी एक चांगला टप्पा ठरू शकतो. हृदय व रक्तवाहिन्यांचे शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. जेरेमी लंडन यांनी अलीकडेच या वयात प्रवेश करताना लोकांकडून होणाऱ्या चार सामान्य चुका सांगितल्या आहेत. यामध्ये झटपट वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे डाएट करणे, शारीरिक हालचाली कमी करणे, कर्करोगाच्या तपासण्या टाळणे आणि आता आरोग्यात सुधारणा करण्यासाठी खूप उशीर झाला आहे, असे समजणे यांचा समावेश आहे.

मात्र, या सवयी बदलता येऊ शकतात. आहारात योग्य बदल करणे, नियमित शारीरिक हालचाली करणे आणि गरजेनुसार आरोग्याच्या प्रतिबंधात्मक तपासण्या करून घेणे, यामुळे वाढत्या वयाशी संबंधित अनेक आरोग्यधोके कमी करता येऊ शकतात.

१. झटपट वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे डाएट करणे

“कॅलरीचे प्रमाण खूप कमी करणारे किंवा आहारातून काही संपूर्ण अन्नगट वगळणारे डाएट केल्यामुळे वजन कमी होण्यासोबतच शरीरातील स्नायूही कमी होऊ शकतात,” असे डॉ. विमलेश पांडे, सल्लागार हृदयरोगतज्ज्ञ, KIMS हॉस्पिटल्स, ठाणे यांनी सांगितले.

शरीराची ताकद टिकवून ठेवण्यासाठी, हालचाली सहज करता येण्यासाठी आणि शरीराची चयापचय प्रक्रिया (मेटाबॉलिझम) चांगली राहण्यासाठी स्नायू टिकवून ठेवणे महत्त्वाचे असते. डॉ. पांडे यांनी असेही सांगितले की, वारंवार वजन कमी होणे आणि पुन्हा वाढणे यामुळे दीर्घकाळ निरोगी वजन राखणे कठीण होऊ शकते.

वजन कमी करण्यासाठी झटपट उपाय शोधण्याऐवजी अनेक वर्षे सहजपणे पाळता येतील अशा आहाराच्या सवयी लावून घेण्याचा सल्ला ते देतात.

“आहारात पुरेशा प्रमाणात प्रथिने, भाज्या, फळे, संपूर्ण धान्ये आणि आरोग्यासाठी चांगले असणारे स्निग्ध पदार्थ असणे महत्त्वाचे आहे. त्याच वेळी, प्रक्रिया केलेले पदार्थ, जास्त साखर आणि जास्त मीठ खाणे कमी केले पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.

खाण्याच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणेही फायदेशीर ठरू शकते. डॉ. पांडे यांच्या मते, केवळ काही आठवडे पाळता येणारा कडक आहार घेण्याऐवजी दीर्घकाळ टिकवता येईल अशा आहाराच्या सवयींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

२. शारीरिक हालचाली कमी करणे

“शरीराची हालचाल कमी झाल्यामुळे कॅलरी खर्च होण्याचे प्रमाण कमी होते, स्नायूंची ताकद घटते आणि हृदय व फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते,” असे डॉ. पांडे यांनी सांगितले.

दीर्घकाळ शारीरिक हालचाली कमी राहिल्यास वजन वाढणे, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्टेरॉलची पातळी बिघडणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. या सर्व समस्यांमुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

मग निरोगी राहण्यासाठी किती व्यायाम करणे आवश्यक आहे?

“प्रौढांनी दर आठवड्याला किमान १५० मिनिटे मध्यम तीव्रतेचा शारीरिक व्यायाम करण्याचे लक्ष्य ठेवावे. उदाहरणार्थ, वेगाने चालणे. तसेच आठवड्यातून किमान दोन दिवस स्नायू मजबूत करणारे व्यायाम करावेत,” असे त्यांनी सांगितले.

मात्र, सध्या शारीरिक हालचाली कमी असलेल्या लोकांनी सुरुवातीलाच एवढा व्यायाम करण्याची गरज नाही. डॉ. पांडे यांनी सुरुवातीला थोडे चालणे, कामाच्या वेळेत अधूनमधून उठून हालचाल करणे आणि हळूहळू व्यायामाचे प्रमाण वाढवणे, असा सल्ला दिला.

हळूहळू व्यायामाची सवय लावल्यास ती दीर्घकाळ टिकवून ठेवणे सोपे जाते.

३. कर्करोगाच्या तपासण्या टाळणे

वयाची ४० वर्षे पूर्ण झाली म्हणजे प्रत्येक व्यक्तीने सारख्याच प्रकारच्या कर्करोगाच्या तपासण्या केल्या पाहिजेत, असे नाही. कोणत्या तपासण्या करणे आवश्यक आहे, हे व्यक्तीचे वय, लिंग, कुटुंबातील आजारांचा इतिहास, जीवनशैली आणि वैयक्तिक आरोग्यधोके अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असते.

हेड अँड नेक कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (HNCII) येथील सल्लागार कर्करोगतज्ज्ञ डॉ. रझीउद्दीन ख्वाजा यांनी सांगितले की, लोकांनी नियमित आरोग्य तपासण्या सुरू ठेवाव्यात आणि स्वतःसाठी कोणत्या कर्करोगाच्या तपासण्या योग्य आहेत, याबाबत डॉक्टरांशी चर्चा करावी.

व्यक्तीच्या आरोग्याची स्थिती आणि जोखमींनुसार स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि आतड्यांचा कर्करोग यांसाठी तपासण्या करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.

तंबाखू किंवा मद्याचे सेवन मोठ्या प्रमाणात करणाऱ्या व्यक्तींना अधिक सविस्तर तपासणीचीही गरज भासू शकते, असे त्यांनी सांगितले.

४. आरोग्यात सुधारणा करण्यासाठी आता खूप उशीर झाला आहे, असे समजणे

“आता खूप उशीर झाला आहे, असा विचार केल्यामुळे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आवश्यक असलेले प्रतिबंधात्मक उपाय करण्यापासून लोक दूर राहू शकतात,” असे डॉ. ख्वाजा यांनी सांगितले.

त्यांनी यावर भर दिला की, आरोग्य चांगले ठेवणे ही एकाच वेळी सर्व बदल करण्याची गोष्ट नाही. वयाची ४० वर्षे पूर्ण झाल्यानंतरही तंबाखूचे सेवन सोडणे, मद्यपान कमी करणे, शारीरिक हालचाली वाढवणे, आहार सुधारणे आणि डॉक्टरांनी सुचवलेल्या तपासण्या वेळेवर करून घेणे यांसारख्या बदलांमुळे आरोग्याला फायदा होऊ शकतो.

“पूर्वीच्या सर्व चुकीच्या सवयी एकदम सोडून देणे हा यामागचा उद्देश नाही. तर सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन आरोग्यासाठी चांगल्या निवडी करणे महत्त्वाचे आहे,” असे त्यांनी सांगितले.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)